Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

आमोस 9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


इस्राएलचा नाश करण्यात येईल

1 मी प्रभूला वेदीजवळ उभे असलेले पाहिले आणि ते म्हणाले: “खांबांच्या वरच्या भागावर प्रहार करा म्हणजे उंबरठे हलतील. आणि ते सर्व लोकांच्या डोक्यावर खाली पाड; जे त्यातून वाचतील त्यांना मी तलवारीने मारून टाकीन. एक सुद्धा वाचणार नाही, कोणीही निसटणार नाही.

2 खोल खणीत ते अधोलोकापर्यंत जाऊन पोहोचले, तरी तिथे जाऊन माझ्या हात त्यांना वर ओढून आणेन; वर चढत ते आकाशापर्यंत आले, तरी तिथूनही मी त्यांना खाली आणेन.

3 कर्मेल पर्वताच्या शिखरावर ते लपून राहिले, तरी मी त्यांची शिकार करून त्यांना पकडेन. ते महासागराच्या तळाशी माझ्या दृष्टिआड लपून बसले तरी, मी सर्पाला त्यांना चावा घेण्याची आज्ञा देईन.

4 जरी शत्रूंनी त्यांना कैद करून बंदिवासात नेले, तरी मी तलवारीला त्यांना ठार मारण्याची आज्ञा देईन. “मी त्यांच्यावर माझी नजर ठेवेन ती तर हानीसाठी असणार भल्यासाठी नाही.”

5 प्रभू, सेनाधीश याहवेह— भूमीला स्पर्श करतात आणि ती विरघळून जाते, आणि त्यामध्ये राहणारे सर्व लोक शोक करतात. संपूर्ण देश नाईल नदीसारखा वर येतो आणि इजिप्तच्या नदीप्रमाणे खाली बुडतो;

6 ते आकाशात आपले भव्य राजवाडे बांधतात आणि त्याचा पाया पृथ्वीवर ठेवतात; ते समुद्राच्या पाण्याला बोलवितात आणि ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर ओततात; याहवेह हे त्यांचे नाव आहे.

7 “तुम्ही इस्राएली लोक माझ्यासाठी कूशी लोकांसारखेच नाहीत काय?” असे याहवेह घोषित करतात. “मी इस्राएल लोकांना इजिप्त देशातून, पलिष्ट्यांना कफतोरातून आणि अरामी लोकांना कीर देशातून बाहेर काढले नाही काय?

8 “खचितच, सार्वभौम याहवेहची दृष्टी या पापी राज्यावर आहे. आणि मी त्यांचा पृथ्वीच्या पृष्ठभागावरून नाश करेन; तरीसुद्धा मी याकोबाच्या संतानांचा कायमचा नाश करणार नाही,” असे याहवेह घोषित करतात.

9 “तर पाहा, मी आज्ञा करेन आणि जसे चाळणीने धान्य चाळावे त्याप्रमाणे इस्राएलला इतर राष्ट्रांनी चाळावे, पण त्याचा एक खडाही भूमीवर पडणार नाही.

10 माझ्या लोकांतील जे सर्व पापी म्हणतात, ‘संकटे आमच्यावर येणार नाही वा आम्हाला गाठणार नाहीत, ते तलवारीने मरतील.’


इस्राएलचे पुनर्वसन

11 “त्या दिवशी “दावीदाचा पतन झालेला आश्रय मी पुनर्स्थापित करेन; मी तिची तुटलेली तटबंदी दुरुस्त करेन, आणि तिचे अवशेष दुरुस्त करेन— आणि पूर्वीसारखीच तिची पुनर्बांधणी करेन,

12 यासाठी की त्यांनी एदोमच्या अवशेषांवर व माझे नाव धारण करणार्‍या सर्व राष्ट्रांचा ताबा घ्यावा,” ही कार्ये करणारे याहवेह ही घोषणा करतात.

13 “ते दिवस येत आहेत,” याहवेह जाहीर करतात, “जेव्हा नांगरणारा कापणी करणार्‍याला आणि द्राक्षे तुडविणारा बी पेरणार्‍याला मागे टाकेल. नवीन द्राक्षारस पर्वतांवरून गळू लागेल आणि ते सर्व टेकड्यांवरून वाहू लागेल,

14 मी माझ्या इस्राएली लोकांना बंदिवासातून परत आणेन. “ते त्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या नगरांची पुनर्बांधणी करून त्यात राहतील. ते द्राक्षमळे लावतील आणि त्याचा द्राक्षारस पितील; ते बागा लावतील आणि त्याची फळे खातील.

15 मी इस्राएलला त्यांच्या स्वतःच्या भूमीमध्ये पेरीन, मी त्यांना दिलेल्या भूमीतून त्यांना पुन्हा उपटून टाकण्यात येणार नाही.” असे याहवेह तुमचे परमेश्वर म्हणतात.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan