इफिसकरांस 3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीगैरयहूदीयांसाठी परमेश्वराची अद्भुत योजना 1 याकारणास्तव, मी पौल, तुम्हा गैरयहूदीयांसाठी ख्रिस्त येशूंचा बंदिवान आहे. 2 तुम्हाकरिता परमेश्वराच्या कृपेची व्यवस्था जी मला देण्यात आली आहे याबाबत तुम्ही ऐकले आहे. 3 अर्थात् हे रहस्य मला प्रकटीकरणाद्वारे समजले, याबद्दल मी यापूर्वी थोडक्यात लिहिले आहे. 4 ते वाचल्यानंतर, ख्रिस्ताचे जे रहस्य आहे, त्याबद्दल मला झालेले ज्ञान तुम्हाला समजेल. 5 हे रहस्य इतर पिढींच्या लोकांना प्रकट केले गेले नव्हते, पण आता त्यांनी आपल्या पवित्र प्रेषित व संदेष्टे यांना परमेश्वराच्या आत्म्याद्वारे प्रकट केले आहे. 6 हे रहस्य असे आहे: शुभवार्तेद्वारे गैरयहूदीही इस्राएली लोकांबरोबर सहवारस, एका शरीराचे अवयव, आणि ख्रिस्त येशूंमध्ये अभिवचनाचे सहभागी असे आहेत. 7 परमेश्वराच्या कृपेच्या वरदानाने व सामर्थ्याच्या कृतीने मी या शुभवार्तेचा सेवक झालो आहे. 8 मी जो प्रभूच्या लोकांमध्ये लहानात लहान, त्या मला गैरयहूदीयांना ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीच्या शुभवार्तेचा प्रचार करण्याची कृपा देण्यात आली. 9 ज्यांनी सर्वकाही निर्माण केले त्या परमेश्वरामध्ये युगानुयुगांपासून गुप्त ठेवलेले ते रहस्य प्रकट करण्याची व्यवस्था केली. 10 यासाठी की आता मंडळीद्वारे, आकाशमंडळातील शासक आणि अधिकार्यांना परमेश्वराचे विविध ज्ञान कळावे हाच त्यांचा उद्देश होता, 11 हा त्यांच्या युगानुयुगाचा उद्देश ख्रिस्त येशू आपला प्रभू यामध्ये पूर्ण व्हावा. 12 येशूंमध्ये आणि त्यांच्यावरील विश्वासाद्वारे आम्ही पूर्ण स्वातंत्र्याने आणि आत्मविश्वासाने परमेश्वराजवळ जाऊ शकतो. 13 म्हणून तुमच्यासाठी जे दुःख मला सहन करावे लागत आहे यामुळे तुम्ही मुळीच निराश होऊ नका, कारण ते तुमचे गौरव आहे. इफिसकरांसाठी प्रार्थना 14 या कारणासाठी मी पित्यासमोर गुडघे टेकतो, 15 स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक कुटुंबाला त्यांच्याद्वारे नाव देण्यात आले आहे. 16 मी प्रार्थना करतो की आपल्या गौरवशाली संपत्तीनुरूप आपल्या पवित्र आत्म्याचे सामर्थ्य देऊन त्यांनी तुम्हाला अंतर्यामी शक्तिसंपन्न करावे. 17 ज्यामुळे ख्रिस्त विश्वासाद्वारे तुमच्या हृदयात राहतील व तुम्ही प्रीतीमध्ये खोल मुळावलेले व स्थिर व्हावे अशी मी प्रार्थना करतो, 18 आणि तुम्हाला प्रभूच्या सर्व पवित्र लोकांबरोबर ख्रिस्ताच्या प्रेमाची लांबी, रुंदी, खोली व उंची किती आहे हे समजून घेण्यास समर्थ होता यावे, 19 आणि ही प्रीती जी ज्ञानापलीकडे आहे, ती तुम्हाला समजावी, यासाठी की तुम्ही स्वतः परमेश्वराच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे. 20 आता जे आपल्या सामर्थ्यानुसार आमच्यामध्ये कार्य करीत आहेत आणि आमच्या मागण्या किंवा कल्पना यांच्या पलीकडे अधिक विपुलतेने करण्यास समर्थ आहेत, 21 त्यांना मंडळीमध्ये आणि ख्रिस्त येशूंमध्ये सर्व पिढ्यान् पिढ्या सदासर्वकाळ गौरव असो. आमेन. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.