2 तीमथ्य 1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 ख्रिस्त येशूंमधील जीवनाच्या अभिवचनानुसार, परमेश्वराच्या इच्छेने ख्रिस्ताचा प्रेषित पौल याच्याकडून, 2 माझा प्रिय पुत्र तीमथ्य यास: परमेश्वर पिता आणि ख्रिस्त येशू आपले प्रभू, यांची कृपा, दया आणि शांती असो. उपकारस्तुती 3 मी निरंतर प्रार्थनेत तुझी आठवण करताना, ज्या माझ्या पूर्वजांच्या परमेश्वराची मी शुद्ध मनाने सेवा करतो, त्यांचे आभार मानतो. 4 त्यावेळचे तुझे अश्रू मला आठवतात. तुला पुन्हा भेटण्यास मी किती उत्कंठित झालो आहे, जेणे करून माझा आनंद पूर्ण होईल. 5 तुझी आई युनीके आणि तुझी आजी लोईस यांचा प्रभूवर जितका दृढविश्वास आहे आणि माझी खात्री आहे की तोच विश्वास तुझ्यामध्येही आहे. शुभवार्ता आणि पौल यांच्याशी निष्ठा ठेवण्यास आठवण 6 म्हणूनच तुझ्यावर मी हात ठेवल्याने, परमेश्वराची जी देणगी तुला मिळाली, त्या देणगीला तू नव्याने प्रज्वलित केले पाहिजे. याची मी तुला आठवण देत आहे. 7 कारण परमेश्वराने आम्हाला भित्रेपणाचा आत्मा नाही, तर सामर्थ्य, प्रीती आणि आत्मसंयमनाचा आत्मा दिला आहे. 8 म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यास आणि जो मी त्यांचा बंदिवान, त्या माझ्याविषयी तू लाज वाटून घेऊ नकोस, तर शुभवार्तेसाठी परमेश्वराच्या सामर्थ्याने तू माझ्याबरोबर दुःखाचा वाटा घे. 9 त्यांनीच आपले तारण केले आणि पवित्र जीवनासाठी आपल्याला पाचारण केले हे त्यांनी आपण काही केले म्हणून नव्हे, तर स्वतःच्या हेतूसाठी व कृपेमुळे केले. ही कृपा आपल्याला ख्रिस्त येशूंमध्ये युगाच्या पूर्वी दिलेली होती. 10 तर आता आपला तारणारा ख्रिस्त येशूंच्या देखाव्याने प्रकट झाली आहे, ज्यांनी एकीकडे मृत्यूचा नाश केला आणि दुसरीकडे ईश्वरीय शुभवार्तेद्वारे जीवन आणि अमरत्व प्रकाशित केले. 11 मला त्या शुभवार्तेची घोषणा करणारा, प्रेषित आणि शिक्षक म्हणून निवडले आहे. 12 याच कारणामुळे मी येथे तुरुंगात दुःख सोशीत आहे. पण मला त्याची मुळीच लाज वाटत नाही, कारण ज्यांच्यावर माझा विश्वास आहे, त्यांना मी चांगला ओळखतो आणि माझी खात्री आहे की मी त्यांच्याकडे सोपविलेली माझी ठेव त्यांच्या त्या दिवसापर्यंत राखून ठेवण्यास ते समर्थ आहे. 13 जो चांगल्या शिक्षणाचा नमुना तू माझ्याकडून ऐकला, तो ख्रिस्त येशूंमधील विश्वास आणि प्रीती याबरोबर दृढ धरून राहा. 14 आमच्या ठायी वस्ती करीत असलेल्या पवित्र आत्म्याकडून मिळालेली चांगली ठेव सांभाळ. निष्ठा आणि अनिष्ठा यांचे उदाहरणे 15 आशियातील सर्व विश्वासी माझ्यापासून दूर गेले आहे, हे तुला माहीतच आहे. त्यामध्ये फुगलस आणि हर्मगनेस हे देखील आहेत. 16 अनेसिफर आणि त्याचे सर्व कुटुंबीय यांच्यावर प्रभू दया करो, कारण त्याने अनेक वेळा मला उत्तेजन दिले आणि त्याला माझ्या तुरुंगवासाची कधीच लाज वाटली नाही. 17 जेव्हा तो रोममध्ये आला, तेव्हा त्याने सर्वत्र माझा कसून शोध केला आणि शेवटी मला शोधून काढले. 18 त्या दिवशी प्रभूपासून त्याला दया मिळेल असे प्रभू करो! इफिसमध्ये त्याने मला किती प्रकारे मदत केली, हे तुला चांगले माहीत आहे. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.