अनुवाद 24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 कोणा पुरुषाने एखाद्या स्त्रीसोबत विवाह केला, परंतु नंतर तो तिच्यासोबत संतुष्ट होत नाही आणि त्याला तिच्यात काही दोष आढळला, तर त्याने सूटपत्र लिहून तिच्या हाती द्यावे आणि तिला आपल्या घरातून घालवून द्यावे, 2 आणि त्याचे घर सोडल्यानंतर ती दुसर्या पुरुषाची पत्नी होते, 3 आणि तिच्या दुसर्या पतीलाही ती आवडली नाही व त्यानेही तिच्या हाती सूटपत्रे देऊन तिला घालवून दिले किंवा तो मरण पावला, 4 तर तिच्या पहिल्या पतीने तिला पत्नी म्हणून पुन्हा स्वीकारू नये, कारण ती भ्रष्ट झालेली आहे. अशा स्त्रीशी विवाह करणे ही गोष्ट याहवेहच्या दृष्टीने अमंगळ अशी आहे. याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला वतन म्हणून देत असलेल्या देशावर पाप आणू नका. 5 नुकतेच विवाह झालेल्या पुरुषाला सैन्याबरोबर मोहिमेवर पाठवू नये किंवा त्याच्यावर इतर कुठलीही जबाबदारी टाकू नये. त्याला वर्षभर घरी राहण्याची मोकळीक असावी आणि त्याने घरी राहून आपल्या विवाहित पत्नीला आनंदित करावे. 6 तुम्ही एखाद्या मनुष्याला काही उसने देता—तेव्हा जाते किंवा जात्याची तळी गहाण म्हणून ठेवून घेऊ नये—कारण अशी वस्तू गहाण ठेवणे म्हणजे त्या मनुष्याचे जीवितच गहाण ठेवणे होय. 7 जर एखाद्याने आपल्याच इस्राएली बांधवाचे अपहरण केले आणि त्याला एखाद्या गुलामाप्रमाणे वागविले किंवा तो विकून टाकताना त्याला धरण्यात आले, तर अपहरण करणार्याला अवश्य जिवे मारावे. अशा रीतीने तुमच्यातील दुष्कर्म तुम्ही दूर करावे. 8 कुष्ठरोगाच्या बाबतीत लेवी याजकाने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वागण्याची काळजी घ्या. मी त्यांना दिलेल्या आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळा. 9 इजिप्तमधून येताना याहवेह तुमच्या परमेश्वराने मिर्यामचे काय केले, याची तुम्ही आठवण ठेवावी. 10 जेव्हा तुम्ही आपल्या शेजार्याला काही उसने देता, तर तारण घेण्यासाठी तुम्ही त्याच्या घरात शिरू नये, 11 तुम्ही बाहेर उभे राहावे आणि ज्या शेजार्याला तुम्ही कर्ज देत आहात त्याने तुम्हाला बाहेर तारण आणून द्यावे. 12 जर शेजारी गरीब असेल, तर तुम्ही त्याने तारण म्हणून दिलेले पांघरूण अंगावर घेऊन झोपू नका. 13 गहाणादाखल त्याने आपले पांघरूण दिले असेल व तर सूर्यास्तसमयी ते त्याला परत करावे म्हणजे ते पांघरूण अंगावर घेऊन तो झोपेल. तो तुमचे आभार मानेल आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने तुमचे हे कृत्य नीतिमत्व असे ठरेल. 14 गरीब व गरजवंत मजुराचा तुम्ही गैरफायदा घेऊ नये, मग तो तुमचा इस्राएली बांधव असो किंवा तुमच्या गावात राहणारा परदेशी असो. 15 त्यांना दररोज सूर्य मावळण्यापूर्वीच त्यांची मजुरी द्यावी, कारण ते गरीब आहेत आणि ते त्या मजुरीवर अवलंबून आहेत. नाहीतर ते तुमच्याविरुद्ध याहवेहकडे गार्हाणे करतील व मग ते तुमच्याविरुद्ध पाप असे मोजण्यात येईल. 16 आईवडिलांना त्यांच्या मुलांच्या कारणामुळे जिवे मारू नये, तसेच आईवडिलांच्या कारणामुळे त्यांच्या मुलांना जिवे मारू नये. प्रत्येकजण स्वतःच्या पापासाठी मरतील. 17 परदेशी आणि अनाथांना यथायोग्य न्याय दिला पाहिजे, किंवा विधवेची वस्त्रे गहाण म्हणून कधीही घेतली जाऊ नये. 18 तुम्ही इजिप्त देशात गुलाम होता आणि याहवेह तुमच्या परमेश्वराने त्यातून तुमची सुटका केली, याची तुम्ही सतत आठवण ठेवावी. म्हणूनच मी तुम्हाला हे करण्याची आज्ञा देत आहे. 19 पिकांची कापणी करीत असताना तुम्ही बांधून ठेवलेली एखादी पेंढी शेतातून आणावयाचे विसरलात, तर ती आणण्यासाठी तुम्ही माघारी जाऊ नये, तर परदेशी, अनाथ व विधवा यांच्यासाठी ती तिथेच राहू द्यावी, म्हणजे याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या हाताच्या सर्व कार्यात आशीर्वाद देतील. 20 तुम्ही तुमच्या जैतून वृक्षांवरील फळे काढण्याकरिता झोडपणी कराल, तेव्हा तुम्ही एकाच फांदीवर दोनदा प्रहार करू नये. त्या फांदीवर जी काही फळे राहतील ती परदेशी, अनाथ व विधवा यांच्यासाठी राहू द्यावी. 21 जेव्हा तुम्ही तुमच्या द्राक्षमळ्यातील द्राक्षे काढता तेव्हा परत वेलींवर जाऊ नका. तर राहिलेली द्राक्षे परदेशी, अनाथ व विधवा यांच्यासाठी तशीच राहू द्यावीत. 22 इजिप्त देशामध्ये तुम्ही गुलाम होता याची आठवण ठेवावी म्हणून मी तुम्हाला हे करण्याची आज्ञा देत आहे. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.