निर्गम 3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीमोशे आणि जळते झुडूप 1 मोशे आपला सासरा, मिद्यानी याजक इथ्रो याची मेंढरे चारीत होता. तो ती मेंढरे घेऊन रानात, परमेश्वराचा डोंगर होरेबच्या मागच्या बाजूला गेला. 2 तिथे त्याला एका झुडूपात अग्निज्वालेमधून याहवेहचा दूत प्रकट झाला. झुडूप तर पेटले आहे, पण ते जळत नाही असे जेव्हा मोशेने पाहिले, 3 तेव्हा मोशेने विचार केला “ते झुडूप का जळत नाही, हे विचित्र दृश्य मी त्याजवळ जाऊन बघेन.” 4 मोशे ते झुडूप पाहण्यासाठी गेला हे याहवेहने पाहिले, तेव्हा परमेश्वराने त्याला झुडूपातून आवाज दिला, “मोशे, मोशे!” मोशे म्हणाला, “हा मी येथे आहे.” 5 परमेश्वर त्याला म्हणाले, “आणखी जवळ येऊ नकोस. आपली पायतणे काढ, कारण ज्या भूमीवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे.” 6 मग ते म्हणाले, “मी तुझ्या पूर्वजांचा परमेश्वर आहे, म्हणजे मी अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा परमेश्वर आहे.” तेव्हा मोशेने आपला चेहरा झाकला, कारण परमेश्वराकडे पाहण्यास तो घाबरला. 7 नंतर याहवेहने त्याला सांगितले, “इजिप्त देशातील माझ्या लोकांचे हाल मी बघितले आहे. त्यांच्या मुकादमांच्या त्रासामुळे त्यांचे रडणे मी ऐकले आहे आणि त्यांच्या दुःखाविषयी मला चिंता आहे. 8 त्यांना इजिप्तच्या गुलामगिरीतून सोडवून चांगल्या व विस्तीर्ण देशात, दूध व मध वाहत्या देशात घेऊन जाण्यासाठी मी खाली आलो आहे. त्या देशात कनानी, हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी हे लोक राहतात. 9 आणि आता इस्राएली लोकांचे रडणे माझ्यापर्यंत पोहोचले आहे आणि इजिप्तचे लोक त्यांच्यावर कसा अत्याचार करीत आहेत हे मी पाहिले आहे. 10 तर आता जा, माझ्या इस्राएलच्या लोकांना इजिप्तमधून बाहेर काढून आणावे म्हणून मी तुला फारोहकडे पाठवित आहे.” 11 पण मोशे परमेश्वराला म्हणाला, “मी कोण आहे की मी फारोहकडे जावे आणि इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणावे?” 12 परमेश्वराने म्हटले, “मी तुझ्याबरोबर असेन आणि मी तुला पाठविले आहे याचे चिन्ह हेच असणार: जेव्हा तू इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणशील, तेव्हा याच डोंगरावर तुम्ही परमेश्वराची उपासना कराल.” 13 परंतु मोशेने परमेश्वराला विचारले, “जर मी इस्राएली लोकांकडे गेलो आणि त्यांना सांगितले, तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वराने मला पाठविले आहे, तर ते मला विचारतील, त्यांचे नाव काय आहे? तर मी त्यांना काय सांगू?” 14 परमेश्वर मोशेला म्हणाले, “जो मी आहे तो मी आहे. इस्राएली लोकांना सांग: ‘मी आहे’ यांनी मला पाठवले आहे.” 15 परमेश्वर मोशेला आणखी म्हणाले, “इस्राएलास सांग, ‘अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा परमेश्वर या तुमच्या पूर्वजांचा परमेश्वर याहवेहने मला तुमच्याकडे पाठविले आहे.’ “हेच माझे सनातन नाव आहे, आणि सर्व पिढ्यांपर्यंत याच नावाने तुम्ही मला हाक मारणार. 16 “जा आणि इस्राएलांच्या सर्व वडीलजनांना एकत्र बोलव आणि त्यांना सांग, तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब यांचे परमेश्वर याहवेह हे मला प्रकट झाले आणि म्हणाले, मी तुमच्याकडे लक्ष दिले आहे आणि इजिप्तमध्ये तुमच्याबाबतीत जे काही घडत आहे ते मी पाहिले आहे. 17 आणि इजिप्तमधील तुमच्या या दुःखातून तुम्हाला बाहेर काढून कनानी, हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी लोक राहत असलेल्या दूध व मध वाहत्या देशात तुम्हाला घेऊन जाण्याचे मी वचन दिलेले आहे. 18 “इस्राएलचे वडीलजन तुझा शब्द मानतील. मग तू आणि वडीलजन इजिप्तच्या राजाकडे जाऊन त्याला सांगा, याहवेह, इब्रींचे परमेश्वर, यांनी आम्हाला दर्शन देऊन सांगितले आहे की आम्ही तीन दिवसांच्या प्रवासाच्या अंतरावर रानात जाऊन याहवेह आमचे परमेश्वर यास यज्ञ अर्पण करावा म्हणून तू आम्हाला जाऊ दे. 19 पण मला माहीत आहे की, बलवान हाताने दबाव आणल्याशिवाय इजिप्तचा राजा तुम्हाला जाऊ देणार नाही. 20 म्हणून मी आपला हात लांब करेन व माझ्या चमत्कारांनी इजिप्तवर प्रहार करेन. मग शेवटी तो तुम्हाला जाऊ देईल. 21 “आणि या लोकांवर इजिप्तच्या लोकांची कृपादृष्टी होईल असे मी करेन म्हणजे तुम्ही रिक्तहस्ते बाहेर पडणार नाही. 22 इजिप्त देशातील स्त्रियांकडून व तुमच्या शेजारणीकडून प्रत्येक इस्राएली स्त्रीने सोन्याचे व चांदीचे दागिने व उत्तमोत्तम वस्त्रे मागून घ्यावीत व तुम्ही ते आपल्या मुलांवर व मुलींवर चढवावे, याप्रकारे तुम्ही इजिप्त देशातील लोकांना लुटाल.” |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.