Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ शमुवेल 13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


अम्नोन आणि तामार

1 काही काळानंतर, दावीदाचा पुत्र अम्नोन हा तामार, जी दावीदाचा पुत्र अबशालोम याची सुंदर बहीण होती, तिच्या प्रेमात पडला.

2 अम्नोन त्याच्या बहिणीच्या प्रेमात इतका वेडा झाला की, तो आजारी पडला. तामार कुमारी होती आणि तिच्याशी काही करणे हे त्याला अशक्य होते.

3 दावीदाचा भाऊ शिमिआह, याचा पुत्र योनादाब अम्नोनाचा सल्लागार असून अतिशय धूर्त होता.

4 त्याने अम्नोनास विचारले, “तू जो राजाचा पुत्र असून दिवसेंदिवस असा क्षीण का दिसतोस? तू मला सांगणार नाहीस काय?” तेव्हा अम्नोन त्याला म्हणाला, “माझा भाऊ अबशालोम याची बहीण तामारवर मी प्रेम करतो.”

5 यहोनादाब म्हणाला, “तुझ्या पलंगावर जा आणि आजारी असल्याचे ढोंग कर, जेव्हा तुझे वडील तुला पाहायला येतील, तेव्हा त्यांना सांग, ‘माझी बहीण तामारने माझ्याकडे येऊन मला काहीतरी खावयास द्यावे. तिने ते भोजन माझ्या दृष्टीसमोर तयार करावे म्हणजे मी तिला पाहीन आणि नंतर ते तिच्या हातून खाईन.’ ”

6 तेव्हा अम्नोन पडून राहिला आणि आजारी असल्याचे ढोंग केले. जेव्हा राजा त्याच्या भेटीस आला, तेव्हा अम्नोन त्याला म्हणाला, “माझी बहीण तामार हिने येऊन माझ्या दृष्टीसमोर विशेष भाकरी बनविल्या तर मला आवडेल, म्हणजे त्या मी तिच्या हातून खाईन.”

7 दावीदाने राजवाड्यात तामारकडे निरोप पाठवला: “तुझा भाऊ अम्नोन याच्या घरी जा आणि त्याच्यासाठी भोजन तयार कर.”

8 तेव्हा तामार तिचा भाऊ अम्नोन याच्या घरी गेली, तो तर बिछान्यावर पडून होता. तिने थोडे पीठ घेतले, ते मळले, आणि त्याच्या दृष्टीसमोर भाकरी तयार केल्या आणि त्या भाजल्या.

9 नंतर तिने ताट घेतले आणि त्याला भाकर वाढली परंतु त्याने खाण्यास नकार दिला. अम्नोन म्हणाला, “प्रत्येकाला येथून बाहेर घालवून द्या.” तेव्हा प्रत्येकजण त्याच्यापासून निघून गेले.

10 नंतर अम्नोन तामारला म्हणाला, “भाकरी माझ्या झोपण्याच्या खोलीकडे घेऊन ये म्हणजे मी तुझ्या हाताने ती खाईन.” तेव्हा तिने बनविलेल्या भाकरी घेऊन तामार आपला भाऊ अम्नोनच्या खोलीकडे आली.

11 परंतु त्याने भाकरी खाव्या म्हणून जेव्हा ती भाकरी घेऊन त्याच्याजवळ गेली, तेव्हा त्याने तिला पकडले आणि म्हटले, “माझ्या बहिणी, माझ्याबरोबर पलंगावर ये.”

12 ती त्याला म्हणाली, “नाही, माझ्या भावा! माझ्यावर जबरदस्ती करू नकोस! इस्राएलमध्ये अशी गोष्ट होऊ नये! अशी घृणास्पद गोष्ट करू नकोस.

13 माझ्याबद्दल विचार कर, मी या बेअब्रू पासून कशी वाचेन? आणि तुझ्याबद्दल काय? इस्राएलमधील मूर्ख व दुष्टासारखा तू होशील? म्हणून कृपा करून राजाकडे बोलणे कर; ते मला तुझ्याशी लग्न करण्यापासून थांबविणार नाहीत.”

14 परंतु त्याने तिचे ऐकण्यास नकार दिला आणि तो तिच्यापेक्षा बलवान असल्यामुळे त्याने तिच्यावर बलात्कार केला.

15 नंतर अम्नोनाला तिचा तीव्र तिरस्कार वाटू लागला. वास्तविकता त्याने तिच्यावर जितके प्रेम केले होते, त्यापेक्षाही त्याला अधिक तिचा तिरस्कार वाटला. नंतर अम्नोन तिला म्हणाला, “ऊठ आणि चालती हो!”

16 “नाही!” ती त्याला म्हणाली, “तू मला पाठवून देणे हे, जे वाईट कृत्य तू आधी केले आहे त्यापेक्षाही भयंकर आहे.” परंतु तो तिचे ऐकेना.

17 त्याने त्याच्या खासगी सेवकाला बोलावून सांगितले, “या स्त्रीला माझ्या नजरेपासून बाहेर काढ आणि तिच्यामागे दाराला कडी लाव.”

18 तेव्हा त्याच्या सेवकाने तिला बाहेर काढले आणि तिच्यामागे दार बंद केले. राजाच्या कुमारी कन्या घालत असत त्याप्रकारचा पायघोळ झगा तिने घातला होता.

19 तामारने तिच्या डोक्यावर राख घातली आणि जो पायघोळ झगा तिने घातला होता तो तिने फाडला. तिने तिचे हात आपल्या डोक्यावर ठेवले आणि मोठ्याने रडत ती निघून गेली.

20 तिचा भाऊ अबशालोम तिला म्हणाला, “तुझा भाऊ अम्नोन तुझ्याबरोबर होता काय? तर आता माझ्या बहिणी, शांत हो, तो तुझा भाऊ आहे. ही गोष्ट मनाला लावून घेऊ नकोस.” आणि तामार तिचा भाऊ अबशालोम याच्या घरात एकाकी अशी राहू लागली.

21 जेव्हा दावीद राजाने हे सर्व ऐकले, तेव्हा त्याला संताप आला.

22 आणि अबशालोम अम्नोनास चांगले किंवा वाईट काहीही बोलला नाही; त्याने अम्नोनाचा तिरस्कार केला कारण त्याने त्याची बहीण तामारला बेअब्रू केले होते.


अबशालोम अम्नोनाचा वध करतो

23 दोन वर्षानंतर, जेव्हा एफ्राईमच्या सीमेवर बआल-हासोर येथे अबशालोमच्या मेंढरांची लोकर कातरणी होती, तेव्हा त्याने राजांच्या सर्व पुत्रांना तिथे येण्यास आमंत्रण दिले.

24 अबशालोम राजाकडे गेला आणि म्हणाला, “तुमच्या सेवकाकडे मेंढ्यांची लोकर कातरणी आहे, राजा आणि त्याचे सेवक कृपा करून माझ्या सहभागी होतील काय?”

25 राजाने उत्तर दिले, “नाही, माझ्या पुत्रा, आम्ही सर्वांनीच जाऊ नये; आम्ही तुझ्यासाठी केवळ भार होऊ.” जरी अबशालोमाने त्याला आग्रह केला, तरीही राजाने जाण्यास नकार दिला परंतु त्याने त्याला आशीर्वाद दिला.

26 तेव्हा अबशालोम म्हणाला, “आपण येत नाही, तर माझा भाऊ अम्नोन याला आमच्याबरोबर येऊ द्या.” राजाने त्याला विचारले, “त्याने तुमच्याबरोबर का जावे?”

27 परंतु अबशालोमाने त्याला विनंती केली, म्हणून त्याने त्याच्याबरोबर अम्नोन व बाकीच्या राजपुत्रांना पाठवले.

28 अबशालोमाने त्याच्या माणसांना आज्ञा केली, “ऐका! जेव्हा अम्नोन द्राक्षारस पिऊन मस्त झालेला असेल आणि मी तुम्हाला सांगेन, ‘अम्नोनावर वार करा,’ तेव्हा त्याला ठार मारा. घाबरू नका. ही आज्ञा मी तुम्हाला केली नाही काय? खंबीर व्हा आणि धैर्य धरा.”

29 तेव्हा अबशालोमने सांगितल्याप्रमाणे त्याच्या माणसांनी अम्नोनाचे केले. तेव्हा राजाचे सर्व पुत्र उठले, आपआपल्या खेचरावर बसून पळून गेले.

30 ते त्यांच्या मार्गावर असता, दावीदाकडे निरोप आला: “अबशालोमने राजाच्या सर्व पुत्रांना मारून टाकले आहे; त्यांच्यातील एकही जिवंत राहिलेले नाही.”

31 तेव्हा राजा उभा राहिला, आपली वस्त्रे फाडली आणि जमिनीवर पडून राहिला; आणि त्याचे सर्व सेवक त्यांची वस्त्रे फाडून राजाच्या बाजूला उभे राहिले.

32 परंतु दावीदाचा भाऊ शिमिआह याचा पुत्र योनादाब म्हणाला “सर्वच राजपुत्रांना मारून टाकले आहे असा माझ्या धन्याने विचार करू नये; केवळ अम्नोन मरण पावला आहे. कारण अम्नोनाने त्याची बहीण तामार हिच्यावर बलात्कार केला होता, तेव्हापासून अबशालोमाने हा निश्चय केला होता.

33 माझ्या धनीराजाने या वृत्तांताबाबतीत काळजी करू नये की, राजाची सर्व मुले मरण पावली आहेत. केवळ अम्नोन मरण पावला आहे.”

34 तोपर्यंत अबशालोम पळून गेला होता. पहार्‍यावर असलेल्या मनुष्याने वर दृष्टी करून पाहिले आणि त्याला रस्त्याच्या पश्चिमेकडून डोंगरावरून खाली पुष्कळ लोक येताना दिसले. पहारेकर्‍याने जाऊन राजाला सांगितले, “होरोनाइमच्या दिशेकडे डोंगराच्या वरील बाजूला मला लोक दिसत आहेत.”

35 योनादाब राजाला म्हणाला, “पाहा, राजपुत्र आले आहेत; तुमचा सेवक जसे म्हणाला तसेच घडले आहे.”

36 त्याचे बोलणे संपताच, राजाचे पुत्र मोठ्याने आक्रोश करीत आत आले. राजा आणि त्याचे सर्व सेवक मोठ्या दुःखाने रडले.

37 अबशालोम तिथून पळाला आणि अम्मीहूदाचा पुत्र, गशूरचा राजा तलमय याच्याकडे गेला. परंतु दावीद राजाने आपल्या पुत्रासाठी पुष्कळ दिवस शोक केला.

38 अबशालोम तिथून पळून गशूरकडे गेला व तिथे तीन वर्ष राहिला.

39 आणि दावीद राजाला अबशालोमकडे जाण्याची इच्छा झाली, कारण अम्नोनाच्या मृत्यूबद्दल त्याचे सांत्वन झाले होते.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan