प्रेषित 2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीपवित्र आत्मा पन्नासाव्या दिवशी उतरतो 1 जेव्हा पेंटेकॉस्टचा दिवस आला, त्यावेळी ते सर्व एका ठिकाणी जमले होते. 2 एकाएकी स्वर्गातून प्रचंड सोसाट्याच्या वार्यासारखा आवाज आला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व घर त्याने भरले. 3 त्यावेळी अग्नीच्या जिभांसारख्या दिसणार्या जिभा वेगवेगळ्या होऊन प्रत्येकावर एकएक अशा स्थिरावताना त्यांना दिसल्या. 4 तिथे उपस्थितीत असलेले सगळे जण पवित्र आत्म्याने भरले आणि आत्म्याने हे करण्यास त्यांना समर्थ केल्यामुळे ते वेगवेगळ्या भाषेत बोलू लागले. 5 त्यावेळेस आकाशाखालील प्रत्येक देशामधून आलेले भक्तिमान यहूदी यरुशलेममध्ये राहत होते. 6 जेव्हा त्यांनी तो मोठा आवाज ऐकला, तेव्हा त्या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी जमली आणि ते गोंधळून गेले, कारण प्रत्येकाने स्वतःची मातृभाषा बोलली जात असलेली ऐकले. 7 विस्मित होऊन त्यांनी विचारले: “हे सर्व बोलत आहेत ते गालीलकर आहेत ना? 8 तरीसुद्धा ते आमच्या मातृभाषांमध्ये बोलताना आम्ही ऐकत आहोत हे कसे? 9 आम्ही येथे पार्थी, मेदिया आणि एलामी लोक आहोत; मेसोपोटामिया रहिवासी, यहूदीया आणि कप्पदुकिया, पंत आणि आशिया, 10 फ्रुगिया आणि पंफुल्या, इजिप्त व कुरणेच्या जवळचा लिबिया; रोमहून आलेले पाहुणे 11 यहूदी व धर्मांतर झालेले यहूदी; क्रेतीय व अरब लोक हे देखील आमच्यात आहेत. तरी देखील परमेश्वराच्या अद्भुत कृत्यांबद्दल आमच्या भाषेमध्ये बोलताना ऐकत आहोत!” 12 ते चकित झाले व गोंधळून एकमेकांना विचारू लागले, “याचा अर्थ काय असेल?” 13 पण काहीजण थट्टा करीत म्हणाले, “हे द्राक्षारसाचे अति सेवन करून मस्त झाले आहे.” पेत्राचे जमावाला उद्देशून भाषण 14 त्यावेळी पेत्र अकरा प्रेषितांसह उभा राहून, त्या जमावाला उद्देशून मोठ्याने म्हणाला: “यरुशलेममधील यहूदी बंधूंनो आणि रहिवाशांनो, तुम्हाला या गोष्टी स्पष्ट समजणे आवश्यक आहे; म्हणून माझे बोलणे लक्षपूर्वक ऐका. 15 तुम्ही समजता त्याप्रमाणे ही माणसे द्राक्षारसाने मस्त झालेली नाहीत. आता तर सकाळचे फक्त नऊ वाजले आहेत! 16 तर पाहा याविषयी संदेष्टा योएलने असे भविष्य केले होते: 17 “ ‘परमेश्वर म्हणतात, शेवटच्या दिवसात, मी माझा आत्मा सर्व लोकांवर ओतेन. तुमचे पुत्र व तुमच्या कन्या भविष्यवाणी करतील, व तुमचे वृद्ध स्वप्ने पाहतील, तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील. 18 माझ्या दासांवर म्हणजेच, स्त्री आणि पुरुष दोघांवरही, त्या दिवसांत मी माझा आत्मा ओतेन. आणि ते भविष्यवाणी करतील. 19 वर आकाशात व खाली पृथ्वीवर, रक्त व अग्नी व धुरांचे स्तंभ अशी विलक्षण चिन्हे मी दाखवेन. 20 प्रभूचा महान व गौरवी दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. 21 आणि जो कोणी प्रभूच्या नावाने त्यांचा धावा करेल तोच वाचेल.’ 22 “अहो इस्राएली लोकहो! आता हे लक्ष देऊन ऐका: तुम्हाला चांगलेच माहीत आहे की, परमेश्वराने नासरेथकर येशूंना अधिकृत मान्यता देऊन त्यांच्याद्वारे तुमच्यामध्ये चमत्कार, अद्भुत गोष्टी व चिन्हे केली. 23 परमेश्वराच्या पूर्वनियोजित योजनेप्रमाणे व त्यांच्या पूर्वज्ञानानुसार या मनुष्यास तुमच्या हातात सोपवून दिले आणि तुम्ही दुष्ट लोकांच्या मदतीने, त्यांना क्रूसावर खिळे ठोकून जिवे मारले. 24 परंतु परमेश्वराने त्यांची मृत्यूच्या वेदनांपासून सुटका केली व त्यांना मरणातून पुन्हा उठविले, कारण मृत्यूला येशूंवर अधिकार चालविणे अशक्य होते. 25 दावीद राजा त्यांच्यासंबंधी म्हणतो: “ ‘मी माझ्या प्रभूला नित्य दृष्टीसमोर ठेवले आहे. कारण ते माझ्या उजवीकडे आहेत, मी डळमळणार नाही. 26 यास्तव माझे अंतःकरण उल्हासित आहे आणि माझी जीभ स्तुतिगान करीत आहे; माझे शरीर देखील आशेत विसावा घेईल, 27 कारण तुम्ही मला अधोलोकात राहू देणार नाही, किंवा तुमच्या पवित्रजनाला कुजणे पाहू देणार नाही. 28 तुम्ही मला जीवनाचे मार्ग कळविले आहेत; तुमच्या समक्षतेत तुम्ही मला हर्षाने भराल.’ 29 “प्रिय यहूदी बंधूंनो, मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो की, आपला पूर्वज दावीद मरण पावला आणि त्याला पुरले व त्याची कबर आज देखील येथे आहे. 30 परंतु तो संदेष्टा होता व त्याला माहीत होते की परमेश्वराने त्याला शपथ वाहून असे अभिवचन दिले होते, त्याच्या वंशजांपैकी एकाला ते त्याच्या सिंहासनावर बसवतील. 31 पुढे होणार्या गोष्टी पाहता, तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल बोलला, की त्यांना अधोलोकात राहू दिले नाही किंवा त्यांच्या देहाला कुजणे पाहू दिले नाही. 32 त्याच येशूंना परमेश्वराने मरणातून उठवून जिवंत केले आणि त्याचे आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत. 33 आता ते परमेश्वराच्या उजवीकडे उच्च पदावर आहेत, अभिवचन दिल्याप्रमाणे त्यांनी तो पवित्र आत्मा पित्याकडून घेऊन आम्हावर ओतला आहे, त्याचाच हा परिणाम जे तुम्ही आता पाहात आणि ऐकत आहात. 34 कारण दावीद आकाशात चढून गेला नाही, तरी तो म्हणाला, “ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले: 35 “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’ 36 “यास्तव इस्राएलातील सर्वजणांनी खात्री करून घ्यावीः ज्या येशूंना तुम्ही क्रूसावर दिले होते, त्यांना परमेश्वराने प्रभू आणि ख्रिस्त केले आहे.” 37 हे त्याचे बोलणे लोकांच्या अंतःकरणाला भेदले आणि ते पेत्राला व इतर प्रेषितांना म्हणाले, “बंधुजनहो, आता आम्ही काय करावे?” 38 पेत्राने उत्तर दिले, “पश्चात्ताप करा आणि तुमच्या पापांच्या क्षमेसाठी येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्यावा आणि तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. 39 हे वचन तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलाबाळांसाठी आणि सर्वांसाठी जे फार दूर आहेत आणि ज्यांना प्रभू आमचे परमेश्वर बोलावतील त्यांच्यासाठी आहे.” 40 आणखी त्याने पुष्कळ शब्दांनी त्यांना इशारा दिला आणि विनवणी करून म्हटले, “या भ्रष्ट पिढीपासून तुम्ही स्वतःला वाचवा.” 41 ज्यांनी हा त्यांचा संदेश ग्रहण केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी सुमारे तीन हजार लोकांची त्यांच्या संख्येत भर पडली. विश्वासणार्यांची सहभागिता 42 प्रेषितांद्वारे दिले जात असलेले शिक्षण आणि सहभागिता, भाकर मोडणे आणि प्रार्थना यासाठी ते स्वतः समर्पित झाले. 43 प्रेषितांद्वारे झालेली अनेक अद्भुते व चिन्हे पाहून सर्वांच्या मनामध्ये भीतियुक्त आदर निर्माण झाला होता. 44 तेव्हा सर्व विश्वासणारे एकत्र होते आणि त्यांच्याजवळ असलेले सर्वकाही समाईक होते. 45 जे कोणी गरजवंत होते, त्यांना देण्यासाठी त्यांनी त्यांच्या जमिनी आणि मालमत्ता विकल्या. 46 दररोज मंदिराच्या अंगणात ते एकत्र जमत होते आणि त्यांच्या घरांमध्ये भाकर मोडीत असत आणि मोठ्या आनंदाने व कृतज्ञ मनाने एकत्र खात होते, 47 परमेश्वराची स्तुती करीत होते आणि सर्व लोकांकडून त्यांना चांगली वागणूक मिळाल्याचा आनंद ते करीत होते आणि प्रभूने त्यांच्या संख्येत प्रत्येक दिवशी तारण पावलेल्यांची भर घातली. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.