Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ शमुवेल 20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


दावीदाविरुद्ध शबाचे बंड

1 बिन्यामीन गोत्रातील बिकरीचा पुत्र शबा जो फार त्रासदायक होता, तो तिथे आला. त्याने रणशिंग फुंकले आणि ओरडून म्हणाला, “आम्हाला दावीदाबरोबर वाटा नाही, इशायच्या पुत्रामध्ये काही भाग नाही! इस्राएलातील प्रत्येकाने आपल्या तंबूत जावे!”

2 तेव्हा बिकरीचा पुत्र शबाच्या मागे जाण्यासाठी इस्राएलच्या सर्व पुरुषांनी दावीदाला सोडून दिले. परंतु यार्देनपासून यरुशलेमपर्यंतचे यहूदाह गोत्राचे लोक त्यांच्या राजाबरोबर राहिले.

3 दावीद जेव्हा यरुशलेमात त्याच्या राजवाड्यात परतला, तेव्हा त्याने राजवाड्याची व्यवस्था पाहण्यासाठी मागे ठेवलेल्या त्याच्या दहा उपपत्नींना घेऊन एका घरात देखरेखीत ठेवले आणि त्यांना सामुग्री पुरविली परंतु त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवले नाही. त्यांच्या मरणाच्या दिवसापर्यंत, विधवांप्रमाणे बंदिवासात ठेवले.

4 नंतर राजाने अमासाला म्हटले, “तीन दिवसात यहूदीयाच्या लोकांना माझ्याकडे जमा कर आणि तू स्वतः देखील हजर हो.”

5 परंतु जेव्हा अमासा यहूदीयाच्या लोकांना जमा करण्यास गेला, तेव्हा राजाने त्याला ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ त्याने घेतला.

6 तेव्हा दावीदाने अबीशाईला म्हटले, “अबशालोमाने केलेल्या हानीपेक्षा बिकरीचा पुत्र शबा आपल्याला अधिक नुकसान करेल. तू तुझ्या स्वामीच्या माणसांना घे आणि त्याचा पाठलाग कर, नाहीतर त्याला तटबंदीची शहरे सापडतील आणि तो आपल्यापासून निसटून जाईल.”

7 मग योआबाची माणसे आणि करेथी व पेलेथी आणि सर्व शूर योद्धे अबीशाईच्या नेतृत्वाखाली बाहेर निघाले. बिकरीचा पुत्र शबा याचा पाठलाग करण्यासाठी ते यरुशलेमातून बाहेर पडले.

8 ते गिबोनातील मोठ्या खडकाजवळ आले, तेव्हा अमासा त्यांना भेटण्यास आला. योआबाने त्याचा लष्करी अंगरखा घातला होता आणि वरून कंबरपट्टा व म्यानात खंजीर होता. जसा तो पुढे गेला, त्याच्या म्यानातून खंजीर बाहेर पडला.

9 योआब अमासाला अभिवादन करीत म्हणाला, “माझ्या भावा तू कसा आहेस?” असे म्हणत त्याने अमासाची दाढी उजव्या हाताने पकडून त्याचे चुंबन घेतले.

10 अमासा योआबाच्या हातातील खंजिराविषयी सावध नव्हता आणि योआबाने तो त्याच्या पोटात खुपसला आणि त्याच्या आतड्या जमिनीवर पडल्या. पुन्हा वार न करताच अमास मरण पावला. नंतर योआब आणि त्याचा भाऊ अबीशाई यांनी बिकरीचा पुत्र शबाचा पाठलाग केला.

11 तेव्हा योआबाच्या पुरुषांपैकी एकजण अमासाच्या बाजूला उभा राहिला आणि म्हणाला, “जो कोणी योआबाचे समर्थन करतो आणि जो कोणी दावीदाच्या बाजूने आहे, त्याने योआबाच्या मागे यावे!”

12 अमासा भर रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात लोळत होता आणि त्या मनुष्याने पाहिले की, सर्व सैन्य स्तब्ध उभे होते. जेव्हा त्याला समजले की, प्रत्येकजण अमासापर्यंत येऊन थांबत होते, तेव्हा त्याने त्याला रस्त्यावरून ओढून शेतात नेले आणि त्याच्यावर एक वस्त्र टाकले.

13 अमासाला रस्त्यावरून बाजूला काढल्यानंतर, सर्वजण योआबाबरोबर बिकरीचा पुत्र शबा याचा पाठलाग करण्यासाठी निघाले.

14 शबा इस्राएलच्या सर्व गोत्रांमधून आबेल बेथ-माकाहपर्यंत व बेर्‍याच्या प्रदेशातून गेला आणि ते एकत्र येऊन त्याच्यामागे गेले.

15 योआबाबरोबरच्या सर्व सैन्याने येऊन शबाला आबेल-बेथ-माकाह येथे वेढा दिला. त्यांनी शहरापर्यंत जोडणार्‍या उतरणीपर्यंत मोर्चा लावला आणि तो बाहेरील तटबंदीच्या समोर होता. तट पाडण्यासाठी ते त्यावर वार करीत होते,

16 नगरातून एका शहाण्या स्त्रीने आवाज दिला, “ऐका! ऐका! योआबाला इकडे येण्यास सांगा म्हणजे मी त्याच्याशी बोलेन.”

17 तेव्हा तो तिच्याकडे गेला, आणि तिने विचारले, “तू योआब आहेस काय?” तो उत्तरला, “होय, मीच आहे.” ती म्हणाली, “तुझ्या दासीला जे सांगायचे आहे ते ऐक.” “मी ऐकत आहे,” तो म्हणाला.

18 ती पुढे म्हणाली, “प्राचीन काळी असे म्हटले जात असे की, ‘आबेलातून सल्ला घ्यावा,’ आणि समस्या पूर्णपणे सोडविली जात असे.

19 आम्ही शांतताप्रिय आणि इस्राएलचे विश्वासू लोक आहोत. तुम्ही इस्राएलातील मातृनगराचा नाश करण्याचा प्रयत्न का करीत आहात? याहवेहच्या वतनाचा तुम्ही का नाश करावा?”

20 यावर योआबाने उत्तर दिले, “मी त्याचा नाश किंवा त्याचा विध्वंस करावा हे माझ्यापासून अगदी दूर असो.

21 पण तसे काही नाही. एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील एक मनुष्य जो बिकरीचा पुत्र शबा याने दावीद राजाविरुद्ध आपला हात उगारला आहे. हा मनुष्य माझ्या स्वाधीन कर, म्हणजे मी शहर सोडून जाईन.” ती स्त्री योआबाला म्हणाली, “त्याचे शिर तुझ्याकडे तटावरून टाकले जाईल.”

22 ती स्त्री आपल्या शहाणपणाचा हा सल्ला घेऊन सर्व लोकांकडे गेली आणि त्यांनी बिकरीचा पुत्र शबा याचे शिर छेदून योआबाकडे फेकून दिले. तेव्हा योआबाने रणशिंग फुंकले आणि त्याचे लोक शहर सोडून आपआपल्या घरी निघून गेले. आणि योआब यरुशलेमास राजाकडे परत गेला.


दावीदाचे अधिकारी

23 योआब इस्राएलच्या सर्व सैन्याचा सेनापती होता; यहोयादाचा पुत्र बेनाइयाह करेथी व पेलेथी यांचा प्रमुख होता;

24 अदोनिराम वेठबिगारी करणार्‍यांचा अधिकारी होता; आणि अहीलुदचा पुत्र यहोशाफाट हा नोंदणी करणारा होता;

25 शेवा सचिव होता; सादोक व अबीयाथार याजक होते;

26 आणि याईरचा वंशज ईरा दावीदाचा याजक होता.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan