इफिसकरांस 2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीख्रिस्तामध्ये जिवंत केलेले 1 तुम्ही स्वतःच्या पातकांमध्ये व अपराधांमध्ये मृत झालेले होता. 2 त्यामध्ये तुम्ही जगाच्या रीतीप्रमाणे वागत होता व आकाशमंडळातील शासक आत्मा जो प्रत्यक्ष या क्षणीही आज्ञा न पाळणार्यांमध्ये कार्य करीत आहे, त्याच्यामागे चालणारे होता. 3 एकेकाळी आपणही त्यामध्ये जगत होतो. आपल्यामधील दैहिक वासना आणि विचार यांचे अनुसरण करणार्यांप्रमाणेच नैसर्गिकरित्या परमेश्वराच्या क्रोधास पात्र होतो. 4 परंतु परमेश्वर हे दयेचे सागर आहेत व आपल्यावरील त्यांच्या अपरंपार प्रीतीमुळे, 5 आपण आपल्या अपराधांमध्ये मृत झालो असताना त्यांनी ख्रिस्तामध्ये आपणास जिवंत केले व कृपेनेच तुमचे तारण झाले आहे. 6 आणि परमेश्वराने आपल्याला ख्रिस्त येशूंमध्ये उठवून स्वर्गीय राज्यात त्यांच्याबरोबर बसविले आहे. 7 यासाठी की ख्रिस्त येशूंमध्ये त्यांची आपल्यावरील दया व येणार्या युगांमध्ये त्यांची कृपा किती अतुलनीय आहे हे आपणास दाखवावे. 8 कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्याकडून झाले नाही तर ते परमेश्वराचे दान आहे, 9 कृत्याद्वारे नव्हे; त्यामुळे कोणी गर्व करू शकत नाही. 10 कारण परमेश्वराने पूर्वीच आमच्यासाठी नेमून ठेवलेली चांगली कृत्ये करण्याकरिता आम्ही ख्रिस्त येशूंमध्ये घडविलेली परमेश्वराची हस्तकृती आहोत. यहूदी आणि गैरयहूदीयांचा ख्रिस्तात समेट 11 यास्तव, आठवण ठेवा की जे आपण पूर्वी जन्माने गैरयहूदी व सुंता झालेल्याकडून असुंती समजले जात होतो, ती सुंता शरीरात मनुष्यांच्या हाताने केली जात असे. 12 लक्षात असू द्या, त्या दिवसांमध्ये तुम्ही ख्रिस्तापासून अलिप्त, इस्राएलाच्या नागरिकत्वापासून वेगळे केलेले, कराराच्या वचनाला परके, आणि जगात परमेश्वरावाचून व आशेवाचून जगत होता. 13 जे तुम्ही एकेकाळी खूप दूर होता, त्या तुम्हाला आता ख्रिस्त येशूंमध्ये, त्यांच्या रक्ताद्वारे निकट आणले आहे. 14-15 कारण ते स्वतःच आपली शांती आहेत, त्यांनी दोन गटास एक केले आणि त्यांना विभक्त करणारी शत्रुत्वाची भिंत पाडली. त्यांनी आपल्या देहाने नियमशास्त्राला त्यांच्या आज्ञापालन व विधीसहित दूर केले. यात त्यांचा उद्देश हा होता की या दोघांमधून स्वतःसाठी एक नवा मनुष्य उत्पन्न करून शांती प्रस्थापित करावी. 16 कारण त्यांनी क्रूसाद्वारे वैरभाव नाहीसा करून व दोघांना एक शरीर करून परमेश्वराशी समेट घडवून आणला. 17 तुम्ही जे त्यांच्यापासून फार दूर होते आणि जे जवळ होते, अशा दोघांसाठी ते आले व त्यांनी शांतीचा प्रचार केला. 18 कारण त्यांच्याद्वारे आम्हा दोघांनाही एकाच आत्म्याद्वारे पित्याजवळ येण्याचे स्वातंत्र्य आहे. 19 या कारणाने तुम्ही आता परदेशी आणि परके नाही, तर परमेश्वराच्या लोकांबरोबर सहनागरिक आणि त्यांच्या कुटुंबाचे सदस्य झाला आहात. 20 तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे यांच्या भक्कम पायावर बांधलेले आहात, ज्याची मुख्य कोनशिला ख्रिस्त येशू आहेत. 21 त्यांच्यामध्ये पूर्ण इमारत एकत्र जोडली जात असताना वाढत जाऊन प्रभूचे पवित्र मंदिर होत आहे. 22 त्याचप्रमाणे तुम्हीही पवित्र आत्म्याद्वारे एकत्र बांधले गेले असताना परमेश्वराचे वसतिस्थान झाला आहात. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.