Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

निर्गम 22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


संपत्तीच्या संरक्षणासंबंधी

1 “जर एखाद्याने बैल किंवा मेंढरू चोरले व ते कापले किंवा विकले तर त्याने एका बैलाबद्दल पाच बैल व एका मेंढराबद्दल चार मेंढरे परत करावीत.

2 “एखादा चोर घरफोडी करताना सापडला व त्याला मारत असताना तो मेला, तर मारणारा रक्तदोषी राहणार नाही.

3 पण ते जर सूर्योदय झाल्यावर घडले, तर मारणारा रक्तदोषी ठरेल. “ज्याने चोरी केली त्याने खचितच भरपाई करून द्यावी, पण त्याच्याकडे काहीही नसले, तर त्याला चोरीची भरपाई म्हणून विकून टाकावे.

4 त्याने चोरलेले बैल, गाढव किंवा मेंढरू त्याच्याजवळ जिवंत सापडले; तर त्याने त्याची दुपटीने भरपाई करावी.

5 “जर कोणी व्यक्ती आपली जनावरे दुसर्‍याच्या शेतात किंवा द्राक्षमळ्यात चरण्यासाठी मोकळी सोडतो, तर त्याने आपल्या स्वतःच्या शेतातील व द्राक्षमळ्यातील सर्वोत्तम पीक देऊन भरपाई करावी.

6 “कोणी जर विस्तव पेटविले आणि चुकून तो काट्यांच्या झुडूपात पसरून दुसर्‍याच्या धान्याची कोठारे किंवा उभे पीक किंवा संपूर्ण शेत जळून जाते, तर ज्याने विस्तव पेटविले त्याने नुकसान भरपाई करून द्यावी.

7 “जर कोणी चांदी किंवा सामान सुरक्षित राहावे म्हणून आपल्या शेजार्‍याकडे ठेवले आणि त्याची चोरी झाली, जर चोराला पकडले तर त्या चोराने त्या सामानाची दुप्पट भरपाई करून द्यावी.

8 पण जर चोर सापडला नाही तर घरमालकाने न्यायाधीशासमोर हजर व्हावे आणि शेजार्‍याच्या सामानावर त्याने हात टाकला नाही हे सिद्ध करावे.

9 एखादे बैल, गाढव, मेंढरू, वस्त्र किंवा एखादी हरवलेली वस्तू असे काहीही असो, ज्याबद्दल कोणी कलहाने बेकायदेशीरपणे म्हणतो की, ‘हे माझे आहे,’ तर त्या दोघांचाही वाद न्यायाधीशासमोर आणावा. ज्या कोणाला न्यायाधीश दोषी ठरवेल त्याने दुसर्‍याला दुपटीने परत करावे.

10 “जर कोणी आपले गाढव, बैल, मेंढरू किंवा कोणतेही जनावर आपल्या शेजार्‍याकडे सुरक्षित राहावे म्हणून ठेवले आणि ते मेले किंवा त्याला काही इजा झाली किंवा त्याच्यावर नजर नसताना त्याला कोणी घेऊन गेले,

11 तर शेजार्‍याने दुसर्‍याच्या जनावरावर हात टाकला नाही हे सिद्ध करण्यासाठी त्याने याहवेहसमोर शपथ घ्यावी. मालकाला यावर विश्वास ठेवावा लागणार आणि त्यासाठी कोणतीही रक्कम भरून द्यायची गरज नाही.

12 पण ते जनावर जर शेजार्‍याकडून चोरीला गेले, तर त्याने मालकाला भरपाई करून द्यावे.

13 जर एखाद्या जंगली श्वापदाने ते जनावर फाडून टाकले, तर त्या शेजार्‍याने त्या जनावराचे पार्श्वशरीर पुरावा म्हणून समोर आणावे आणि त्या फाडलेल्या जनावराची फेड करून देऊ नये.

14 “जर कोणी आपल्या शेजार्‍याकडून जनावर उसने घेतो व जनावराचा मालक तिथे नसताना ते जनावर जखमी झाले किंवा मेले, तर त्याने त्याची भरपाई त्याला द्यावी.

15 पण मालक जनावराबरोबर असला, तर भाडेकरूने त्याची भरपाई करू नये. जर त्याने ते भाड्याने घेतले असेल, तर त्याचे नुकसान भाड्यातच आलेले असते.


सामाजिक जबाबदारी

16 “जर एखादा मनुष्य मागणी न झालेल्या कुमारीला भुलवितो आणि तिचा विनयभंग करतो, तर त्याने वधूकिंमत द्यावी आणि ती त्याची पत्नी होईल.

17 पण जर तिच्या वडिलांनी ती त्याला देण्यास नाकारले, तरीही त्याने कुमारिकेची वधूकिंमत द्यावी.

18 “चेटकिणीला मुळीच जिवंत राहू देऊ नये.

19 “पशुशी लैंगिक संबंध करणार्‍याला अवश्य जिवे मारावे.

20 “याहवेह परमेश्वराशिवाय इतर दैवतांना अर्पणे करणार्‍यांचा नाश करून टाकावा.

21 “परदेशी व्यक्तीशी गैरवर्तणूक किंवा त्याला जाच करू नका, कारण तुम्हीही इजिप्त देशात परदेशी होता.

22 “विधवा किंवा अनाथाचा गैरफायदा घेऊ नये.

23 तुम्ही जर तसे केले आणि त्यांनी माझा धावा केला, तर मी खचितच त्यांचे रडणे ऐकेन.

24 मग माझा क्रोध पेटेल आणि मी तुम्हाला तलवारीने मारून टाकीन; आणि तुमची पत्नी विधवा व तुमची लेकरे अनाथ होतील.

25 “तुमच्यामध्ये असलेल्या माझ्या गरजवंत लोकांना जर तुम्ही उसने पैसे दिले, तर त्यांच्याशी सावकारी व्यवहार करू नका; व व्याज लावू नका.

26 तुम्ही आपल्या शेजार्‍याचे पांघरूण मागून घेतले, तर सूर्यास्तापूर्वी ते परत करा,

27 कारण तुमच्या शेजार्‍याजवळ पांघरावयाला तेवढेच असेल, तर ते रात्री काय घेऊन झोपतील? आणि जेव्हा ते माझ्याकडे धावा करतील, तेव्हा मी त्यांचे ऐकेन, कारण मी दयाळू आहे.

28 “तुम्ही परमेश्वराची निंदा करू नये किंवा तुमच्या लोकांच्या पुढार्‍यांपैकी कोणाला शाप देऊ नये.

29 “आपल्या धान्यातून किंवा आपल्या फळातून द्यावयाचे दान देण्यास विलंब करू नये. “आपला प्रथम जन्मलेला पुत्र तुम्ही मला समर्पण करावा.

30 बैल व मेंढे यांच्याविषयी सुद्धा असेच करावे. त्यांना सात दिवस त्यांच्या आईजवळ राहू द्यावे, परंतु आठव्या दिवशी ते मला द्यावे.

31 “तुम्ही माझे पवित्र लोक असावे. यास्तव हिंस्र श्वापदाने मारून टाकलेल्या प्राण्याचे मांस खाऊ नये; ते तुम्ही कुत्र्यांना घालावे.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan