Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ शमुवेल 3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 शौलाचे घराणे आणि दावीदाचे घराणे यांच्यामधील युद्ध फार काळ चालू होते. दावीदाचे घराणे अधिक अधिक बलवान होत गेले आणि शौलाचे घराणे अधिक अधिक दुर्बल होत गेले.

2 हेब्रोन येथे दावीदाचे जे पुत्र जन्मले ते हे: त्याचा ज्येष्ठपुत्र अम्नोन हा येज्रीली अहीनोअम हिच्यापासून झाला होता;

3 त्याचा दुसरा पुत्र किलियाब, हा त्याला कर्मेलच्या नाबालाची विधवा अबीगईल हिच्यापासून झाला; तिसरा पुत्र अबशालोम हा गशूरचा राजा तलमय याची कन्या माकाह हिच्यापासून झाला;

4 चौथा पुत्र अदोनियाह हा हग्गीथपासून जन्मला; पाचवा पुत्र शफाट्याह हा अबीटालपासून झाला;

5 आणि सहावा पुत्र इथ्रियाम हा दावीदाची पत्नी एग्लाह हिच्यापासून झाला. हेब्रोन येथे जन्मलेले दावीदाचे पुत्र हे होते.


अबनेर दावीदाकडे जातो

6 दावीद व शौल यांच्या घराण्यांमधील लढाईच्या काळात, अबनेर शौलाच्या घराण्यात आपले स्थान मजबूत करीत होता.

7 रिजपाह नावाची शौलाची एक उपपत्नी होती, जी अय्याहची कन्या होती. इश-बोशेथ अबनेरला म्हणाला, “तू माझ्या बापाच्या उपपत्नीबरोबर का संबंध केला?”

8 तेव्हा इश-बोशेथचे बोलणे ऐकल्याने अबनेर फार संतापला. त्याने उत्तर दिले, “मी यहूदीयाच्या कुत्र्याचे डोके आहे काय? आजही मी तुझा पिता शौल याच्या घराण्याशी आणि त्याच्या कुटुंबाशी आणि त्याच्या मित्रांशी एकनिष्ठ आहे. मी तुला दावीदाच्या हातून शासन केले नाही. तरीही या स्त्रीला मध्ये आणून माझ्यावर अपराधाचा आरोप करीत आहे!

9 याहवेहने शपथ घेऊन दावीदाला जे म्हटले आहे त्याप्रमाणे मी जर केले नाही तर परमेश्वर अबनेराचे तसे किंवा त्यापेक्षा अधिक शासन करोत.

10 आणि शौलाच्या घराण्याकडून राज्य हस्तांतरीत करून इस्राएल आणि यहूदीयावर दानपासून बेअर-शेबापर्यंत दावीदाचे सिंहासन स्थापित केले नाही तर परमेश्वर अबनेरशी अधिक कठोरपणे वागो.”

11 इश-बोशेथ अबनेरला आणखी एकही शब्द बोलण्यास धजला नाही, कारण तो अबनेरला घाबरत होता.

12 नंतर अबनेरने आपल्या निरोप्यांना दावीदाकडे असे म्हणत पाठवले, “हा प्रदेश कोणाचा आहे? माझ्याबरोबर एक करार कर आणि मी सर्व इस्राएली लोकांना तुझ्याकडे आणण्यास मदत करेन.”

13 दावीद म्हणाला, “ठीक आहे, मी तुझ्याबरोबर एक करार करेन. परंतु मी तुझ्याकडून एका गोष्टीची मागणी करतो: जेव्हा तू मला भेटायला येशील तेव्हा शौलाची कन्या मीखल हिला घेऊन आल्याशिवाय माझ्यासमोर येऊ नकोस.”

14 नंतर दावीदाने शौलाचा पुत्र इश-बोशेथ याच्याकडे दूत पाठवून सांगितले, “माझी पत्नी मीखल मला दे, जिला मी शंभर पलिष्ट्यांच्या अग्रत्वचा किंमत देऊन वाग्दत्त करून घेतली.”

15 तेव्हा इश-बोशेथने हुकूम करून मीखलला तिचा पती, लईशचा पुत्र पलतीएल याच्यापासून आणले.

16 तरीही तिचा पती रडत तिच्यामागे बहूरीमपर्यंत गेला. तेव्हा अबनेर त्याला म्हणाला, “परत घरी जा!” तेव्हा तो परत गेला.

17 अबनेरने इस्राएलच्या पुढार्‍यांबरोबर विचारविनिमय केला आणि म्हणाला, “दावीद तुमचा राजा व्हावा अशी काही काळापासून तुमची इच्छा होती.

18 आता तसे करा! कारण याहवेहने दावीदाला अभिवचन दिले आहे, ‘माझा सेवक दावीद याच्याद्वारे माझ्या इस्राएली लोकांना मी पलिष्ट्यांच्या आणि त्यांच्या सर्व शत्रूंच्या हातातून सोडवेन.’ ”

19 अबनेर बिन्यामीन लोकांबरोबरही प्रत्यक्ष बोलला. नंतर तो हेब्रोनास दावीदाकडे गेला व इस्राएली आणि संपूर्ण बिन्यामीन गोत्राला जे करण्याची इच्छा होती ते दावीदाला सांगितले.

20 जेव्हा अबनेर त्याच्या बरोबरच्या वीस माणसांना घेऊन दावीदाकडे हेब्रोनास आला, तेव्हा दावीदाने त्याच्यासाठी आणि त्याच्या माणसांसाठी मेजवानी तयार केली.

21 तेव्हा अबनेर दावीदाला म्हणाला, “मी जाऊन माझ्या धनीराजासाठी सर्व इस्राएली लोकांना एकत्र करेन, यासाठी की त्यांनी तुमच्याबरोबर एक करार करावा, मग आपल्या मनास येईल त्यांच्यावर आपण राज्य करावे” तेव्हा दावीदाने अबनेरला रवाना केले आणि तो शांतीने गेला.


योआब अबनेरचा वध करतो

22 त्याचवेळेस दावीदाची माणसे आणि योआब छापा घालून परतले आणि आपल्याबरोबर मोठी लूट आणली. परंतु अबनेर दावीदाबरोबर हेब्रोनमध्ये नव्हता, कारण दावीदाने त्याला रवाना केले होते आणि तो शांतीने गेला होता.

23 जेव्हा योआब आणि त्याच्या बरोबरचे सर्व सैनिक आले तेव्हा त्याला सांगितले गेले की, नेराचा पुत्र अबनेर राजाकडे आला होता आणि राजाने त्याला परत पाठवून दिले आणि तो शांतीने गेला होता.

24 तेव्हा योआब राजाकडे गेला आणि म्हणाला, “आपण हे काय केले? पाहा, अबनेर आपणाकडे आला होता. आपण त्याला का जाऊ दिले? आता तो गेला आहे!

25 आपणास नेराचा पुत्र अबनेर कसा आहे हे माहीत आहे; तो आपणास फसवायला आणि आपल्या हालचाली पाहण्यासाठी आणि आपण जे करता त्याचा अंदाज घेण्यासाठी आला होता.”

26 नंतर योआब दावीदाकडून निघाला आणि त्याने अबनेरच्या मागे निरोप्यांना पाठवले आणि त्यांनी त्याला सिराहच्या विहिरीपासून परत आणले. परंतु दावीदाला हे माहीत नव्हते.

27 जेव्हा अबनेर हेब्रोनास परत आला, तेव्हा योआबाने त्याला आतील खोलीत बाजूला नेले जसे की, त्याला त्याच्याबरोबर काही खाजगी बोलावयाचे आहे. आणि तिथे त्याचा भाऊ असाहेल याच्या रक्ताचा सूड घ्यावा म्हणून योआबने त्याच्या पोटावर वार केला आणि तो मरण पावला.

28 नंतर जेव्हा दावीदाने याबद्दल ऐकले, तो म्हणाला, “मी आणि माझे राज्य नेराचा पुत्र अबनेर याच्या रक्ताबाबतीत याहवेहसमोर निर्दोष आहोत.

29 त्याचे रक्तदोष योआब आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर असो! योआबच्या कुटुंबात स्रावी, महारोगी, कुबडीवर टेकलेला, तलवारीने पडणारा, अन्नावाचून राहणारा असा कोणी ना कोणी असल्याशिवाय राहणार नाही.”

30 योआब व त्याचा भाऊ अबीशाई यांनी अबनेरला मारून टाकले, कारण त्याने गिबोनच्या लढाईत त्यांचा भाऊ असाहेलला मारले होते.

31 नंतर दावीद योआबाला आणि त्याच्याबरोबर असलेल्या सर्व लोकांना म्हणाला, “तुमची वस्त्रे फाडा आणि गोणपाट नेसून अबनेरसमोर शोक करत चला.” दावीद राजा स्वतः तिरडीमागे चालला.

32 त्यांनी अबनेरास हेब्रोनमध्ये पुरले आणि राजाने अबनेरच्या कबरेजवळ मोठ्याने आकांत केला. सर्व लोकसुद्धा रडले.

33 राजाने अबनेरसाठी हे विलापगीत गाईले: “मूर्खाने मरावे तसे अबनेरने मरावे काय?

34 तुझे हात बांधलेले नव्हते, तुझ्या पायसुद्धा बेड्यांमध्ये नव्हते. दुष्टासमोर एखादा पडावा तसा तू पडला.” आणि सर्व लोक त्याच्यासाठी पुन्हा रडले.

35 नंतर त्या सर्वांनी येऊन दावीदाने दिवस असताच काही खावे अशी विनंती केली; पण दावीद शपथ घेत म्हणाला, “सूर्यास्ताच्या आधी मी भाकर किंवा काहीही सेवन केले, तर परमेश्वर मला कठोर शासन करोत!”

36 सर्व लोकांनी हे लक्षात घेतले आणि त्यांना समाधान वाटले; राजाने जे सर्वकाही केले त्यात ते खचितच समाधानी झाले.

37 त्या दिवशी तिथे असलेल्या सर्व लोकांना आणि सर्व इस्राएलला लक्षात आले की, नेराचा पुत्र अबनेर याला ठार मारण्यात राजाचा काही भाग नव्हता.

38 नंतर राजा आपल्या माणसांना म्हणाला, “तुम्हाला लक्षात येत नाही काय की आज इस्राएलमध्ये एक सेनापती, एक महान पुरुष पडला आहे?

39 आणि आज, मी अभिषिक्त राजा असूनही, निर्बल आहे आणि जेरुइयाहचे हे पुत्र माझ्यासाठी फारच शक्तिमान आहेत. याहवेह वाईट कृत्य करणाऱ्यास त्याच्या दुष्कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देवो!”

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan