Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

निर्गम 2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


मोशेचा जन्म

1 लेवी वंशातील एका पुरुषाने लेवी तरुणीशी विवाह केला.

2 आणि ती गरोदर राहिली आणि तिने मुलाला जन्म दिला. त्या बाळाचे रूप पाहून त्याच्या आईने त्याला तीन महिने लपवून ठेवले.

3 पण त्यानंतर त्याला ती लपवू शकत नव्हती, तेव्हा तिने त्याच्यासाठी लव्हाळ्याची एक टोपली घेतली, व तिला डांबर आणि चुन्याचा लेप लावला. मग तिने आपल्या बाळाला त्या टोपलीत ठेवले व ती टोपली तिने नाईल नदीच्या काठी लव्हाळ्यात नेऊन ठेवली.

4 बाळाचे पुढे काय होते हे पाहण्यासाठी त्याची बहीण दुरून त्याच्यावर नजर ठेऊन उभी राहिली.

5 फारोहची कन्या नाईल नदीवर स्नान करण्यासाठी गेली व तिच्या दासी नदीच्या कडेने चालत होत्या. तिने लव्हाळ्याजवळ एक टोपली पाहिली; तेव्हा ती टोपली आणण्यासाठी तिने आपल्या एका दासीला पाठविले.

6 तिने ती टोपली उघडली आणि त्यात एक बाळ रडत असल्याचे तिला दिसून आले. तिला त्याचा कळवळा आला. “हे बालक इब्री आहे,” ती म्हणाली.

7 तेवढ्यात त्या बाळाची बहीण फारोहच्या राजकन्येला म्हणाली, “या बाळाला दूध पाजण्यासाठी एखादी इब्री दाई मी तुमच्यासाठी शोधून आणू का?”

8 “होय, जा,” फारोहची कन्या तिला म्हणाली. त्या मुलीने जाऊन बाळाच्या आईला आणले.

9 फारोहची कन्या तिला म्हणाली, “या बाळाला घेऊन जा आणि माझ्यासाठी त्याला दूध पाज; याचे वेतन मी तुला देईन.” ती बाई त्या बाळाला आपल्या घरी घेऊन गेली व तिने त्याचे संगोपन केले.

10 पुढे बाळ मोठा झाल्यावर तिने त्याला फारोहच्या कन्येकडे आणले आणि तो तिचा पुत्र झाला. तिने त्याचे नाव मोशे असे ठेवले, कारण ती म्हणाली, “मी त्याला पाण्यातून बाहेर काढले.”


मोशे मिद्यान देशास पळून जातो

11 मोशे तरुण झाल्यानंतर, एक दिवस तो आपल्या लोकांना भेटायला गेला असताना त्याने त्यांना कष्टाने राबत असताना बघितले. इजिप्तचा एक मनुष्य त्याच्या इब्री बांधवाला मारहाण करीत असल्याचे मोशेने पाहिले.

12 आपल्याला कोणीही पाहत नाही, हे बघून त्याने त्या इजिप्ती मनुष्याला ठार केले आणि त्याला वाळूत लपवून टाकले.

13 दुसर्‍या दिवशी तो बाहेर गेला आणि त्याला दोन इब्री पुरुष मारामारी करताना दिसले. तेव्हा ज्याची चूक होती त्याला तो म्हणाला, “तू आपल्या इब्री सोबत्याला का मारत आहेस?”

14 तो मनुष्य त्याला म्हणाला, “तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश असे कोणी नेमले? तू इजिप्त देशाच्या मनुष्याला जसे मारून टाकलेस, तसे मलाही मारून टाकायचा तुझा विचार आहे काय?” तेव्हा मोशे घाबरला आणि त्याला वाटले, “मी जे काही केले ते सर्वांना माहीत झाले असणार.”

15 जेव्हा फारोहने हे ऐकले, त्याने मोशेला मारून टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु मोशे फारोहपासून पळून मिद्यानास राहवयाला गेला, तिथे जाऊन तो एका विहिरीजवळ बसला.

16 तिथे एका मिद्यानी याजकाच्या सात मुली होत्या, त्या आपल्या पित्याच्या कळपाला पाणी पाजण्यासाठी, व कुंडे भरून घेण्यासाठी विहिरीवर आल्या.

17 पण तिथे काही धनगर आले आणि त्यांनी मुलींना तिथून हाकलून लावले. पण मोशे उठला व मुलींच्या मदतीस आला आणि त्यांच्या मेंढरांना पाणी पाजले.

18 जेव्हा मुली आपले वडील रऊएल याकडे परत गेल्या, त्याने त्यांना विचारले, “आज इतक्या लवकर कशा आल्या?”

19 त्यांनी उत्तर दिले, “एका इजिप्ती व्यक्तीने आम्हाला मेंढपाळांपासून सोडविले; त्याने आमच्यासाठी विहिरीतून पाणी सुद्धा काढले आणि मेंढरांना पाजले.”

20 “तो कुठे आहे?” रऊएलाने आपल्या मुलींना विचारले, “त्याला तुम्ही का सोडून आला? काहीतरी खावे म्हणून त्याला आमंत्रण द्या.”

21 मोशेने त्या मनुष्यासह राहण्यास स्वीकारले. त्याने आपली मुलगी सिप्पोराह हिला मोशेची पत्नी म्हणून दिली.

22 सिप्पोराने एका मुलाला जन्म दिला आणि मोशेने त्याचे नाव गेर्षोम ठेवले, कारण मोशे म्हणाला, “मी विदेशात एक परदेशी झालो आहे.”

23 बराच काळ लोटल्यानंतर इजिप्तचा राजा मरण पावला. इस्राएली लोक क्लेशाने विव्हळत होते व आपल्या गुलामगिरीत रडून परमेश्वराचा धावा करीत होते; आणि त्यांच्या कष्टप्रद गुलामगिरीतील त्यांचा धावा परमेश्वराकडे पोहोचला.

24 परमेश्वराने त्यांचे रडणे ऐकले आणि अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याशी त्यांनी केलेल्या कराराचे त्यांना स्मरण झाले.

25 परमेश्वराने इस्राएली लोकांना पाहिले आणि त्यांना त्यांची आस्था वाटली.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan