Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

अनुवाद 15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


ॠणविमोचनाचे वर्ष

1 प्रत्येक सातव्या वर्षाच्या शेवटी सर्व कर्ज माफ करावे.

2 कर्जमाफीची प्रक्रिया अशी असावी: प्रत्येक सावकाराने आपल्याजवळ असलेल्या कोणाही इस्राएली बंधूचे कर्ज माफ करावे. त्यांना स्वतःच्या लोकांपैकी कोणाकडूनही पैसे घ्यावे लागणार नाहीत, कारण कर्जाची फेड करण्याची वेळ याहवेहने घोषित केली आहे.

3 परदेशी पासून असलेले कर्ज तुम्हाला वसूल करता येईल, परंतु तुमच्याच बांधवांची देणी तुम्ही मुळीच वसूल करू नयेत.

4 तरीसुद्धा तुमच्यात कोणीही दरिद्री असा राहू नये, कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला वतनादाखल देऊ केलेल्या या देशात भरपूर आशीर्वाद देतील,

5 जर तुम्ही पूर्णपणे याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेत राहाल आणि आज मी तुम्हाला देत असलेल्या या सर्व आज्ञा काळजीपूर्वक पाळाल तरच.

6 कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने अभिवचन दिल्याप्रमाणे ते तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुम्ही अनेक राष्ट्रांना कर्ज द्याल पण तुम्ही मात्र कर्ज घेणार नाही. तसेच तुम्ही अनेक राष्ट्रांवर राज्य कराल, पण ती राष्ट्रे तुम्हावर राज्य करणार नाहीत.

7 परंतु याहवेह तुमचे परमेश्वर जो देश तुम्हाला देत आहेत, त्यातील कोणत्याही नगरात कोणी इस्राएली बांधव गरीब असेल, तर त्यांच्याकरिता तुमचे हृदय कठोर करू नका किंवा तुमची मूठ बांधून ठेऊ नका.

8 त्यांना गरज लागेल तितके तुम्ही त्यांना उदारमनाने व निर्व्याज उसने द्यावे.

9 हा दुष्ट विचार मनात न आणण्याची खबरदारी घ्या: “कर्जमाफी करण्याचे सातवे वर्ष जवळ आले आहे.” म्हणून तुम्ही एखाद्या इस्राएली बांधवाबद्दल वाईट इच्छा दाखवू नका आणि मदत नाकारू नका. जर तो याहवेहकडे आपले गार्‍हाणे घेऊन गेला, तर ते तुमच्याविरुद्ध पाप असे मोजण्यात येईल.

10 तुम्ही त्यांना उदारपणे दिले पाहिजे आणि त्याबद्दल तुम्ही अंतःकरणात कुरकुर करू नये; मग तुम्ही जे काही कराल आणि जे कार्य हातात घ्याल त्यात याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करतील.

11 देशात नेहमीच गरीब असतील. म्हणून मी तुम्हाला आज्ञा देत आहे की तुमच्या देशातील इस्राएली बांधव जे गरीब आणि गरजवंत आहेत, त्यांना उदारहस्ते मदत करावी.


दासदासींना स्वतंत्र करणे

12 जर तुमच्यापैकी कोणी—इब्री पुरुष किंवा इब्री स्त्री—दास म्हणून स्वतःला विकले आणि सहा वर्षे त्यांनी तुमची सेवा केल्यानंतर सातव्या वर्षी त्यांना मुक्त करावे.

13 आणि ज्यावेळी तुम्ही त्यांना मुक्त कराल, त्यावेळी त्यांना रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका.

14 तर तुम्ही तुमच्या गुरांच्या कळपातून, तुमच्या खळ्यातून, तुमच्या द्राक्षारसाच्या कुंडातून उदारहस्ते द्यावे. ज्याप्रकारे याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादित केले आहे त्याप्रकारे त्यांना द्या.

15 स्मरण ठेवा, तुम्हीही इजिप्त देशामध्ये गुलाम होता आणि याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमची सुटका केली. म्हणूनच मी आज तुम्हाला ही आज्ञा देत आहे.

16 परंतु तुमच्या दासाची तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रीती असेल आणि त्याला तुमच्या घरी राहण्यात आनंद वाटत असेल आणि तो तुम्हाला म्हणेल की “तुम्हाला सोडून जाण्याची माझी इच्छा नाही,”

17 तर आरी घेऊन, त्याचा कान दरवाजावर धरून, तो आरपार टोचावा. मग तो तुमचा कायमचाच दास होईल. तुमच्या दासीचेही असेच करावे.

18 पण जेव्हा तुम्ही तुमच्या दासदासींना दास्यातून मुक्त कराल, तेव्हा वाईट वाटून घेऊ नये; कारण लक्षात ठेवा की, सहा वर्षात एखाद्या मोलकर्‍यासाठी जितका खर्च तुम्हाला आला असता, त्याच्या निम्म्याहूनही कमी खर्चात त्यांनी तुमचे काम केले आहे आणि त्यांना मुक्त करण्यासाठी तुम्ही जे काही कराल, त्याबद्दल याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करतील.


पशूंचे प्रथम जन्मलेले

19 तुमच्या गुरांचे आणि शेरडामेंढरांचे प्रथम जन्मलेले नर, याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी तुम्ही पवित्र म्हणून वेगळे ठेवावेत. तुमच्या गुरांचे प्रथमवत्स तुम्ही शेतीच्या कामासाठी वापरू नयेत आणि तुमच्या मेंढरांच्या प्रथम वत्साची लोकर कातरू नये.

20 प्रत्येक वर्षी तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर, ते जे स्थान निवडतील त्या ठिकाणी त्यांचे मांस खावे.

21 तरी, त्या प्राण्यात काही दोष आढळल्यास, म्हणजे तो लंगडा किंवा आंधळा असेल किंवा त्यामध्ये कोणतेही व्यंग असले तर याहवेह तुमच्या परमेश्वराला त्याचे अर्पण करू नये.

22 ते तुम्ही आपल्याच नगरात खावे. हरिण किंवा सांबर खातात त्याप्रमाणेच, विधीनुसार अशुद्ध व शुद्ध यांनी ते खावे;

23 परंतु तुम्ही त्याच्या रक्ताचे सेवन करू नये; तर ते पाण्यासारखे जमिनीवर ओतून द्यावे.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan