Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

अनुवाद 10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


पहिल्या पाट्यांसारख्या नव्या पाट्या

1 त्यावेळी याहवेहने मला सांगितले, “पहिल्या पाट्यांसारख्याच आणखी दोन दगडी पाट्या तू घडव आणि त्या घेऊन पर्वतावर माझ्याकडे ये. एक लाकडी कोशही तयार कर.

2 तू फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती, ती मी त्यावर लिहेन. मग त्या पाट्या तू कोशात ठेव.”

3 म्हणून मी बाभळीच्या लाकडाचा एक कोश तयार केला, आणि पहिल्यासारख्या दोन दगडी पाट्या घडविल्या व त्या पाट्या माझ्या हातात घेऊन मी पर्वतावर गेलो.

4 याहवेहने या पाट्यांवर जे आधी लिहिले होते तेच लिहिले, ज्या दहा आज्ञा त्यांनी पर्वतावर अग्नीमधून संपूर्ण मंडळीला घोषित केल्या होत्या, त्या पुन्हा लिहिल्या आणि मला सोपवून दिल्या.

5 नंतर मी पर्वतावरून खाली उतरलो आणि याहवेहने मला आज्ञा दिल्याप्रमाणे त्या पाट्या मी बनविलेल्या लाकडी कोशात ठेवून दिल्या; आजपर्यंत त्या तिथेच आहेत.

6 (मग इस्राएली लोक बेने याकानच्या विहिरी सोडून प्रवास करीत मोसेरापर्यंत आले. तिथे अहरोन मरण पावला व त्याला मूठमाती देण्यात आली, आणि त्याचा पुत्र एलअज़ार त्याच्यानंतर याजक झाला.

7 नंतर ते प्रवास करीत गुदगोदाह येथे आले व तिथून पुढे याटबाथह येथे आले, ही झर्‍यांची भूमी होती.

8 याच ठिकाणी याहवेहने लेवीच्या गोत्रास याहवेहच्या कराराचा कोश वाहून नेण्यासाठी, त्याचप्रमाणे याहवेहच्या समोर उभे राहून त्यांची सेवा करण्यास व त्यांच्या नावाने आशीर्वाद देण्यास नेमले, जसे आजपर्यंत चालत आले आहे.

9 म्हणून लेवी वंशजांना वचनदत्त देशात त्यांच्या बंधुवंशजांप्रमाणे वाटा किंवा वतन मिळालेले नाही, कारण याहेवह तुमच्या परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे याहवेह स्वतःच त्यांचे वतन आहेत.)

10 त्या पर्वतावर पहिल्या वेळी राहिलो होतो, त्याप्रमाणे चाळीस दिवस व चाळीस रात्र राहिलो आणि या वेळीही याहवेहने माझी विनंती मान्य केली. तुमचा नाश करण्याची त्यांची इच्छा नव्हती.

11 याहवेह मला म्हणाले, “जा आणि सर्व लोकांना मी त्यांच्या पूर्वजांना वचनपूर्वक देऊ केलेल्या देशाकडे जाण्यास मार्गदर्शन कर, म्हणजे ते त्या देशात प्रवेश करून तो ताब्यात घेतील.”


याहवेहचे भय धरा

12 आता हे इस्राएली लोकहो, याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्याजवळ मागतात ते एवढेच की तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे भय धरावे, त्यांच्या आज्ञा पाळाव्या, त्यांच्यावर प्रीती करावी आणि पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने याहवेह तुमच्या परमेश्वराची सेवा करावी,

13 आणि याहवेहच्या ज्या आज्ञा व नियम आज मी तुम्हाला देत आहे, त्या तुमच्या भल्यासाठीच आहेत, त्या तुम्ही पाळाव्या.

14 आकाश, सर्वोच्च आकाश, पृथ्वी व तिच्यावरील सर्वकाही याहवेह तुमच्या परमेश्वराचे आहे.

15 असे असूनही याहवेहने तुमच्या पूर्वजांवर वात्सल्यमय प्रीती केली व त्यांच्यानंतर तुम्ही इतर सर्व राष्ट्रांहून श्रेष्ठ व्हावे म्हणून त्यांच्या वंशजांची म्हणजे तुमची निवड केली—जसे आजही आहे.

16 म्हणून तुम्ही तुमच्या अंतःकरणाची सुंता करा आणि आता ताठ मानेचे राहू नका.

17 याहवेह तुमचे परमेश्वर, हे देवाधिदेव, प्रभूंचे प्रभू, महान परमेश्वर, पराक्रमी आणि भयावह आहेत, जे पक्षपात करीत नाहीत व लाच घेत नाहीत.

18 ते अनाथांचा व विधवांचा न्याय करतात, जे परदेशीय तुम्हामध्ये राहतात त्यांच्यावर प्रीती करून त्यांना अन्न व वस्त्रे देतात.

19 तुम्हीदेखील परदेशीयांवर प्रीती केली पाहिजे, कारण तुम्ही स्वतः इजिप्त देशामध्ये परदेशी होता.

20 याहवेह तुमच्या परमेश्वराचे तुम्ही भय बाळगा, त्यांची सेवा करा, त्यांना बिलगून राहा आणि त्यांच्याच नावाने शपथ घ्या.

21 तेच तुमच्या स्तुतीचा विषय आहे; तेच तुमचे परमेश्वर आहेत, त्यांनी केलेले महान व भयावह चमत्कार तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिले आहेत.

22 ज्यावेळी तुमचे पूर्वज इजिप्तमध्ये गेले, त्यावेळी ते केवळ सत्तर जणच होते आणि आता याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला आकाशातील तार्‍यांइतके अगणित केले आहे.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan