Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

निर्गम 18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


इथ्रो मोशेला भेटतो

1 आता परमेश्वराने मोशे व त्यांच्या इस्राएली लोकांसाठी काय केले आणि याहवेहने इस्राएली लोकांना कशाप्रकारे इजिप्तमधून बाहेर आणले, याविषयी सर्वकाही मिद्यानी याजक व मोशेचा सासरा इथ्रो याने ऐकले.

2 मोशेने आपली पत्नी सिप्पोराहला व त्याच्या दोन मुलांना आपला सासरा इथ्रो याच्याकडे सोडले होते,

3 मोशेच्या एका मुलाचे नाव गेर्षोम असे होते; कारण मोशे म्हणाला, “मी परक्या देशात विदेशी झालो आहे.”

4 दुसर्‍या मुलाचे नाव एलिएजर असे ठेवले होते. कारण मोशे म्हणाला, “माझ्या वडिलांचे परमेश्वर माझे साहाय्य झाले; व त्यांनी मला फारोहच्या तलवारीपासून सोडविले.”

5 इथ्रो, मोशेचा सासरा, मोशेची पत्नी व मुलांसोबत, परमेश्वराच्या डोंगराजवळ रानात जिथे त्यांनी तळ दिला होता तिथे आला.

6 इथ्रोने मोशेला निरोप पाठविला, “मी तुझा सासरा इथ्रो, तुझी पत्नी व दोन मुले घेऊन तुझ्याकडे येत आहे.”

7 तेव्हा मोशे त्याच्या सासर्‍याला भेटायला बाहेर आला आणि नमन करून त्याचे चुंबन घेतले. ते एकमेकांना अभिवादन करून तंबूत गेले.

8 मोशेने आपल्या सासर्‍याला सर्वकाही सांगितले जे इस्राएली लोकांसाठी याहवेहने फारोह व इजिप्तच्या लोकांबरोबर केले आणि वाटेत ज्या अडचणी त्यांना आल्या आणि कशाप्रकारे याहवेहने त्यांची सुटका केली.

9 इजिप्तच्या लोकांच्या हातातून इस्राएलची सुटका करण्यासाठी याहवेहने जी चांगली कृत्ये केली, ती ऐकून इथ्रोला फार आनंद झाला.

10 इथ्रो म्हणाला, “याहवेहचे नाव धन्यवादित असो, ज्यांनी तुला इजिप्त व फारोहच्या तावडीतून सोडविले आणि ज्यांनी लोकांना इजिप्तच्या लोकांच्या हातातून सोडविले.

11 आता मला समजले की, याहवेह सर्व दैवतांपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण ज्यांनी इस्राएली लोकांना क्रूरतेने वागविले होते त्यांचा त्यांनी नाश केला आहे.”

12 मग मोशेचा सासरा इथ्रोने परमेश्वरासाठी होमार्पण व इतर अर्पणे आणली आणि अहरोन व इस्राएली लोकांचे सर्व वडील मोशेच्या सासर्‍याबरोबर भोजन करावयास परमेश्वराच्या समक्षतेत आले.

13 दुसर्‍या दिवशी मोशे इस्राएली लोकांचा न्याय करावयाला त्याच्या आसनावर बसला आणि लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्याभोवती उभे राहिले.

14 जेव्हा मोशे लोकांसाठी जे सर्व करीत होता ते त्याच्या सासर्‍याने पाहिले, तो म्हणाला, “हे तू लोकांसाठी काय करीत आहेस? तू एकटाच न्यायाधीश म्हणून का बसतोस व ते सर्व लोक दिवसभर तुझ्याभोवती उभे असतात?”

15 मोशे त्याला म्हणाला, “कारण लोक परमेश्वराची इच्छा जाणावी म्हणून माझ्याकडे येतात.

16 जेव्हा त्यांच्यात वाद होतात, ते माझ्याकडे आणतात आणि मी त्यांचा निर्णय करतो आणि त्यांना परमेश्वराचे विधी व नियम याबद्दल सांगतो.”

17 मोशेच्या सासर्‍याने उत्तर दिले, “तू जे करतोस ते बरोबर नाही.

18 तू व हे लोक जे तुझ्याकडे येतात, सर्वजण थकून जाल. हे काम तुझ्यासाठी खूप जड आहे; तू एकट्यानेच ते करणे तुला जमणार नाही.

19 तर आता तू माझे ऐक आणि मी तुला सल्ला देतो आणि परमेश्वर तुझ्याबरोबर असो. तू परमेश्वरासमोर या लोकांचा प्रतिनिधी म्हणून राहा आणि त्यांचे वाद परमेश्वरासमोर आण.

20 परमेश्वराचे विधी व नियम त्यांना शिकव आणि ज्या मार्गाने त्यांनी चालावे आणि त्यांचे वर्तन कसे असावे हे त्यांना दाखव.

21 पण या सर्व लोकांमधून सक्षम असे लोक—जे परमेश्वराचे भय बाळगणारे, विश्वसनीय, व अन्यायाच्या लाभाचा द्वेष करणारे असतील—ते निवडून घे; त्यांची हजारांवर, शंभरांवर, पन्नासांवर आणि दहांवर अधिकारी म्हणून नेमणूक कर.

22 त्यांनी सर्व समयी लोकांचे न्यायाधीश म्हणून असावे, परंतु प्रत्येक अवघड वाद तुझ्याकडे आणावा; आणि सोपे वाद त्यांच्या अधिकार्‍यांनी सोडवावेत. त्यामुळे तुझे ओझे हलके होईल, कारण ते तुझ्याबरोबर तुझा भार वाहतील.

23 जर तू असे केले आणि परमेश्वराने तुला आज्ञा केली, तर तुला सोपे जाईल आणि हे लोकसुद्धा समाधानी होऊन घरी जातील.”

24 मोशेने आपल्या सासर्‍याचे ऐकून सर्वकाही त्याने सांगितल्याप्रमाणे केले.

25 मोशेने संपूर्ण इस्राएलातून सक्षम अशी माणसे निवडली व त्यांना हजारांवर, शंभरांवर, पन्नासांवर व दहांवर प्रमुख व अधिकारी म्हणून नेमले.

26 त्यांनी सर्व समयी लोकांचे न्यायाधीश म्हणून सेवा केली. अवघड वाद त्यांनी मोशेकडे आणले, परंतु साधेसरळ वाद त्यांनीच सोडविले.

27 मग मोशेने आपल्या सासर्‍याचा निरोप घेतला आणि इथ्रो त्याच्या देशास परत निघून गेला.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan