इफिसकरांस 4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीमंडळीमध्ये ऐक्य व परिपक्वता 1 प्रभूसाठी बंदिवान म्हणून, मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो, की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे जीवन जगावे. 2 पूर्ण नम्रतेने आणि सौम्यतेने; सहनशीलतेने, प्रीतीने एकमेकांचे सहन करा. 3 शांतीच्या बंधनात व पवित्र आत्म्याद्वारे ऐक्य टिकविण्यास झटावे. 4 जसे एक शरीर व एक आत्मा, तसेच आपल्याला एकाच गौरवी आशेसाठी पाचारण करण्यात आले होते. 5 एक प्रभू, एक विश्वास, एक बाप्तिस्मा; 6 एकच परमेश्वर असून ते सर्वांचे पिता आहेत. तेच सर्वांवर, सर्वांमधून आणि सर्वांमध्ये आहेत. 7 तरी आपल्यापैकी प्रत्येकाला, ख्रिस्ताने नेमल्याप्रमाणे कृपा देण्यात आली आहे. 8 यामुळे असे म्हटले आहे: “जेव्हा त्यांनी उच्चस्थानी आरोहण केले, त्यांनी अनेक बंदिवान नेले आणि त्यांच्या लोकांना दाने दिली.” 9 “त्यांचे आरोहण झाले” याचा अर्थ काय? की ते खाली पृथ्वीच्या अधोभागात उतरले होते. 10 जे अधोभागात उतरले त्यांनी पूर्ण सृष्टी भरून जाण्याच्या उद्देशाने स्वर्गाच्या उच्च स्थानापर्यंत सन्मानाने आरोहण केले. 11 म्हणून ख्रिस्ताने स्वतः मंडळीला काही प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक म्हणून दिले, 12 हे यासाठी की त्यांच्या लोकांना सेवेच्या कार्यात सिद्ध करून ख्रिस्ताचे शरीर सुसज्ज व्हावे. 13 जोपर्यंत आपण सर्व विश्वास आणि परमेश्वराच्या पुत्राच्या ज्ञानामध्ये एकता, परिपक्वता व ख्रिस्ताची परिपूर्णता यापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत हे दिले आहे. 14 आता यापुढे आपण बाळांसारखे असू नये, आणि तर्हेतर्हेच्या शिक्षणरूपी वार्याने, मनुष्यांच्या धूर्तपणाने व कपटाने फसविले जाऊन लाटांनी इकडे तिकडे वाहणारे व हेलकावे खाणारे होऊ नये. 15 त्याऐवजी प्रीतीमध्ये सत्य बोलत असताना, आपण प्रत्येक गोष्टींमध्ये ख्रिस्त ज्यांचे मस्तक आहेत, त्यांचे परिपक्व शरीर होण्यासाठी वाढत जावे. 16 त्यांच्यापासून संपूर्ण शरीर प्रत्येक सांध्याशी एकत्र जोडून धरले जाते, प्रत्येक अवयव आपले कार्य करतो व प्रीतीमध्ये शरीराची वाढ व बांधणी होते. ख्रिस्ती जीवनासंबंधी सूचना 17 प्रभूच्या वतीने मी तुम्हाला आग्रहाने सांगतो की तुम्ही येथून पुढे ज्यांचे विचार भ्रष्ट झाले आहेत अशा गैरयहूदीयांसारखे जगू नका. 18 कारण त्यांचे विचार व बुद्धी अंधकारमय झाली असून, ते त्यांच्या हृदयाच्या कठीणपणामुळे अज्ञानी झाले आहेत व परमेश्वराच्या जीवनापासून दूर गेले आहेत. 19 सर्वसाधारण अकलेचा त्यांना गंध राहिला नाही, त्यांनी स्वतःला कामुकता व सर्व अशुद्धतेच्या स्वाधीन केले असून ते लोभाने भरलेले आहेत. 20 पण अशाप्रकारे जीवनाचा मार्ग तुम्ही शिकला नाही तर, 21 जेव्हा तुम्ही ख्रिस्ताबद्दल ऐकले आणि येशूंमध्ये जे सत्य आहे त्याबद्दल तुम्ही शिकला आहात; 22 फसवणुकीच्या इच्छेने भ्रष्ट होत आलेला जुना मनुष्य काढून टाकणे, हे तुम्ही शिकला आहात; 23 तुमची मनोवृत्ती नवी केली जावी; 24 आणि खरे नीतिमत्व व पवित्रता यामध्ये परमेश्वरासारखा उत्पन्न केलेला नवा स्वभाव तुम्ही परिधान करावा. 25 यास्तव तुम्ही प्रत्येकजण एकमेकांशी लबाडी करण्याचे सोडून, आपल्या शेजार्यांशी सत्य बोला, कारण आपण सर्व एकाच शरीराचे अवयव आहोत. 26 “तुम्ही रागावले असला तरी पाप करू नका.” तुम्ही रागात असताना सूर्य मावळू देऊ नका. 27 आणि सैतानाला पाय ठेवण्यास जागा देऊ नका. 28 चोरी करणार्यांनी चोरी न करता आपल्या हातांनी चांगले व उपयोगी असे काम करावे, म्हणजे गरजवंत लोकांना देण्याकरिता त्यांच्याजवळ काहीतरी असेल. 29 आपल्या मुखाद्वारे अपायकारक शब्द बाहेर पडू देऊ नका. परंतु प्रसंगाला अनुसरून ऐकणार्यांसाठी उपयुक्त व त्यांच्या वृद्धीसाठी कारणीभूत होईल असे बोला. 30 परमेश्वराच्या पवित्र आत्म्याला दुःखी करू नका, कारण त्याच्याद्वारे तुम्ही खंडणीच्या दिवसासाठी शिक्का मारलेले आहात. 31 सर्वप्रकारचा कडूपणा, संताप आणि राग, भांडणे आणि निंदानालस्ती याबरोबरच सर्वप्रकारचा द्वेषभाव सोडून द्या. 32 एकमेकांना दयाळू व कनवाळूपणे वागवा; जशी परमेश्वराने तुम्हाला ख्रिस्तामध्ये क्षमा केली, तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.