२ शमुवेल 23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीदावीदाचे शेवटचे शब्द 1 दावीदाचे शेवटचे शब्द हे आहेत: “इशायाचा पुत्र दावीदाचे प्रेरित शब्द, परात्पराने ज्याला उंच केले त्याचे हे शब्द, याकोबाच्या परमेश्वराद्वारे ज्याचा अभिषेक झाला, जो इस्राएलच्या गीतांचा नायक: 2 “याहवेहचा आत्मा माझ्याद्वारे बोलला आहे; त्यांचे वचन माझ्या जिभेवर होते. 3 इस्राएलचे परमेश्वर बोलले, इस्राएलच्या खडकाने मला म्हटले: ‘जेव्हा एखादा मनुष्य न्यायाने लोकांवर राज्य करतो, जेव्हा तो परमेश्वराचे भय बाळगून राज्य करतो, 4 तो सूर्योदयाच्या प्रकाशासारखा निरभ्र पहाटेच्या प्रभेसारखा, पाऊसानंतरच्या तेजाप्रमाणे जे भूमीतून गवत उगवते त्याप्रमाणे आहे.’ 5 “जर माझे घराणे परमेश्वराशी सरळ नसते, तर खचितच त्यांनी माझ्याशी सर्वकाळचा करार, सर्वप्रकारे सुव्यवस्थित व निश्चित केला नसता, खचितच त्यांनी माझे तारण सफल करून माझी प्रत्येक आकांक्षा पूर्ण केली नसती. 6 परंतु सर्व दुष्ट लोक काट्यांसारखे फेकले जातील, जे हाताने गोळा करता येत नाहीत. 7 जे कोणी काट्यांना गोळा करतात ते लोखंडी साधन किंवा भाल्याचा दांडा वापरतात; ते जागीच भस्म केले जातात.” दावीदाचे पराक्रमी योद्धे 8 दावीदाच्या पराक्रमी योद्ध्यांची नावे ही: तहकेमोनचा योशेब-बश्शेबेथ तीन सेनापतींचा प्रमुख होता; त्याने भाला उगारून एका हल्ल्यात आठशे लोकांना मारून टाकले. 9 त्याच्यानंतर अहोहचा रहिवासी दोदोचा पुत्र एलअज़ार होता. तो तीन पराक्रमी योद्ध्यांपैकी एक होता. पस-दम्मीम येथे युद्धासाठी एकत्र आलेल्या पलिष्ट्यांना टोमणे मारत जो दावीदाबरोबर होता. तेव्हा इस्राएल लोक माघारी गेले होते, 10 परंतु एलअज़ार युद्धभूमीवर राहून, त्याचा हात थकेपर्यंत व तलवारीला त्याचा हात चिकटून जाईपर्यंत त्याने पलिष्ट्यांना ठार मारले होते. त्या दिवशी याहवेहने त्यांना मोठा विजय प्राप्त करून दिला. सैन्य पुन्हा एलअज़ारकडे आले ते केवळ मेलेल्यांना लुटायला. 11 त्याच्यानंतर अगी हरारी याचा पुत्र शम्माह होता. मसूरांनी भरलेले शेत असलेल्या एका ठिकाणी पलिष्टी एकत्र जमले तेव्हा इस्राएली सैन्याने पलिष्ट्यांपुढून पळ काढला होता. 12 परंतु शम्माह त्या शेताच्या मध्यभागी उभा राहिला, त्याचा बचाव त्यांनी केला आणि पलिष्ट्यांना मारून टाकले आणि याहवेहने त्या दिवशी मोठा विजय मिळवून दिला. 13 हंगामाच्या वेळी, जेव्हा पलिष्ट्यांच्या टोळीने रेफाईमच्या खोर्यात छावणी दिली होती, तेव्हा तीस मुख्य सेनापती योद्ध्यांपैकी तिघे जण दावीदाकडे अदुल्लाम गुहेकडे आले. 14 त्यावेळी दावीद गडावर होता आणि पलिष्टी सेना बेथलेहेम नगरात होती. 15 दावीदाला पाणी पिण्याची उत्कट इच्छा झाली व म्हणाला, “बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी मला कोणी आणून दिले तर किती बरे असते!” 16 तेव्हा या तीन पराक्रमी योद्ध्यांनी पलिष्ट्यांच्या छावणीमधून घुसून, बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी काढून दावीदाकडे आणले. परंतु दावीदाने ते पिण्याचे नाकारले; आणि ते याहवेहसमोर ओतले. 17 दावीद म्हणाला, “मी असे करणे माझ्यापासून दूर असो, हे याहवेह! ज्या पुरुषांनी आपला जीव धोक्यात घालून आणले, त्यांचे ते रक्त नाही काय?” म्हणून दावीद ते पाणी प्याला नाही. अशी साहसी कामे त्या तीन पराक्रमी योद्ध्यांनी केली होती. 18 जेरुइयाहचा पुत्र योआबचा भाऊ अबीशाई हा तिघांचा प्रमुख होता. त्याने आपला भाला तीनशे लोकांवर उगारून त्यांना मारून टाकले होते, म्हणून तो या तिघांप्रमाणेच प्रसिद्ध झाला होता. 19 या तिघांपेक्षा त्याला मोठा सन्मान दिला नाही काय? तो त्या तिघांचाही सेनापती झाला, जरी त्या तिघांमध्ये त्याची गणती झाली नाही. 20 कबसेल येथील एक शूर मनुष्य होता, जो यहोयादाचा पुत्र बेनाइयाह होता. त्याने मोआबाच्या सर्वात पराक्रमी योद्ध्यांना ठार मारले होते. त्याचप्रमाणे बर्फाच्या दिवसात खाली गुहेत जाऊन एका सिंहाला ठार मारले. 21 त्याने एका बलाढ्य इजिप्ती मनुष्याला सुद्धा जिवे मारले होते. जरी त्या इजिप्ती माणसाच्या हातात भाला होता, बेनाइयाह केवळ आपली काठी हातात घेऊन त्याच्याशी लढण्यास गेला. त्याने त्याचा भाला हिसकावून घेतला व त्याच्याच भाल्याने त्याला मारून टाकले. 22 यहोयादाचा पुत्र बेनाइयाहची ही साहसी कामे होती; त्या तीन पराक्रमी योद्ध्यांप्रमाणे त्याने देखील किर्ती मिळविली होती. 23 इतर तीस जणांपेक्षा त्याला मोठा सन्मान दिला गेला, परंतु तिघांमध्ये त्याची गणती झाली नाही. आणि दावीदाने त्याला आपल्या अंगरक्षकांचा अधिकारी म्हणून नेमले. 24 तीस जण येणेप्रमाणे होते: योआबाचा भाऊ असाहेल, बेथलेहेमकर दोदोचा पुत्र एलहानान, 25 हरोदी शम्माह, हरोदी एलीका, 26 पालती हेलेस, तकोवा येथील इक्केशाचा पुत्र ईरा, 27 अनाथोथचा अबिएजेर, हुशाथचा सिब्बखय, 28 अहोह येथील सलमोन, नटोफाथी माहाराई, 29 नटोफाथी बाअनाहचा पुत्र हेलेब, गिबियाहतील बिन्यामीन गोत्रातील रीबाईचा पुत्र इत्तई, 30 पिराथोनचा बेनाइयाह, गाशाच्या ओढ्याजवळचा हिद्दै, 31 अर्बाथचा अबी-अल्बोन, बहरहूमचा अजमावेथ, 32 शालबोनचा एलीहबा, याशेनाचे पुत्र, योनाथान 33 हरार येथील शम्माहचा पुत्र, हरार येथील शारारचा पुत्र अहीयाम, 34 माकाथी अहसबैचा पुत्र एलिफेलेत, गिलोनी अहीथोफेलचा पुत्र एलीयाम, 35 कर्मेलचा हेस्रो, अर्बी येथील पारई, 36 सोबाह येथील हागरीचा पुत्र, नाथानचा पुत्र इगाल, गादी बानी; 37 अम्मोनी सेलेक, बैरोथचा नाहाराई, जो जेरुइयाहचा पुत्र योआब याचा शस्त्रवाहक होता, 38 इथ्री येथील ईरा, इथ्री येथील गारेब 39 आणि उरीयाह हिथी. हे सर्व मिळून सदतीस जण होते. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.