Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

आमोस 8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


पिकलेल्या फळांची टोपली

1 सार्वभौम याहवेहने मला हे दाखविले: पिकलेल्या फळांनी भरलेली एक टोपली दाखविली.

2 “आमोसा, तुला काय दिसते?” त्यांनी विचारले. मी उत्तर दिले, “मला पिकलेल्या फळांची एक टोपली दिसते.” मग याहवेह मला म्हणाले, “माझ्या इस्राएली लोकांचा समय परिपक्व झाला आहे; मी त्यांची गय करणार नाही.”

3 सार्वभौम याहवेह घोषित करतात, “त्या दिवशी, मंदिरातील त्यांचे गीत मी आकांतात बदलेन. सर्वत्र अनेक मृतदेह मौन धरून पडलेली असतील!”

4 जे तुम्ही गरजवंतांना तुडवितात आणि देशाच्या गरिबांना दूर लोटता,

5 असे म्हणता, “अमावस्या केव्हा निघून जाईल म्हणजे आम्ही धान्य विकू शकू? आणि शब्बाथ केव्हा निघून जाईल, म्हणजे आम्ही धान्याचे कोठार उघडू?” तराजूत लबाडी करून, लबाडीच्या मापाने, किंमत वाढवू.

6 म्हणजे चांदीच्या मापात गरिबांना आणि पायतणाच्या एका जोडीसाठी गरजूंना विकत घेऊ, आणि गव्हाचा भुसाही विकायचा.

7 याकोबाचे वैभव असलेले याहवेह यांनी स्वतःची शपथ घेऊन सांगितले आहेः “मी त्यांनी जे केले ते कधीही विसरणार नाही!

8 “यामुळे पृथ्वी थरथर कापणार नाही काय, आणि तिच्यात राहणारे सर्व शोक करणार नाहीत काय? संपूर्ण पृथ्वी नाईल नदीसारखी उठेल; ती नील नदीप्रमाणे खवळेल आणि मग इजिप्तच्या नदीप्रमाणे बुडून जाईल.

9 “त्या दिवशी,” सार्वभौम याहवेह घोषणा करतात, “दुपारच्या वेळी मी सूर्यास्त करेन आणि भरदिवसा पृथ्वीला अंधकारमय करेन.

10 मी तुमचे धार्मिक उत्सव शोकामध्ये उलटवेन आणि तुमची सर्व गीते विलापात बदलून टाकीन. मी तुम्हा सर्वांना गोणपाट घालेन आणि तुमचे मुंडण करेन. मी तो काळ एकुलत्या एक मुलासाठी विलाप करण्यासारखा आणि त्याचा शेवट कडू दिवसासारखा करेन.

11 “असे दिवस येत आहेत,” सार्वभौम याहवेह घोषित करतात, “मी देशावर दुष्काळ आणेन— तो अन्नाचा दुष्काळ किंवा पाण्याची तहान नव्हे, तर याहवेहचे वचन ऐकण्याचा दुष्काळ पाडेन—

12 आणि लोक याहवेहच्या वचनाच्या शोधात समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि उत्तरेपासून पूर्वेकडे भटकतील, पण त्यांना ते सापडणार नाही.

13 “त्या दिवसात “तहानेने व्याकूळ होऊन सुंदर कुमारी आणि उमदे तरुण निस्तेज होऊन जातील.

14 जे शोमरोनच्या पापाची शपथ घेतात; जे म्हणतात, ‘हे दान, तुझ्या दैवतेची शपथ’ किंवा ‘बेअर-शेबाच्या दैवतेची शपथ,’— ते असे पडतील की पुन्हा कधीही उठणार नाहीत.”

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan