इफिसकरांस 5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 परमेश्वराची प्रिय लेकरे या नात्याने तुम्ही परमेश्वराचा कित्ता गिरवावा. 2 ज्याप्रमाणे ख्रिस्ताने आपल्यावर प्रीती केली आणि स्वतःला आपल्यासाठी सुगंधी अर्पण व यज्ञ म्हणून परमेश्वराला दिले त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीच्या मार्गाने चला. 3 तुमच्यामध्ये लैंगिक पापे, कोणत्याही प्रकारची अशुद्धता किंवा लोभ यांची अप्रत्यक्ष सूचना देखील असू नये, कारण या गोष्टी परमेश्वराच्या पवित्र लोकांसाठी अयोग्य आहेत. 4 आणि अश्लीलता, मूर्खपणाचे बोलणे, असभ्य विनोद यांचे तुम्हामध्ये स्थान नसावे, ते उचित नाहीत, त्याऐवजी उपकारस्तुती व्हावी. 5 तुम्ही या गोष्टीविषयी खात्री बाळगा: व्यभिचारी, अशुद्ध किंवा लोभी असा व्यक्ती मूर्तिपूजक आहे, त्यास ख्रिस्ताच्या आणि परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळणार नाही. 6 पोकळ शब्दांनी कोणी तुम्हाला फसवू नये, या गोष्टींमुळे आज्ञाभंग करणार्यांवर परमेश्वराचा क्रोध भडकतो. 7 यास्तव तुम्ही त्यांचे भागीदार सुद्धा होऊ नका. 8 कारण पूर्वी तुम्ही अंधकार होता, परंतु आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश आहात. प्रकाशाच्या लेकरांसारखे जगा. 9 (प्रकाशाचे फळ सर्वप्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता यामध्ये आहे.) 10 प्रभू कशाने प्रसन्न होतात याचा शोध घ्या. 11 अंधकाराच्या निष्फळ कर्मांशी तुम्हाला काहीच करावयाचे नाही, त्याऐवजी ते उघडकीस आणा. 12 अवज्ञा करणारे जे गुप्तपणे करतात, त्यांचा उल्लेख करणे देखील लज्जास्पद होईल. 13 परंतु प्रकाशाद्वारे सर्वकाही उघड होते, ते दृष्टीस पडते आणि जे सर्वकाही प्रकाशित केलेले आहे ते प्रकाश असे होते. 14 त्यामुळेच असे म्हटले आहे: “अरे निद्रास्ता, जागा हो, मेलेल्यामधून ऊठ म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशतील.” 15 म्हणून तुम्ही अज्ञानी नव्हे तर ज्ञानी लोकांसारखे वागण्याची काळजी घ्या. 16 दिवस कठीण आहेत, म्हणून प्रत्येक संधीचा उपयोग करून घ्या. 17 मुर्खासारखे वागू नका, तर प्रभूची इच्छा काय आहे ते समजून घ्या. 18 मद्यपान करून धुंद होऊ नका, ज्यामुळे अनीती वाढते. त्याऐवजी आत्म्याने परिपूर्ण व्हा. 19 आत्म्याने प्रेरित स्तोत्रे, गाणी आणि आत्मिक गीते गाऊन एकमेकांशी बोला. भजने गाऊन व संगीताद्वारे तुमच्या मनापासून प्रभूची स्तुती करा. 20 आपले प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाने आपले परमेश्वर आणि पिता यांचे प्रत्येक गोष्टीसाठी नेहमी उपकार माना. ख्रिस्ती कुटुंबांसाठी सूचना 21 ख्रिस्ताबद्दल असलेल्या आदरामुळे एकमेकांच्या अधीन राहा. 22 पत्नींनो, जसे प्रभूच्या, तसेच तुम्ही तुमच्या पतीच्या अधीन असा. 23 कारण ज्याप्रमाणे पती हा पत्नीचे मस्तक आहे, तर ख्रिस्त हा त्यांचे शरीर म्हणजे, मंडळीचे मस्तक, तिचा तो उद्धारकर्ता आहे. 24 आता मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन राहते, तसेच पत्नींनी सुद्धा प्रत्येक बाबतीत त्यांच्या पतीच्या अधीन राहवे. 25 पतींनो, तुम्हीही आपल्या पत्नीवर प्रीती केली पाहिजे, ज्याप्रमाणे ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती करून स्वतःस तिच्यासाठी अर्पण केले, 26 जेणेकरून मंडळीला वचनरुपी पाण्याने धुवून शुद्ध करून तिला पवित्र करावे; 27 आणि त्याने ती मंडळी गौरवी, डाग किंवा सुरकुती किंवा दोषरहित अशी आपणाला सादर करावी, ती पवित्र आणि निष्कलंक असावी. 28 याचप्रमाणे पतींनीही त्यांच्या पत्नीवर, त्या आपलेच शरीर आहेत, असे समजून प्रीती करावी. जो त्याच्या पत्नीवर प्रीती करतो, तो स्वतःवर प्रीती करतो. 29 कोणी कधीही स्वतःच्याच शरीराचा द्वेष केला नाही, परंतु ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीचे संगोपन करून काळजी घेतात त्याप्रमाणे करतो. 30 कारण आपण त्यांच्या शरीराचे अवयव आहोत. 31 “या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील.” 32 हे गूढ रहस्य आहे, परंतु मी ख्रिस्ताबद्दल आणि मंडळीबद्दल बोलत आहे. 33 म्हणून तुम्ही प्रत्येकाने जशी आपणावर तशीच आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि पत्नीनेही आपल्या पतीचा सन्मान करावा. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.