Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

निर्गम 34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


नवीन दगडी पाट्या

1 मग याहवेह मोशेला म्हणाले, “पहिल्या पाट्यांसारख्याच दोन दगडी पाट्या तू घडव, मग तू फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होते ते मी त्यावर लिहेन.

2 तू सकाळी तयार राहा आणि मग सीनाय पर्वतावर ये. तिथे डोंगरमाथ्यावर माझ्यासमोर स्वतःला सादर कर.

3 तुझ्याबरोबर कोणीही येऊ नये किंवा डोंगरावर कुठेही इतर कोणी दृष्टीस पडू नये; गुरे आणि शेरडेमेंढरे यांनी सुद्धा डोंगरासमोर चरू नये.”

4 मग मोशेने पहिल्यासारख्या दोन दगडी पाट्या घडवून घेतल्या आणि त्या दोन दगडी पाट्या आपल्या हातात घेऊन याहवेहने आज्ञा दिल्याप्रमाणे मोठ्या पहाटे सीनाय पर्वतावर गेला.

5 मग याहवेह ढगामध्ये खाली उतरले आणि तिथे मोशेसमोर उभे राहिले. तिथे त्यांनी याहवेह या आपल्या नावाची घोषणा केली.

6 आणि याहवेह मोशे समोरून जाताना घोषणा केली, “याहवेह, याहवेह, दयाळू व कृपाळू परमेश्वर, मंदक्रोध, प्रीती व विश्वासूपण यात उदंड,

7 हजारांवर प्रीती करणारे, दुष्टता, अपराध व पाप यांची क्षमा करणारे; तरीही याहवेह दोषीला निर्दोष असे सोडत नाहीत; तर आईवडिलांच्या पापाचे शासन त्यांच्या संततीवर, व त्यांच्या संततीच्या तिसर्‍या व चौथ्या पिढीपर्यंत देणारे आहे.”

8 तेव्हा मोशेने भूमीस लवून उपासना केली.

9 तो म्हणाला, “हे प्रभू, तुमच्या दृष्टीने मी जर कृपा पावलो असलो, तर प्रभूने आमच्याबरोबर जावे. जरी हे लोक ताठ मानेचे आहेत, तरी आमच्या दुष्टाईची व आमच्या पापाची क्षमा करून आपले वतन म्हणून आमचा स्वीकार करा.”

10 तेव्हा याहवेहने उत्तर दिले: “मी तुझ्याशी एक करार करीत आहे. तुझ्या लोकांसमोर मी असे चमत्कार करेन की जे संपूर्ण पृथ्वीवर कोणत्याही राष्ट्रात करण्यात आले नाहीत. ज्या लोकांमध्ये तू राहतो ते पाहतील की मी, याहवेहने तुझ्यासाठी केलेली कृत्ये किती भयावह आहेत.

11 मी तुला आज जे आज्ञापितो ते तू पाळावे. मी तुमच्यापुढून अमोरी, कनानी, हिथी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी यांना घालवून देईन.

12 ज्या देशात तुम्ही जात आहात त्यात राहत असलेल्या लोकांशी करार करू नये याविषयी सावध असा, नाहीतर ते तुमच्यासाठी पाश असे होतील.

13 त्यांच्या वेद्या मोडून टाका, त्यांच्या पवित्र पाषाणांचा चुरा करा आणि अशेराचे स्तंभ तोडून टाका.

14 इतर कोणत्याही दैवतांची उपासना करू नका, कारण याहवेह, ज्यांचे नाव ईर्ष्यावान आहे, ते ईर्ष्यावान परमेश्वर आहेत.

15 “त्या देशात राहत असलेल्या लोकांशी करार करू नये याविषयी सावध असा; कारण ते जेव्हा त्यांच्या दैवतांशी व्यभिचार करतात आणि त्यांना यज्ञ करतात, ते तुम्हाला आमंत्रित करतील आणि तुम्ही त्यांच्या यज्ञार्पणातील अन्न खाल.

16 आणि जेव्हा तुम्ही त्यांच्यातील काही कन्या तुमच्या पुत्रांसाठी पत्नी म्हणून निवडाल आणि त्या कन्या त्यांच्या दैवतांशी व्यभिचार करतील, त्या तुमच्या मुलांनाही तसेच करण्यासाठी प्रवृत्त करतील.

17 “तुम्ही आपल्यासाठी कोणतीही मूर्ती करू नका.

18 “बेखमीर भाकरीचा सण पाळा. मी तुम्हाला आज्ञापिल्याप्रमाणे, सात दिवस बेखमीर भाकर खा. अबीब महिन्यात नेमीत वेळी ते करावे, कारण त्या महिन्यात तुम्ही इजिप्तमधून बाहेर निघाला होता.

19 “प्रत्येक उदरातील प्रथम जन्मलेला, तुमच्या गुरातील सर्व प्रथम जन्मलेले नर, मग ते खिल्लारातील असो किंवा मेंढरांतील असो माझे आहेत.

20 गाढवाचे प्रथमवत्स कोकरू देऊन खंडणी भरून सोडवून घ्यावा, परंतु तो जर तुम्ही खंडणी भरून सोडविला नाही तर, त्याची मान मोडावी. तुमच्या सर्व प्रथम पुत्रांना खंडणी भरून सोडवावे. “कोणीही माझ्यासमोर रिकाम्या हाताने येऊ नये.

21 “सहा दिवस तुम्ही काम करावे, परंतु सातव्या दिवशी तुम्ही विसावा घ्यावा; नांगरणीच्या व कापणीच्या हंगामात सुद्धा तुम्ही विसावा घ्यावा.

22 “गव्हाच्या कापणीच्या वेळी प्रथम पिकाने सप्ताहाचा उत्सव साजरा करावा आणि वर्षाच्या शेवटी हंगामाचा सण पाळावा.

23 वर्षातून तीन वेळा तुमच्या सर्व पुरुषांनी सार्वभौम याहवेह, इस्राएलचे परमेश्वर यांच्यासमोर हजर व्हावे.

24 मी सर्व राष्ट्रांना तुमच्यापुढून घालवून टाकीन आणि तुमची सीमा वाढवेन आणि जेव्हा तुम्ही याहवेह तुमचे परमेश्वर यांच्यासमोर हजर होण्यासाठी जाल, त्यावेळी इतर कोणीही तुमच्या देशाचा लोभ धरणार नाही.

25 “अर्पणातील रक्त खमिराबरोबर मला अर्पण करू नये. आणि वल्हांडण सणाच्या यज्ञातील काहीही सकाळपर्यंत राहू देऊ नये.

26 “तुमच्या भूमीच्या प्रथम उत्पन्नातील सर्वोत्तम भाग तुमचे परमेश्वर याहवेह यांच्या भवनात आणावा. “करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.”

27 मग याहवेह मोशेला म्हणाले, “हे शब्द लिही, कारण या शब्दांनुसार मी तुझ्याशी व इस्राएलाशी करार केला आहे.”

28 मोशे त्या ठिकाणी भाकरी न खाता किंवा पाणी न पिता चाळीस दिवस व चाळीस रात्र याहवेहबरोबर राहिला आणि त्याने पाट्यांवर कराराचे शब्द, म्हणजेच दहा आज्ञा लिहिल्या.


मोशेचा तेजस्वी चेहरा

29 जेव्हा मोशे आपल्या हातात कराराच्या नियमाच्या दोन दगडी पाट्या घेऊन सीनाय पर्वतावरून खाली उतरून आला, तेव्हा याहवेहबरोबर बोलल्यामुळे त्याचा चेहरा तेजस्वी झाला होता, हे त्याच्या लक्षात आले नाही.

30 जेव्हा अहरोन व सर्व इस्राएल लोकांनी मोशेला पाहिले, त्याचा चेहरा तेजस्वी होता आणि ते त्याच्याजवळ येण्यास घाबरत होते.

31 पण मोशेने त्यांना बोलाविले; म्हणून अहरोन व समुदायाचे वडीलजन परत त्याच्याजवळ गेले व तो त्यांच्याबरोबर बोलला.

32 यानंतर सर्व इस्राएली लोक त्याच्याजवळ आले आणि मोशेने त्यांना त्या सर्व आज्ञा दिल्या, ज्या याहवेहने सीनाय पर्वतावर त्याला दिल्या होत्या.

33 मोशेने लोकांशी आपले संभाषण संपविले व आपल्या चेहर्‍यावर पडदा घातला.

34 पण जेव्हा मोशे याहवेहबरोबर बोलण्यासाठी त्यांच्या समक्षतेत जात असे, बाहेर जाईपर्यंत तो पडदा काढत असे. जेव्हा तो बाहेर येई व त्याला जे काही आज्ञापिले गेले आहे ते तो इस्राएली लोकांना सांगत असे,

35 इस्राएली लोकांनी पाहिले की मोशेचा चेहरा तेजस्वी होता. मग मोशे याहवेहबरोबर बोलावयास जाईपर्यंत आपल्या चेहर्‍यावर पडदा परत घालत असे.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan