Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

दानीएल 5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


भिंतीवरील लिखाण

1 बेलशस्सर राजाने त्याच्या एक हजार अधिकार्‍यांना मोठी मेजवानी दिली आणि तो त्यांच्याबरोबर द्राक्षारस प्याला.

2 बेलशस्सर द्राक्षारस पीत असताना, त्याने आज्ञा दिली की त्याचे पिता नबुखद्नेस्सर यांनी यरुशलेमच्या मंदिरातून आणलेल्या सोन्याची आणि चांदीची पात्रे आणावीत, जेणेकरून राजा, त्याचे अधिकारी, त्याच्या पत्नी आणि त्याच्या उपपत्नी त्यामधून पिऊ शकतील.

3 म्हणून यरुशलेमच्या मंदिरातून आणलेल्या सोन्याची आणि चांदीची पात्रे आणण्यात आली आणि राजा, त्याचे अधिकारी, त्याच्या पत्नी आणि त्याच्या उपपत्नी त्यामधून पिऊ लागली.

4 द्राक्षारस पिऊन त्यांनी सोने, चांदी, कास्य, लोखंड, लाकूड, दगड यापासून बनविलेल्या दैवतांचे स्तवन केले.

5 एकाएकी मानवी हाताची बोटे प्रकट झाली आणि राजवाड्यातील दिवठणीच्या समोरच्या भिंतीच्या गिलाव्यावर काहीतरी लिहू लागली. ती हाताची बोटे लिहित असतानाच राजाने ती पाहिली.

6 तेव्हा राजाचा चेहरा पांढराफटक झाला आणि त्याला एवढा धसका बसला की त्याची कंबरच खचली आणि त्याचे गुडघे थरथर कापू लागले.

7 मग राजाने मांत्रिक, ज्योतिषी आणि दैवप्रश्न करणार्‍यांना बोलावून घेतले. नंतर तो बाबेलच्या ज्ञानी लोकांना म्हणाला, “जो कोणी हे लिखाण वाचून त्याचा अर्थ मला समजावून सांगेल, त्याला जांभळा पोशाख देण्यात येईल आणि गळ्यात सोन्याची साखळी घालण्यात येईल आणि राज्यात तो तिसर्‍या क्रमांकाचा सत्ताधारी होईल.”

8 नंतर राजाचे सर्व ज्ञानी लोक आत आले, पण त्यांना त्या लेखाचा उमज पडेना किंवा त्याचा अर्थही राजाला सांगता येईना.

9 यामुळे राजा बेलशस्सर अत्यंत भयभीत झाला आणि त्याचा चेहरा अधिक पांढराफटक झाला. त्याचे अधिकारीदेखील गोंधळून गेले.

10 राजा आणि अधिकार्‍यांचा आवाज ऐकून राणी मेजवानीच्या दिवाणखान्यात आली. ती म्हणाली, “महाराज, चिरायू असा! घाबरू नका, आपली मुद्रा पालटू देऊ नका.

11 कारण ज्याच्यामध्ये पवित्र देवांचा आत्मा आहे असा एक मनुष्य आपल्या राज्यात आहे. तुमच्या पित्याच्या कारकिर्दीत हा मनुष्य जणू काय देवच आहे अशा ज्ञानाने व शहाणपणाने परिपूर्ण असून असे आढळून आले होते. तुमचा पिता नबुखद्नेस्सर राजाच्या कारकिर्दीत त्याला बाबेलमधील सर्व जादूगार, मांत्रिक, ज्योतिषी, दैवप्रश्न सांगणारे या सर्वांवर प्रमुख नेमण्यात आले होते.

12 त्याने हे केले कारण दानीएल हा ज्याला राजा बेलटशास्सर म्हणत होता, त्याच्याकडे उत्तम मन आणि ज्ञान आणि समज होती आणि त्याच्याकडे स्वप्नांचा अर्थ सांगण्याचे, कोडे सोडविण्याचे आणि कठीण समस्या सोडविण्याची क्षमता होती. म्हणून दानीएलला बोलवा म्हणजे तो तुम्हाला त्या लिखाणाचा अर्थ सांगेल.”

13 तेव्हा दानीएलला राजासमोर आणण्यात आले आणि राजाने त्याला म्हटले, “दानीएल तो तूच आहेस काय, ज्याला माझे पिता राजा यांनी यहूदीयातून कैदी म्हणून आणला होता?

14 तुझ्यामध्ये देवांचा आत्मा आहे आणि प्रकाश, बुद्धी आणि उत्कृष्ट शहाणपण यांनी तू परिपूर्ण आहेस असे मी ऐकले आहे.

15 ज्ञानी लोकांनी आणि ज्योतिषांनी भिंतीवरील हे लिखाण वाचावे आणि त्याचा अर्थ काय आहे हे सांगावे म्हणून त्यांना माझ्यापुढे आणले पण ते अर्थ सांगू शकले नाही.

16 मी तुझ्याबद्दल ऐकले आहे की तू अर्थ सांगण्यात आणि कोडी सोडविण्यात सक्षम आहेस. जर तू हे लिखाण वाचशील आणि त्याचा अर्थ मला समजावून सांगशील, तर तुला जांभळा पोशाख देण्यात येईल आणि गळ्यात सोन्याची साखळी घालण्यात येईल आणि राज्यात तू तिसर्‍या क्रमांकाचा सत्ताधारी होशील.”

17 दानीएलने राजाला उत्तर दिले. “आपल्या देणग्या आपल्याजवळच ठेवा आणि तुमचे पारितोषिक दुसर्‍या कोणाला द्या. तरीही मी हे लिखाण राजासाठी वाचेन आणि त्याचा अर्थ त्यांना सांगेन.

18 “महाराज, परात्पर परमेश्वराने तुमचे पिता नबुखद्नेस्सर राजाला राज्य आणि महानता वैभव आणि गौरव दिले होते.

19 कारण त्यांनी राजाला असे उच्च स्थान दिले की, सर्व राष्ट्रे आणि प्रत्येक भाषा बोलणारे त्यांच्यासमोर थरथर कापत आणि त्याला भीत असत. राजाला ज्याला ठार करावयाचे होते त्याला ठार करीत असत; ज्याला वाचवायचे होते त्याला वाचवित असत; ज्याला बढती द्यायची त्याला बढती देत असत; आणि ज्याला नम्र करावयाचे त्याला नम्र करीत असत.

20 परंतु जेव्हा त्यांचे अंतःकरण गर्विष्ठ झाले व गर्वाने फुगून ताठ झाले, तेव्हा त्यांना राजासनावरून काढण्यात आले व त्यांचे वैभवही हिरावून घेण्यात आले.

21 त्यांना लोकांमधून हाकलून देण्यात आले आणि प्राण्याचे मन देण्यात आले; ते रानगाढवांमध्ये राहिले आणि बैलासारखे गवत खात असत; आणि त्यांचे शरीर आकाशाच्या दवबिंदूंनी भिजले होते, जोपर्यंत त्यांनी हे मान्य केले नाही की सार्वभौम परमेश्वर हे पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च परमेश्वर आहेत आणि त्यांना पाहिजे त्याला ते राज्यांचा अधिपती म्हणून नियुक्त करतात.

22 “परंतु बेलशस्सर तुम्ही त्याचे पुत्र असून स्वतःला नम्र केले नाही, जेव्हा की आपल्याला हे सर्व माहिती आहे.

23 त्याऐवजी तुम्ही स्वर्गाच्या प्रभूच्या विरोधात उभे राहिले. त्यांच्या मंदिरातील पात्रे तुम्ही आपल्याकडे आणली. आपण स्वतः आणि आपले अधिकारी, राण्या, उपपत्नीसह द्राक्षारस प्याले. चांदी आणि सोने, कास्य, लोखंड, लाकूड आणि दगड या दैवतांची, ज्यांना पाहता येत नाही की ऐकता येत नाही की समजत नाही, त्यांची स्तुती केली. पण ज्यांच्या हातात तुमचे जीवन आणि तुमचे संपूर्ण मार्ग आहे त्या परमेश्वराचा तुम्ही आदर केला नाही.

24 म्हणून त्यांनी हा हात पाठविला आहे, ज्याने हे लिखाण लिहिले आहे.

25 “हा तो शिलालेख आहे जो लिहिण्यात आला: मने, मने तकेल, ऊ फारसीन.

26 “या शब्दांचा अर्थ हा असा: “मने: परमेश्वराने आपल्या राजवटीचे दिवस मोजले आहेत आणि त्याचा अंत केला आहे.

27 “तकेल: तराजूत आपणास तोलण्यात आले आहे आणि आपण वजनात कमी भरला आहात.

28 “फारसीन: आपल्या राज्याचे दोन भाग करण्यात आले आहे आणि मेदिया व पर्शियन यांना देण्यात आले आहेत.”

29 नंतर बेलशस्सरच्या आज्ञेवरून दानीएलला जांभळा पोशाख घालण्यात आला. त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी घालण्यात आली व तो राज्यातील तिसर्‍या क्रमांकाचा अधिपती आहे, असे जाहीर करण्यात आले.

30 त्याच रात्री खाल्डियन लोकांचा राजा बेलशस्सर याचा वध झाला;

31 आणि मेदिया राजा दारयावेश, याने नगरात प्रवेश केला व वयाच्या बासष्टाव्या वर्षी तो राज्य करू लागला.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan