Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ शमुवेल 24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


दावीद योद्धे पुरुषांची नोंदणी करतो

1 इस्राएली लोकांविरुद्ध याहवेहचा कोप पुन्हा भडकला आणि त्यांनी दावीदाला चिथविले, “जा आणि इस्राएल व यहूदीयाची शिरगणती कर.”

2 म्हणून राजाने योआब व त्याच्या बरोबरच्या सेनापतींना सांगितले, “दानपासून बेअर-शेबापर्यंत इस्राएलच्या सर्व गोत्रांमधून फिरून, लढाऊ पुरुषांची नोंदणी करा, म्हणजे ते किती आहेत ते मला कळेल.”

3 परंतु योआबाने राजाला उत्तर दिले, “याहवेह आपले परमेश्वर आपल्या सैन्यातील संख्या शंभरपटीने वाढवो आणि माझे स्वामी ते आपल्या डोळ्यांनी पाहो. परंतु गणती करावी अशी इच्छा राजा का बाळगतात?”

4 तथापि, राजाच्या शब्दापुढे योआब व सेनापतींचे म्हणणे सफल झाले नाही; तेव्हा ते इस्राएलच्या लढाऊ पुरुषांची गणती करण्यासाठी राजापुढून निघून गेले.

5 यार्देन पार केल्यावर, त्यांनी अरोएर नगराच्या दक्षिणेकडील खोर्‍यात डेरा दिला, नंतर ते गादमधून जाऊन याजेरकडे गेले.

6 नंतर ते गिलआद व तहतीम होदशी या प्रांतात गेले व तिथून दान यअनकडून वळसा घेऊन सीदोनकडे गेले.

7 नंतर ते सोरच्या किल्ल्याकडे आणि हिव्वी व कनानी यांच्या सर्व नगरांकडे व शेवटी ते यहूदीयाच्या नेगेवप्रांतातील बेअर-शेबापर्यंत गेले.

8 नऊ महिने वीस दिवस संपूर्ण देशात फिरल्यानंतर, ते यरुशलेमात परत आले.

9 योआबाने राजाला योद्धे पुरुषांच्या संख्येचा अहवाल दिला: इस्राएलमध्ये धनुर्धारी आठ लाख व यहूदीयामध्ये पाच लाख पुरुष होते.

10 योद्धे पुरुषांची गणती केल्यानंतर दावीदाचे मन त्याला टोचू लागले आणि त्याने याहवेहला म्हटले, “मी जे केले ते करून मी पाप केले आहे. तर आता हे याहवेह, मी आपणास विनंती करतो की आपल्या सेवकाचा दोष दूर करा; मी मूर्खपणा केला आहे.”

11 दुसर्‍या दिवशी सकाळी दावीद उठण्यापूर्वी, दावीदाचा द्रष्टा, गाद संदेष्टा, याच्याकडे याहवेहचे वचन आले:

12 “जाऊन दावीदाला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझ्यापुढे तीन पर्याय ठेवतो. त्यापैकी तू एकाची निवड कर, जो मी तुझ्याविरुद्ध वापरावा.’ ”

13 तेव्हा गाद दावीदाकडे गेला व त्याला म्हटले, “तुमच्यासमोर देशभर तीन वर्षांचा दुष्काळ असावा? किंवा शत्रूकडून तुमचा पाठलाग होत असताना तीन महिने तुम्ही त्यांच्यापासून पळ काढावा? किंवा तुमच्या देशात तीन दिवस पीडा यावी? तर आता यावर विचार करून ज्यांनी मला पाठविले आहे त्यांना काय उत्तर द्यावे ते तुम्ही ठरवून मला सांगा.”

14 दावीदाने गादला म्हटले, “मी मोठ्या पेचात आहे. आपण याहवेहच्या हाती पडू, कारण त्यांची कृपा अपार आहे; परंतु मला मनुष्याच्या हातात पडू देऊ नको.”

15 तेव्हा याहवेहने इस्राएल देशात त्या सकाळपासून नेमलेल्या वेळेपर्यंत मरी पाठवली आणि दानपासून बेअर-शेबापर्यंत सत्तर हजार लोक मरण पावले.

16 जेव्हा यरुशलेमचा नाश करण्यासाठी दूताने आपला हात लांब केला, तेव्हा याहवेहला अरिष्टाविषयी वाईट वाटले आणि लोकांचा नाश करणार्‍या दूताला याहवेहने म्हटले, “पुरे! आपला हात आवर.” त्यावेळी याहवेहचा दूत यबूसी अरवनाहच्या खळ्याजवळ होता.

17 दावीदाने जेव्हा लोकांचा नाश करणार्‍या दूताला पाहिले, तो याहवेहला म्हणाला, “मी पाप केले आहे; जो मी मेंढपाळ, तो मी चुकीचे वागलो. ही तर केवळ मेंढरे आहेत. त्यांनी काय केले आहे? आपला हात माझ्यावर व माझ्या घराण्यावर पडो.”


दावीद वेदी बांधतो

18 त्या दिवशी गाद दावीदाकडे आला आणि त्याला म्हणाला, “जा आणि यबूसी अरवनाहच्या खळ्यात याहवेहप्रीत्यर्थ वेदी बांध.”

19 तेव्हा गादद्वारे याहवेहने दिलेल्या आज्ञेनुसार दावीद वर गेला.

20 राजा व त्याची माणसे आपल्याकडे येत आहेत असे जेव्हा अरवनाहने पाहिले, तेव्हा त्याने राजासमोर जाऊन भूमीकडे तोंड करून दंडवत घातले.

21 अरवनाहने विचारले, “माझे स्वामी आपल्या सेवकाकडे का आले आहेत?” दावीदाने उत्तर दिले, “मी तुझे खळे विकत घेण्यासाठी आलो आहे, लोकांवर आलेली मरी थांबावी म्हणून याहवेहसाठी मी इथे वेदी बांधेन.”

22 अरवनाह दावीदाला म्हणाला, “माझ्या स्वामींना मनास येईल ते त्यांनी घ्यावे व अर्पण करावे. हे पाहा होमार्पणासाठी बैल इकडे आहेत आणि लाकडासाठी मळणीची आऊते व बैलाचे जू येथे आहे.

23 महाराज, अरवनाह हे सर्व राजाला देत आहे.” त्याचप्रमाणे अरवनाह हे सुद्धा म्हणाला, “याहवेह आपले परमेश्वर आपला स्वीकार करो.”

24 परंतु राजा अरवनाहला म्हणाला, “नाही, मी त्याबद्दल तुला किंमत मोजून देणार. फुकट मिळालेले होमार्पण याहवेह माझ्या परमेश्वराला मी अर्पिणार नाही.” म्हणून दावीदाने जात्याचे खळे आणि बैल चांदीचे पन्नास शेकेल देऊन विकत घेतले.

25 नंतर दावीदाने तिथे याहवेहप्रीत्यर्थ एक वेदी बांधली व होमार्पणे व शांत्यर्पणे अर्पिली. तेव्हा दावीदाने देशाच्या वतीने केलेली प्रार्थना याहवेहने ऐकली आणि इस्राएलातील पीडा नाहीशी झाली.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan