Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

प्रेषित 22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 “बंधूंनो व वडीलजनांनो, माझ्या बचावाचे भाषण ऐकून घ्या.”

2 तो इब्री भाषेत बोलत आहे, हे ऐकून स्तब्धता अधिकच वाढली. तेव्हा पौल बोलू लागला:

3 “मी एक यहूदी आहे आणि माझा जन्म किलिकियामधील तार्सस शहरात झाला, परंतु मी या शहरात वाढलो. माझे शिक्षण गमालियेलच्या मार्गदर्शनात झाले व आपल्या पूर्वजांच्या नियमशास्त्राचे सविस्तर प्रशिक्षण मला मिळाले. जसे तुम्ही आज परमेश्वराविषयी आवेशी आहात तसाच मीही होतो.

4 ज्यांनी या मार्गाचे अनुसरण केले होते, त्यांना मरण येईपर्यंत मी त्यांचा छळ केला. स्त्री व पुरुष या दोघांनाही बांधून तुरुंगात टाकीत होतो.

5 महायाजक व येथे असलेले सर्व सभासद, ते स्वतः याबाबतीत साक्ष देऊ शकतात की, मी त्यांच्याकडून दिमिष्क येथील सभेच्या सदस्यांना दाखविण्यासाठी तशी पत्रेसुद्धा मिळविली होती आणि या लोकांना बंदिवान करून यरुशलेम येथे आणून त्यांना शिक्षा केली जावी यासाठी तिथे गेलो.

6 “दुपारच्या समयी मी दिमिष्कच्या जवळ आलो असताना, अकस्मात आकाशातून माझ्याभोवती प्रकाश चकाकताना पाहिला.

7 मी जमिनीवर पडलो, तेव्हा इब्री भाषेत बोलणारी वाणी मी ऐकली, ‘शौला! शौला! तू माझा छळ का करीत आहेस?’

8 “ ‘प्रभूजी, आपण कोण आहात?’ मी विचारले. “प्रभूने मला उत्तर दिले, ‘ज्याचा तू छळ करीत आहेस, तोच मी नासरेथकर येशू आहे,’

9 माझ्या सहकार्‍यांनी प्रकाश पाहिला, परंतु जे माझ्याशी बोलत होते त्यांची वाणी त्यांनी ओळखली नाही.

10 “मी विचारले, ‘प्रभू मी काय करावे?’ “प्रभू म्हणाले, ‘आता उठून उभा राहा आणि दिमिष्कमध्ये जा, जे काही तुला करावयाचे आहे, ते तुला तिथे सांगण्यात येईल.’

11 त्या प्रखर प्रकाशामुळे मी आंधळा झालो होतो, म्हणून माझ्या सोबत्यांनी मला हाताला धरून दिमिष्कला नेले.

12 “हनन्याह नावाचा मनुष्य मला भेटावयास आला. तो नियमशास्त्राचे अचूक पालन करणारा होता व सर्व यहूदी लोकांचे त्याच्याबद्दल फारच चांगले मत होते.

13 तो माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, ‘बंधू शौल, तुला दृष्टी प्राप्त होवो!’ आणि त्याच क्षणाला मी त्याला पाहू शकलो.

14 “नंतर त्याने मला असे सांगितले: ‘आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराने तुझी निवड यासाठी केली आहे की, तू त्यांची इच्छा जाणून घ्यावीस आणि जे नीतिमान आहेत त्यांना पाहावेस व त्यांच्या तोंडचे शब्द ऐकावेस.

15 तू जे पाहिले व ऐकले आहेस त्याविषयी तू सर्व मनुष्यांना साक्षी होशील.

16 आणि आता विलंब कशासाठी? जा आणि बाप्तिस्मा घे आणि त्यांच्या नावाने धावा करून आपल्या पापांपासून शुद्ध हो.’

17 “यरुशलेमला परतल्यानंतर मी मंदिरात प्रार्थना करीत होतो, तेव्हा मला तंद्री लागली,

18 आणि मी पाहिले की प्रभू माझ्याबरोबर बोलत आहेत. ते मला म्हणाले, ‘ताबडतोब यरुशलेम सोडून जा, कारण येथील लोक माझ्याबद्दल जी साक्ष तू देशील ती ते स्वीकारणार नाहीत.’

19 “मी उत्तर दिले, ‘प्रभू, या लोकांना माहीत आहे की, मी एका सभागृहातून दुसर्‍या सभागृहात जाऊन विश्वासणार्‍यांना मार देऊन तुरुंगात टाकीत होतो.

20 आणि तुझा रक्तसाक्षी स्तेफनाचे रक्त सांडत होते, तेव्हा मी त्याला मान्यता देत उभा होतो आणि जे धोंडमार करीत होते त्यांचे काढून ठेवलेले अंगरखे मी राखीत होतो.’

21 “नंतर प्रभू मला म्हणाले, ‘जा; कारण मी तुला फार दूर गैरयहूदीयांकडे पाठविणार आहे.’ ”


पौल एक रोमी नागरिक

22 या वाक्यापर्यंत समुदायांनी पौलाचे ऐकले. नंतर त्यांनी त्यांचा आवाज वाढवला आणि ओरडून म्हणाले, “हा मनुष्य जमिनीला भार असा आहे! हा जगण्यास योग्य नाही!”

23 ते ओरडत होते, आपले अंगरखे वर हवेत फेकीत होते व धूळ आकाशात उधळीत होते,

24 तेव्हा सेनापतीने पौलाला आत बराकीत आणण्याची आज्ञा केली. लोक त्याच्यावर इतके का ओरडत आहेत, हे समजावे म्हणून त्याने फटके मारून त्याची तपासणी करण्यास सांगितले.

25 जेव्हा ते पौलाला फटके मारण्यासाठी बांधत होते त्यावेळेस पौल तिथे उभा असलेल्या शताधिपतीला म्हणाला, “ज्या मनुष्यावर दोषारोप अजून सिद्ध झालेला नाही, अशा रोमी नागरिकाला फटके मारणे हे कायद्याने योग्य आहे का?”

26 ते ऐकल्याबरोबर तो अधिकारी शताधिपती सेनापतीकडे गेला व म्हणाला, “आपण काय करत आहात? हा मनुष्य तर रोमी नागरिक आहे.”

27 तेव्हा तो सेनापती पौलाकडे गेला आणि त्याने त्याला विचारले, “मला सांग, तू रोमी नागरिक आहेस काय?” त्याने उत्तर दिले. “होय, मी आहे.”

28 त्यावर तो सेनापती बोलला, “मला नागरिकत्व मिळण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागले.” “परंतु मी जन्मतःच रोमी नागरिक आहे,” पौलाने उत्तर दिले.

29 यामुळे जे त्याला प्रश्न विचारून त्याची तपासणी करणार होते ते तत्काळ निघून गेले. सेनापतीला जेव्हा समजले की, पौल एक रोमी नागरिक आहे आणि त्याचा आरोप सिद्ध होण्यापूर्वी त्याला साखळदंडानी बांधले गेले होते, तो फार घाबरून गेला.


न्यायसभेपुढे पौल

30 सेनापतीला हे शोधून काढायचे होते की, खरोखर कोणत्या कारणाने यहूदी लोक पौलाला आरोपी ठरवीत आहेत. म्हणून त्याने दुसर्‍या दिवशी पौलाला मुक्त केले आणि मुख्य याजक व सर्व न्यायसभेचे सभासद यांना एकत्र होण्याचा हुकूम केला. त्यांनी पौलाला न्यायसभेपुढे आणून उभे केले.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan