Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

निर्गम 33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 नंतर याहवेह मोशेला म्हणाले, “तू आणि ज्या लोकांना तू इजिप्तमधून बाहेर आणले त्यांना घेऊन या ठिकाणातून नीघ आणि मी अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना शपथ घेऊन अभिवचन दिले, ‘हा देश मी तुझ्या वंशजांना देईन’ त्या देशाकडे घेऊन जा.

2 मी तुमच्यापुढे एक दूत पाठवून कनानी, अमोरी, हिथी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी या लोकांना बाहेर हाकलून देईन.

3 दूध व मध वाहत असलेल्या देशाकडे जा. परंतु मी तुमच्याबरोबर येणार नाही, कारण तुम्ही ताठ मानेचे लोक आहात आणि कदाचित वाटेत मी तुमचा नाश करेन.”

4 जेव्हा लोकांनी हे निराशाजनक शब्द ऐकले, तेव्हा ते शोक करू लागले आणि कोणीही कोणत्याही प्रकारचे दागिने घातले नाही.

5 कारण याहवेहने मोशेला सांगितले होते, “इस्राएलच्या लोकांना सांग, तुम्ही ताठ मानेचे लोक आहात. मी एक क्षणभरही तुमच्याबरोबर गेलो तर कदाचित मी तुमचा नाश करेन. आता तुमचे दागिने काढा आणि तुमचे काय करावे हे मी ठरवेन.”

6 म्हणून इस्राएल लोकांनी होरेब पर्वताजवळ आपले दागिने काढून टाकले.


सभामंडप

7 आता छावणीबाहेर थोड्या दूर अंतरावर मोशे एक तंबू उभारीत असे, त्याला तो “सभामंडप असे म्हणे.” ज्याला याहवेहशी बोलायचे असेल तो छावणीबाहेर असलेल्या त्या सभामंडपाकडे जात असे.

8 आणि जेव्हा मोशे बाहेर मंडपाकडे जाई, तेव्हा सर्व लोक आपआपल्या तंबूच्या दाराशी उठून उभे राहून मोशे मंडपामध्ये जाईपर्यंत त्याला पाहत असत.

9 आणि जेव्हा मोशे मंडपामध्ये प्रवेश करी, तेव्हा याहवेह मोशेशी बोलेपर्यंत, मेघस्तंभ खाली उतरून मंडपाच्या दाराशी थांबत असे.

10 जेव्हा लोक मेघस्तंभ मंडपाच्या दाराशी थांबलेला पाहत, ते सर्व आपआपल्या तंबूच्या दाराशी उभे राहून उपासना करीत असत.

11 जसा एखादा व्यक्ती आपल्या मित्राशी बोलतो तसे याहवेह मोशेशी समोरासमोर बोलत असत. मग मोशे छावणीकडे परत जात असे, परंतु त्याचा तरुण सहकारी, नूनाचा पुत्र यहोशुआ हा मंडप सोडून जात नसे.


मोशे आणि याहवेहचे गौरव

12 मग मोशे याहवेहशी बोलला, “तुम्ही मला सांगत आला, ‘या लोकांना चालव,’ परंतु माझ्याबरोबर तुम्ही कोणाला पाठविणार हे तुम्ही मला सांगितले नाही. तुम्ही म्हणाला, ‘मी तुला नावाने ओळखतो आणि तू माझ्या दृष्टीने कृपा पावला आहेस.’

13 जर तुम्ही माझ्यावर संतुष्ट असाल, तर मला तुमचे मार्ग शिकवा, यासाठी की मी तुम्हाला जाणून तुमच्या दृष्टीत कृपा पावावी. हे स्मरणात असू द्या की हे राष्ट्र तुमचे लोक आहेत.”

14 यावर याहवेहने उत्तर दिले, “माझी समक्षता तुझ्याबरोबर जाईल आणि मी तुला विसावा देईन.”

15 मग मोशे याहवेहला म्हणाला, “जर तुमची समक्षता आमच्याबरोबर गेली नाही, तर आम्हाला येथून पुढे पाठवू नका.

16 तुम्ही आम्हाबरोबर आला नाही, तर माझ्यावर आणि आपल्या लोकांवर तुमची कृपादृष्टी झाली आहे की नाही हे कसे कळणार? मी व तुमचे लोक पृथ्वीवरील इतर सर्व लोकांपासून वेगळे आहोत हे कसे समजणार?”

17 यावर याहवेहने मोशेला म्हटले, “जी गोष्ट तू माझ्याकडे मागितली आहे तीच मी करेन, कारण तुझ्यावर मी संतुष्ट आहे आणि मी तुला नावाने ओळखतो.”

18 तेव्हा मोशेने विनंती केली, “आता मला तुमचे गौरव दाखवा.”

19 आणि याहवेह म्हणाले, “मी माझे सर्व चांगुलपण तुझ्यापुढून चालवेन आणि याहवेह म्हणून माझ्या नावाची घोषणा मी तुझ्यासमक्ष करेन. ज्याच्यावर मला कृपा करावयाची त्याच्यावर मी कृपा करेन आणि ज्याच्यावर मला दया करावयाची त्याच्यावर मी दया करेन.”

20 याहवेह म्हणाले, “पण तू माझा चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण मला पाहिल्यानंतर कोणीही मनुष्य जगत नाही.”

21 मग याहवेह म्हणाले, “माझ्याजवळ एक जागा आहे, जिथे एका खडकावर तू उभा राहा.

22 माझे गौरव जवळून जात असता, मी तुला खडकाच्या कपारीत ठेवेन आणि मी पार होईपर्यंत मी तुला माझ्या हाताने झाकीन.

23 मग मी माझा हात काढून घेईन आणि तू माझी पाठ पाहशील; पण माझा चेहरा तुला दिसणार नाही.”

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan