Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

निर्गम 1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


इस्राएलाचा छळ

1 याकोबाबरोबर इजिप्तला गेलेल्या इस्राएलचे पुत्र, जे आपल्या कुटुंबासह गेले, त्यांची नावे ही आहेत:

2 रऊबेन, शिमओन, लेवी आणि यहूदाह;

3 इस्साखार, जबुलून आणि बिन्यामीन;

4 दान आणि नफताली; गाद व आशेर.

5 याकोबाचे एकूण सत्तर वंशज होते; योसेफ तर आधीच इजिप्तमध्ये गेला होता.

6 आता योसेफ आणि त्याचे सर्व भाऊ व ती सर्व पिढी मरण पावली.

7 परंतु इस्राएली लोक अत्यंत फलद्रूप झाले; ते बहुगुणित होऊन त्यांना पुष्कळ संतती झाली आणि त्यांची संख्या वाढून, लवकरच ते इतके असंख्य झाले की संपूर्ण देश त्यांनी व्यापून टाकला.

8 नंतर एक नवीन राजा इजिप्तच्या गादीवर आला, त्याच्या दृष्टीने योसेफ कोणीही नव्हता.

9 त्याने आपल्या लोकांना सांगितले, “पाहा, इस्राएली लोक संख्येने आपल्यापेक्षा जास्त आहेत.

10 चला त्यांच्याशी चातुर्याने वागू या, नाहीतर त्यांची संख्या अजून वाढेल, आणि लढाई झाली तर ते आपल्या शत्रूंशी एक होतील आणि देश सोडून जातील.”

11 म्हणून त्यांनी इस्राएली लोकांवर गुलाम मुकादम ठेवले व त्यांच्याकडून जुलमाने फारोहसाठी पीथोम व रामसेस ही भंडारांची नगरे बांधून घेतली.

12 परंतु जेवढा त्यांच्यावर अत्याचार केला गेला, तेवढे ते जास्त बहुगुणित झाले आणि पसरले; म्हणून इजिप्तच्या लोकांना इस्राएली लोकांचे भय वाटू लागले.

13 इजिप्तचे लोक इस्राएली लोकांकडून कठोरपणे कष्ट करून घेऊ लागले.

14 विटा व चुन्यातील कष्टाच्या कामाने त्यांचे जीवन कठीण केले आणि शेतातील प्रत्येक प्रकारच्या कष्टाच्या कामात त्यांच्याशी इजिप्तचे लोक कठोरतेने वागले.

15 इजिप्तच्या राजाने शिफ्राह व पुआह नावाच्या दोन इब्री सुइणींना अशी सूचना दिली की,

16 “इब्री स्त्रियांची प्रसूतीच्या तिवईवर मदत करीत असताना जर मुलगा जन्मला तर त्याला मारून टाका, परंतु मुलगी असली तर तिला जगू द्या.”

17 पण त्या सुइणी परमेश्वराचे भय धरणार्‍या होत्या, म्हणून त्यांनी इजिप्तच्या राजाने सांगितल्याप्रमाणे केले नाही; तर मुलांनाही जिवंत राहू दिले.

18 तेव्हा इजिप्तच्या राजाने त्या सुइणींना बोलावून विचारले, “तुम्ही असे का केले? तुम्ही मुलांना का जिवंत राहू दिले?”

19 सुइणींनी फारोह राजाला उत्तर दिले, “इब्री स्त्रिया इजिप्तच्या स्त्रियांप्रमाणे नाहीत; त्या सशक्त आहेत आणि आम्ही तिथे पोहचण्या आधीच बाळंत होतात.”

20 म्हणून परमेश्वराने त्या सुइणींना आशीर्वाद दिला आणि इस्राएली लोक बहुगुणित झाले व संख्येने फार अधिक झाले.

21 या सुइणींनी परमेश्वराचे भय धरल्यामुळे परमेश्वराने त्यांची कुटुंबे स्थापित केली.

22 मग फारोहने आपल्या सर्व लोकांना हुकूम दिला, “इब्य्रांना होईल तो प्रत्येक मुलगा नाईल नदीत फेकून द्यावा, परंतु प्रत्येक मुलीला जिवंत राहू द्यावे.”

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan