Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

उपदेशक 4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


जुलूम, कष्ट, मैत्रीहीनता

1 मी पुन्हा पाहिले आणि मला सूर्याखाली होत असलेला जुलूम दिसला: पीडितांचे अश्रू मी पाहिले— आणि त्यांचे सांत्वन करणारा असा कोणी नाही. छळ करणार्‍यांच्या हाती अधिकार होते— आणि त्यांचे सांत्वन करणारे कोणी नव्हते.

2 यावरून मी घोषित केले, मृत असलेल्या व्यक्ती, जिवंत असलेल्या माणसांपेक्षा अधिक संतुष्ट आहेत.

3 परंतु त्या दोघांपेक्षाही जो जन्मालाच आला नाही तो अधिक बरा. सूर्याखाली असलेले जे वाईट ते त्यांच्या पाहण्यात आले नाही.

4 आणि मी हे पाहिले की, एखाद्याला दुसर्‍याविषयी असलेल्या मत्सराच्या भावनेतून कष्ट आणि सर्व यश संपादन करता येते. हे सुद्धा व्यर्थच आहे, वार्‍यामागे धावल्यासारखे आहे.

5 मूर्ख तर हात बांधून बसतात आणि स्वतःचा नाश करून घेतात.

6 अधिक कष्ट करून वार्‍याच्या मागे धावून, दोन्ही हात भरून घेण्यापेक्षा, शांती समाधानाने एक हात भरून घेणे योग्य आहे.

7 पुन्हा एकदा या सूर्याखाली निरर्थक असे काहीतरी मी पाहिले:

8 एक एकटाच मनुष्य होता; त्याला ना मुलगा होता ना भाऊ. त्याच्या श्रमाला अंत नव्हता, तरी त्याच्या डोळ्यात धनाने तृप्तता नव्हती. तो विचारीत होता, “मी कोणासाठी हे श्रम करीत आहे,” “आणि मी स्वतःला आनंदापासून का वंचित ठेवीत आहे?” हे सुद्धा व्यर्थ आहे— ही दैन्यावस्था आहे.

9 एकापेक्षा दोघेजण बरे! कारण त्यांच्या कष्टाचे अधिक चांगले प्रतिफळ मिळेल:

10 दोघांपैकी एकजण पडला, तर दुसरा त्याला मदत करून उठवेल, परंतु एकजण पडला आणि त्याला उचलण्यास कोणी नसला तर ते दयनीय आहे.

11 जेव्हा दोन व्यक्ती झोपतील तेव्हा ते एकमेकांना ऊब देतील, पण कोणी एकटा असल्यास, त्याला ऊब कशी मिळणार?

12 एकट्या व्यक्तीवर मात करता येते, दोघे स्वतःचा बचाव करू शकतात, तीन पदरी दोर सहजपणे तुटत नाही.


प्रगती निरर्थक आहे

13 मूर्ख आणि संभाव्य संकटाचा इशारा न समजणारा राजा असण्यापेक्षा, गरीब परंतु सुज्ञ तरुण असणे चांगले.

14 तो तरुण तुरुंगातून राज्यपदावर आला असेल किंवा त्या राज्यात गरिबीत जन्मला असेल.

15 मी हे पाहिले की या सूर्याखाली जे जिवंत आहेत ते त्या तरुणाचे अनुकरण करतात, जो राज्याचा उत्तराधिकारी आहेत.

16 त्यांच्या पूर्वी असंख्य लोक होते. परंतु जे नंतर आले ते त्या उत्तराधिकाऱ्याशी संतुष्ट नव्हते. हे सर्वसुद्धा व्यर्थच, वार्‍याचा पाठलाग करण्यासारखे आहे.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan