Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

दानीएल 3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


सोन्याचा पुतळा आणि तप्त भट्टी

1 नबुखद्नेस्सर राजाने एक सुवर्ण पुतळा घडविला. त्याची उंची साठ हात आणि रुंदी सहा हात होती, आणि बाबेल प्रांतातील दूरा नावाच्या मैदानात हा पुतळा स्थापित केला.

2 मग नबुखद्नेस्सरने आपल्या साम्राज्यातील राजपुत्र, सर्व राज्यपाल, सेनानायक, न्यायाधीश, कोषाधिकारी, मंत्री, सर्व प्रांताचे अधिकारी या सर्वांना त्याने स्थापिलेल्या पुतळ्याच्या प्रतिष्ठापनेसाठी बोलाविले.

3 राजपुत्र, राज्यपाल, सेनानायक, न्यायाधीश, कोषाधिकारी, मंत्री, सर्व प्रांताचे अधिकारी नबुखद्नेस्सर राजाने स्थापिलेल्या पुतळ्याच्या प्रतिष्ठापनेसाठी एकत्र झाले आणि त्या पुतळ्याच्या पुढे उभे राहिले.

4 तेव्हा ललकारी देणाऱ्याने मोठ्याने घोषणा केली, “अहो सर्व राष्ट्रातील आणि विविध भाषा बोलणारे लोकहो, तुम्हाला ही आज्ञा देण्यात येते:

5 शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पावा आणि सर्वप्रकारच्या वाद्यांचा गजर ऐकताच, तुम्हाला नबुखद्नेस्सर महाराजांनी उभारलेल्या या सुवर्ण पुतळ्याला दंडवत घालून उपासना करावी लागेल.

6 जो कोणी दंडवत घालून उपासना करणार नाही, त्याला ताबडतोब अग्नीच्या धगधगत्या भट्टीत टाकण्यात येईल.”

7 म्हणून जेव्हा त्यांनी कर्णे, बासरी, सतार, तंतुवाद्य, वीणा आणि सर्वप्रकारचे संगीत ऐकले, तेव्हा सर्व वंश आणि भाषांचे लोक पालथे पडले आणि त्यांनी राजा नबुखद्नेस्सरने प्रतिष्ठापन केलेल्या सोन्याच्या मूर्तीची आराधना केली.

8 यावेळी काही ज्योतिषी राजाकडे गेले व यहूदींवर आरोप लावला.

9 ते नबुखद्नेस्सर राजाला म्हणाले, “महाराज, चिरायू असा!

10 महाराज तुम्ही आदेश दिला आहे की शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पावा आणि सर्वप्रकारच्या वाद्यांचा गजर ऐकताच सर्वांनी सुवर्ण पुतळ्याला दंडवत घालून उपासना करावी,

11 आणि जो कोणी असे करणार नाही त्याला अग्नीच्या धगधगत्या भट्टीत टाकण्यात यावे.

12 परंतु काही यहूदी आहेत ज्यांना तुम्ही बाबेलच्या कारभारावर नेमलेले आहे—शद्रख, मेशख, व अबेदनगो—जे तुमच्या आज्ञेकडे लक्ष्य देत नाही. महाराज, यांनी आपली आज्ञा मानली नाही. ते तुमच्या दैवतांची सेवा करीत नाही किंवा आपण उभारलेल्या सुवर्ण पुतळ्याला नमनही करीत नाही.”

13 नबुखद्नेस्सर क्रोधाने संतप्त झाला व शद्रख, मेशख व अबेदनगो यांना हजर करावे असा त्याने हुकूम दिला. तेव्हा या लोकांना राजासमोर आणण्यात आले,

14 नबुखद्नेस्सर त्यांना म्हणाला, “शद्रख, मेशख आणि अबेदनगो, तुम्ही माझ्या दैवतांची सेवा व मी स्थापन केलेल्या सुवर्ण पुतळ्याची उपासना करीत नाही, हे खरे आहे काय?

15 मग आता जेव्हा तुम्ही शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पावा आणि सर्वप्रकारच्या वाद्यांचा गजर ऐकताच मी तयार केलेल्या पुतळ्याला तुम्ही नमन केले आणि उपासना केली तर उत्तम. परंतु जर तुम्ही उपासना नाही केली तर त्याच घटकेस तुम्हाला अग्नीच्या धगधगत्या भट्टीत टाकण्यात येईल. मग माझ्या हातून कोणता देव तुम्हाला सोडवितो ते पाहूया?”

16 शद्रख, मेशख व अबेदनगो यांनी त्याला उत्तर दिले, “नबुखद्नेस्सर महाराज, याबद्दल तुमच्यासमोर आमचा बचाव करण्याची आम्हाला गरज नाही.

17 जर आम्हाला धगधगत्या भट्टीत टाकले, तर आमचे परमेश्वर ज्यांची आम्ही सेवा करतो ते आम्हाला तिच्यातून सोडविण्यास समर्थ आहे आणि महाराज, तेच आम्हाला आपल्या हातून सोडवतील.

18 परंतु असे जरी झाले नाही, तरीही महाराज तुम्हाला हे कळावे की आम्ही तुझ्या दैवतांची सेवा करणार नाही किंवा आपण स्थापन केलेल्या या सुवर्ण पुतळ्याला नमनही करणार नाही.”

19 तेव्हा नबुखद्नेस्सर हा शद्रख, मेशख आणि अबेदनगो यांच्यावर रागाने संतप्त झाला आणि त्याची त्यांच्याबद्दलीची भावना बदलली. नेहमीपेक्षा भट्टी सातपट तापवावी असा त्याने हुकूम सोडला,

20 आणि शद्रख, मेशख आणि अबेदनगो यांना बांधून भट्टीत फेकण्यासाठी त्याने आपल्या सैन्यातील बलदंड वीरांना बोलाविले.

21 तेव्हा त्या पुरुषांना त्यांचे पायमोजे, अंगरखे, झगे वगैरे वस्त्रासह बांधण्यात आले आणि धगधगत्या भट्टीत फेकण्यात आले.

22 राजाची आज्ञा कडक होती आणि भट्टी अतिशय तापली होती यामुळे ज्या सैनिकांनी शद्रख, मेशख आणि अबेदनगो यांना भट्टीत टाकण्यासाठी उचलले होते, त्यांनाच अग्नीच्या ज्वालांनी ठार केले,

23 आणि हे तीन पुरुष शद्रख, मेशख व अबेदनगो घट्ट बांधलेले असे धगधगत्या भट्टीत फेकण्यात आले.

24 नबुखद्नेस्सर राजा चकित होऊन ताडकन उभा राहिला व आपल्या मंत्र्यांना विचारले, “आपण तीन माणसांना बांधून भट्टीत टाकले होते ना?” ते म्हणाले, “होय, निश्चित महाराज.”

25 तो म्हणाला, “इकडे पाहा! मी चार पुरुष अग्नीत फिरत असलेले पाहत आहे आणि त्यांचे बंध सुटलेले आहेत आणि त्यांना कोणतीच हानी झालेली नाही, आणि त्यातील चौथा तर देवपुत्रासारखा दिसत आहे.”

26 नबुखद्नेस्सर त्या धगधगत्या भट्टीच्या दाराजवळ गेला आणि मोठ्याने हाक मारून म्हणाला, “परमोच्च परमेश्वराचे सेवक शद्रख, मेशख आणि अबेदनगो, बाहेर या! इकडे या!” तेव्हा शद्रख, मेशख आणि अबेदनगो अग्नीतून बाहेर आले,

27 मग राजपुत्र, राज्यपाल, सेनानायक, सल्लागार इत्यादी सर्व त्यांच्याभोवती गोळा झाले. त्यांच्या शरीराला विस्तवाची झळ लागली नाही, अथवा त्यांच्या डोक्याचा एक केससुद्धा होरपळला नव्हता; त्यांचे कपडे काळवंडले नव्हते आणि त्याच्या अंगाला धुराचा वासही येत नव्हता, असे सर्वांनी पाहिले.

28 तेव्हा नबुखद्नेस्सर म्हणाला, “शद्रख, मेशख व अबेदनगोचे परमेश्वर धन्यवादित असो. ज्यांनी राजाची आज्ञा मोडून आपल्या परमेश्वराशिवाय अन्य दैवतांची सेवा किंवा उपासना करावयाची नाही असे ठरवून मरण पत्करले, तेव्हा त्याने आपला दिव्यदूत पाठवून आपल्या विश्वासू सेवकांची सुटका केली.

29 म्हणून मी असे फर्मान काढतो की शद्रख, मेशख आणि अबेदनगोच्या परमेश्वराविरुद्ध कोणतेही राष्ट्र किंवा भाषा बोलणारे काहीही बोलतील तर त्यांचे तुकडे तुकडे करावेत आणि त्यांच्या घरादाराचेही उकिरडे करण्यात यावे. कारण परमेश्वर जसे सोडवितात, तसे दुसर्‍या कोणत्याही दैवताला करता येणार नाही.”

30 नंतर राजाने शद्रख, मेशख व अबेदनगो यांना बाबेल प्रांतात बढती दिली.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan