Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ शमुवेल 15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


अबशालोमचा कट

1 त्यानंतरच्या काळात, अबशालोमने स्वतःसाठी एक रथ आणि घोडे आणि त्याच्यापुढे धावण्यासाठी पन्नास माणसे ठेवली.

2 तो सकाळी लवकर उठत असे आणि शहराच्या वेशीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला थांबत असे. जेव्हा कोणी राजाकडे तक्रार आणत असे तेव्हा अबशालोम त्याला बोलावून विचारत असे, “तू कोणत्या नगराचा आहेस?” तो उत्तर देत असे, “आपला सेवक इस्राएलातील गोत्रांपैकी एका गोत्राचा आहे.”

3 तेव्हा अबशालोम त्याला म्हणत असे, “पाहा, तुझे दावे कायदेशीर आणि यथायोग्य आहेत, परंतु तुझे ऐकण्यासाठी राजाचा कोणीही प्रतिनिधी तिथे नाही.”

4 अबशालोम आणखी असेही म्हणे, “जर या देशात न्यायाधीश म्हणून माझी नेमणूक झाली! तर प्रत्येकजण ज्याची काही तक्रार किंवा खटला आहे तो माझ्याकडे आला असता व मी त्यांना न्याय मिळवून दिला असता.”

5 जेव्हा कोणी खाली लवून मुजरा करावयाला जवळ आला, तेव्हा अबशालोम पुढे जाऊन त्याचा हात पकडून त्याचे चुंबन घेत असे.

6 जे कोणी राजाकडे न्याय मागण्यासाठी येत असत त्या सर्वांशी अबशालोम असा वागत असे, अशा प्रकारे त्याने इस्राएली लोकांची मने जिंकून घेतली.

7 चार वर्षे पूर्ण झाल्यावर, अबशालोम राजाला म्हणाला, “मला हेब्रोन येथे जाऊ द्यावे म्हणजे मी याहवेहला केलेला आपला नवस फेडीन.

8 आपला सेवक अराम येथील गशूर या ठिकाणी राहत असताना मी हा नवस केला होता: ‘जर याहवेह मला परत यरुशलेमास घेऊन जातील, तर मी हेब्रोन येथे याहवेहची उपासना करेन.’ ”

9 राजा त्याला म्हणाला, “शांतीने जा.” तेव्हा तो हेब्रोनकडे गेला.

10 नंतर अबशालोमने इस्राएलच्या सर्व गोत्रांकडे गुप्त संदेशवाहक असे सांगत पाठवले, “रणशिंगांचा आवाज ऐकताच तुम्ही म्हणा, ‘हेब्रोनमध्ये अबशालोम राजा आहे.’ ”

11 यरुशलेममधून दोनशे लोक अबशालोमबरोबर आले होते. त्यांना पाहुणे म्हणून आमंत्रित केले गेले होते आणि ते अगदी निरागसपणे गेले, त्यांना याबाबतीत काहीही माहीत नव्हते.

12 अबशालोम यज्ञार्पण करीत असताना, त्याने दावीदाचा सल्लागार गिलोनी अहीथोफेल याला सुद्धा त्याचे नगर गिलोह येथून बोलाविले. त्यामुळे कटकारस्थानाला अधिक बळ मिळत गेले व अबशालोमच्या मागे जाणाऱ्यांची संख्या वाढत गेली.


दावीद पळ काढतो

13 तेव्हा एका संदेशवाहकाने येऊन दावीदाला सांगितले, “इस्राएलच्या लोकांची मने अबशालोमशी जडली आहेत.”

14 तेव्हा दावीद त्याच्याबरोबर यरुशलेमात असलेल्या आपल्या सर्व अधिकार्‍यांना म्हणाला, “चला! आपण पळून जाऊ या, नाहीतर आपल्यातील कोणीही अबशालोमच्या हातून वाचणार नाही. आपण लवकर निघाले पाहिजे, नाहीतर तो त्वरेने आपल्याला गाठून आपल्यावर अरिष्ट आणेल व तलवारीने शहराचा नाश करेल.”

15 राजाच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिले, “आमचे स्वामी जे काही करण्याचे ठरवतील ते करण्यास आम्ही तयार आहोत.”

16 राजा आपल्या घरातील सर्व लोकांबरोबर बाहेर पडला; परंतु त्याने त्याच्या दहा उपपत्नींना राजवाड्याची देखरेख करण्यास मागे सोडले.

17 अशा प्रकारे राजा बाहेर पडला व सर्व लोक त्याच्यामागे निघाले आणि ते शहराच्या सीमेवर थांबले.

18 त्याची सर्व माणसे करेथी आणि पलेथी व सर्व सहाशे गित्ती लोक जे दावीदाबरोबर गथवरून आले होते ते त्यांच्याबरोबर राजापुढे चालत होते.

19 राजा गित्ती इत्तय याला म्हणाला, “तू आमच्याबरोबर का येत आहे? परत जा आणि अबशालोम राजाबरोबर राहा. तू तर परदेशीय, तुझ्या जन्मभूमीतून बाहेर आलेला आहेस.

20 तू कालचा आलेला मनुष्य, मी कुठे जातो ते मला स्वतःला माहीत नाही, तेव्हा मी तुला आमच्याबरोबर इकडे तिकडे का फिरवू? परत जा आणि आपले लोक सोबत घेऊन जा. याहवेह तुला दया व विश्वासूपण दाखवो.”

21 परंतु इत्तयने उत्तर दिले, “जिवंत याहवेहची आणि माझ्या राजाच्या जीविताची शपथ, माझे स्वामी कुठेही असतील, मग ते जीवन किंवा मरण असले तरी तिथे आपला सेवक असणार.”

22 दावीद इत्तयला म्हणाला, “पुढे जा, चालत राहा.” तेव्हा गित्ती इत्तय पुढे चालत गेला. त्याची सर्व माणसे व त्याचे घराणे त्याच्याबरोबर होते.

23 जेव्हा लोक देश पार करीत होते, तेव्हा सर्व देशवासी मोठ्याने रडू लागले. राजाने सुद्धा किद्रोनचे खोरे पार केली आणि सर्व लोक अरण्याच्या वाटेने पुढे गेले.

24 सादोक सुद्धा तिथे होता आणि सर्व लेवी लोक जे त्याच्याबरोबर होते ते परमेश्वराच्या कराराचा कोश वाहून नेत होते. त्यांनी परमेश्वराचा कोश खाली ठेवला आणि सर्व लोकांनी शहर सोडण्याचे पूर्ण होईपर्यंत अबीयाथारने यज्ञार्पणे केली.

25 नंतर दावीद राजाने सादोकाला म्हटले, “परमेश्वराचा कोश परत शहरात घेऊन जा. जर याहवेहच्या दृष्टीत मी कृपा पावलो असलो तर याहवेह मला परत आणतील यासाठी की मी कोश व याहवेहचे निवासस्थान पुन्हा पाहू शकेल.

26 परंतु जर याहवेहने म्हटले, ‘मी तुझ्यावर प्रसन्न नाही,’ तर मी तयार आहे; त्यांना जे बरे वाटते तसे याहवेह माझे करो.”

27 राजाने सादोक याजकाला आणखी पुढे म्हटले, “तुला कळते की नाही? माझ्या आशीर्वादासह नगरात परत जा. तुझा पुत्र अहीमाज आणि अबीयाथारचा पुत्र योनाथान यांना सोबत घेऊन जा. तू आणि अबीयाथार तुमच्या दोन्ही पुत्रांसह परत जा.

28 मला कळविण्यासाठी तुझा संदेश येईपर्यंत मी रानाकडील मैदानात वाट पाहीन.”

29 त्याप्रमाणे सादोक व अबीयाथार यांनी परमेश्वराचा कोश परत यरुशलेमास नेला व ते तिथेच राहिले.

30 परंतु दावीद जैतुनाच्या डोंगराकडे रडत रडतच चालत चढत होता; त्याने आपले मस्तक झाकून घेतले होते व अनवाणी चालत होता. त्याच्याबरोबर असलेल्या सर्व लोकांनीसुद्धा आपले मस्तक झाकून ते रडत रडत वर चढले.

31 “अहीथोफेल अबशालोमबरोबर कट रचणाऱ्यांपैकी एक आहे” असे कोणी दावीदाला सांगितले, तेव्हा दावीदाने प्रार्थना केली, “हे याहवेह, अहीथोफेलचा सल्ला मूर्खपणा असे होऊ द्या.”

32 दावीद जेव्हा डोंगराच्या माथ्यावर जिथे लोक परमेश्वराची उपासना करीत असत तिथे जाऊन पोहोचला, तेव्हा अर्कीचा हूशाई त्याची वस्त्रे फाटलेली व डोक्यात धूळ घातलेला असा दावीदास भेटण्यास तिथे होता.

33 दावीद त्याला म्हणाला, “तू जर माझ्याबरोबर आलास, तर तू मला भार मात्र होशील.

34 तर तू परत शहराकडे जा आणि अबशालोमास म्हण, ‘महाराज, मी आपला सेवक होईन; आधी मी तुमच्या पित्याचा सेवक होतो, परंतु आता मी तुमचा सेवक होईन,’ असे केल्यास अहीथोफेलचा सल्ला निष्फळ करून तू मला मदत करशील.

35 सादोक याजक व अबीयाथार हे तिथे तुझ्याबरोबर असणार नाहीत काय? तू जे काही राजाच्या राजवाड्यात ऐकशील ते जाऊन त्यांना सांग.

36 त्यांचे दोन पुत्र, सादोकचा पुत्र अहीमाज व अबीयाथारचा पुत्र योनाथान त्यांच्याबरोबर आहेत. जे काही तू ऐकशील ते मला सांगण्यास त्यांना माझ्याकडे पाठव.”

37 तेव्हा अबशालोम शहरात प्रवेश करीत असताना, दावीदाचा मित्र हूशाई यरुशलेमात पोहोचला.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan