Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

अनुवाद 33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


मोशे इस्राएली गोत्रांना आशीर्वाद देतो

1 परमेश्वराचा मनुष्य मोशेने आपल्या मरणापूर्वी इस्राएली लोकांना आशीर्वाद जाहीर केले.

2 तो म्हणाला: “याहवेह सीनाय पर्वतावरून आले आणि सेईरावर ते सूर्याप्रमाणे उदय पावले; पारान पर्वतावरून ते प्रकाशले. असंख्य पवित्र जनांचा समुदाय त्यांच्याबरोबर होता. दक्षिण दिशेने, त्यांच्या पर्वत उतरणीवरून ते खाली आले.

3 निश्चित तुम्हीच आपल्या लोकांवर प्रीती करता; सर्व पवित्रजन तुमच्या अधीन आहेत. ते तुमच्या चरणाशी नमन करतात, आणि तुमच्याकडून ते आज्ञा स्वीकारतात,

4 मोशेने आम्हाला जे नियम दिले, ते नियम याकोबाच्या सभेचे अमोल वतन आहे.

5 इस्राएलच्या गोत्रांबरोबर जेव्हा इस्राएलच्या लोकांचे पुढारी एकत्र जमले, तेव्हा याहवेह यशुरून लोकांचे राज्यकर्ता झाले.

6 “रऊबेन जिवंत राहो व त्यास मृत्यू न येवो, त्याची माणसे कमी न होवोत.”

7 आणि तो यहूदाहबद्दल असे म्हणाला: “हे याहवेह, यहूदाहचा धावा ऐका; आणि त्याला आपल्या लोकांजवळ आणा. स्वतःच्या हाताने ते त्याचे संरक्षण करतात, तुम्हीच त्याच्यासाठी त्याच्या शत्रूविरुद्ध साहाय्य व्हा!”

8 मग तो लेवी विषयी म्हणाला: “तुमचे उरीम व थुम्मीम, तुमच्या विश्वसनीय लोकांच्या अधिकारात कायम राहोत. ज्यांची तुम्ही मस्सा येथे परीक्षा घेतली; आणि मरीबाहच्या झर्‍याजवळ तुम्ही त्यांच्याशी झुंज दिली.

9 आपले आई आणि वडील यांच्याबद्दल त्याने म्हटले, ‘ते माझे कोणीही नाहीत.’ त्याने आपल्या बांधवांना ओळखले नाही, किंवा आपल्या संततीस ओळखले नाही, परंतु त्याने तुमच्या आज्ञांचे पालन केले, आणि तुमच्या कराराशी ते प्रामाणिक राहिले.

10 ते तुमचे विधी याकोबाला, आणि तुमचे नियमशास्त्र इस्राएली लोकांना शिकवतील. धूपाच्या वेदीवर ते धूप जाळतील, व तुमच्या वेदीवर संपूर्ण होमबली अर्पितील.

11 हे याहवेह, त्यांचे सर्व कौशल्य आशीर्वादित करा, आणि त्यांची हस्तकृती तुम्हाला प्रसन्न करो. त्यांच्याविरुद्ध जे उठतात त्यांना चिरडून टाका, आणि ते पुन्हा उठणार नाहीत, असे करा.”

12 मोशे बिन्यामीनाबद्दल म्हणाला: “याहवेहचा लाडका त्यांच्याजवळ सुरक्षित राहो, कारण दिवसभर याहवेह त्याची ढाल होऊन त्याला आपली सुरक्षा प्रदान करतात, आणि जो याहवेहला प्रिय आहे तो त्यांच्या दोन्ही खांद्यामध्ये सुरक्षित आहे.”

13 तो योसेफाबद्दल म्हणाला: “याहवेह स्वर्गातील मौल्यवान दवाने, आणि पृथ्वीच्या खोलात असलेल्या जलाने त्याच्या भूमीला आशीर्वादित करोत;

14 सूर्यप्रकाशाने मिळणारे उत्तम उत्पादन, आणि चंद्राच्या प्रभावाने मिळणाऱ्या उत्तम गोष्टी त्याला प्राप्त होवो;

15 प्राचीन पर्वतामधून प्राप्त होणार्‍या सर्वोत्तम वस्तूंनी आणि सनातन डोंगरातून मिळणार्‍या निवडक फळांनी भरून जावो;

16 जी पृथ्वीच्या विपुलतेची सर्वोत्तम भेट, आणि जळत्या झुडूपातून बोलणार्‍या त्या प्रभूच्या कृपादृष्टीने तो समृद्ध होवो. योसेफाच्या व त्याच्या वंशजाच्या मस्तकावर हे सर्व आशीर्वाद येवोत, जो आपल्या भाऊबंदांत प्रमुख होता.

17 प्रथम जन्मलेल्या बैलासारखे त्याचे वैभव आहे; त्याची शिंगे रानबैलाची शिंगे आहेत, त्या शिंगानी तो राष्ट्रांना, पृथ्वीच्या दिगंती असलेल्यांना देखील भोसकतो. एफ्राईमाचे लाखो वंशज आणि मनश्शेहचे हजारो वंशज असे आहेत.”

18 जबुलूनाविषयी तो म्हणाला: “जबुलूना, तुझा प्रवास तुझ्यासाठी आनंदाचा होवो आणि तू इस्साखारा, आपल्या डेऱ्यात उल्हास करो.

19 ते लोकांना डोंगरावर बोलवतील व तिथे न्याययुक्त अशी यज्ञार्पणे वाहतील; समुद्रातून मिळविलेल्या उत्पन्नाचे ते स्वामी होतील, वाळूतून आपले गुप्तधन काढतील.”

20 गादाविषयी तो म्हणाला: “धन्य आहे गादाचा विस्तार! गाद सिंहासारखा जीवन जगतो, झडप घालून तो भुजा आणि डोके फोडतो.

21 त्याने स्वतःसाठी सर्वाेत्तम अशी भूमी निवडली आहे; पुढार्‍यासाठी राखून ठेवलेली जमीन त्याला मिळाली आहे. वंशपित्यांच्या सभेत त्याने इस्राएलाकरिता याहवेहच्या नीतिपर इच्छेचे आणि याहवेहच्या न्यायाचे पालन केले.”

22 दानाविषयी तो म्हणाला: “दान हा सिंहाच्या छाव्यासारखा आहे, बाशानातून तो सिंहासारखी झेप घेतो.”

23 नफताली विषयी तो म्हणाला: “नफताली याहवेहच्या सर्व आशीर्वादांनी तृप्त आहे आणि त्यांच्या कृपेत परिपूर्ण आहे; तो सागरापर्यंतचा दक्षिण भाग वतन करून घेईल.”

24 आशेराविषयी तो म्हणाला: “आशेर हा पुत्रांपैकी सर्वात धन्य आहे; त्याला सर्व भावांची कृपादृष्टी प्राप्त होवो आणि त्याचे पाय तेलाने धुतले जावोत.

25 लोखंड आणि काशांच्या अडसरांनी त्याच्या शहराचे रक्षण होवो, आणि तुझे सामर्थ्य तुझ्या जीवनमानाइतके असो.

26 “यशुरूनच्या परमेश्वरासमान कोणी नाही, ते आपल्या वैभवाच्या मेघावर आरूढ होऊन, आकाशमंडळातून तुझ्या साहाय्यार्थ धावून येतात.

27 सनातन परमेश्वर तुमचा आश्रय आहे, आणि सनातन बाहू तुझ्याखाली आहेत. तुझ्या शत्रूंना ते तुझ्यापुढून घालवून देतात, ‘त्यांचा नाश करा!’ असा ते आदेश देतात.

28 म्हणून इस्राएल सुरक्षितेत जगेल; याकोबास संरक्षण प्राप्त होईल, धान्य आणि नव्या द्राक्षारसाने समृद्ध असलेल्या आणि आकाशातील जलांच्या दवबिंदूंनी सिंचित होणार्‍या भूमीत तो सुरक्षित राहील.

29 इस्राएला, तू आशीर्वादित आहेस! इतर कोणत्या लोकांना याहवेहने वाचविले आहे काय? तेच तुझी ढाल व तुझे साहाय्य आहेत आणि तुझ्या वैभवाची तलवार आहेत. तुझे शत्रू तुझ्यापुढे थरथर कापतील, आणि तू त्यांची उच्च स्थाने पायाखाली तुडवशील!”

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan