२ शमुवेल 1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीदावीद शौलाच्या मृत्यूविषयी ऐकतो 1 शौलाच्या मृत्यूनंतर, अमालेक्यांची कत्तल करून दावीद परत आला आणि सिकलाग येथे दोन दिवस राहिला. 2 तिसर्या दिवशी शौलाच्या छावणीतून एक मनुष्य आला, त्याचे कपडे फाटलेले होते आणि डोक्यावर धूळ घातलेली होती. तेव्हा तो दावीदाकडे आला आणि जमिनीवर पालथा पडून दंडवत घातले. 3 “तू कुठून आला आहेस?” दावीदाने त्याला विचारले. त्याने उत्तर दिले, “मी इस्राएलच्या छावणीतून निसटून पळून आलो आहे.” 4 दावीदाने विचारले, “काय झाले आहे, ते मला सांग.” त्याने उत्तर दिले, “सैनिक युद्धातून पळून गेले, पुष्कळजण पडले आणि मरण पावले. शौल आणि त्याचा पुत्र योनाथान हे सुद्धा मरण पावले आहेत.” 5 तेव्हा ज्या तरुणाने निरोप आणला होता त्याला दावीदाने विचारले, “शौल आणि त्याचा पुत्र योनाथान हे मरण पावले हे तुला कसे समजले?” 6 तो तरुण मनुष्य म्हणाला, “मी सहज गिलबोआच्या डोंगरावर होतो आणि तिथे शौल त्याच्या भाल्यावर टेकलेला आणि रथाचा सारथी आणि त्यांचे स्वार जोरात त्याचा पाठलाग करीत होते असे मला दिसले. 7 जेव्हा तो मागे वळला आणि त्याने मला पाहिले व मला बोलाविले आणि मी म्हणालो, ‘मी काय करू शकतो?’ 8 “त्याने मला विचारले, ‘तू कोण आहेस?’ “ ‘मी अमालेकी आहे.’ मी उत्तर दिले. 9 “तेव्हा तो मला म्हणाला, ‘येथे माझ्या बाजूला उभा राहा आणि मला मारून टाक! मी मृत्यूच्या यातनेत आहे, परंतु अजूनही मी जिवंतच आहे.’ 10 “तेव्हा मी त्याच्या बाजूला उभा राहिलो आणि त्याला मारून टाकले, कारण मला माहीत होते की, भाल्यावर पडल्याने तो जगू शकला नसता. आणि जो राजमुकुट त्याच्या डोक्यावर होता आणि त्याच्या बाहुंवरचा कडा मी येथे माझ्या धन्याजवळ आणले आहेत.” 11 तेव्हा दावीदाने आणि त्याच्या बरोबरच्या माणसांनी आपली वस्त्रे धरली व फाडली. 12 शौल आणि त्याचा पुत्र योनाथान आणि याहवेहचे सैन्य आणि इस्राएली राष्ट्र यांच्यासाठी त्यांनी शोक केला आणि ते रडले आणि संध्याकाळपर्यंत उपास केला कारण ते तलवारीने मारले गेले होते. 13 नंतर दावीदाने बातमी घेऊन आलेल्या मनुष्याला विचारले, “तू कुठला आहेस?” त्याने उत्तर दिले, “मी एका परदेशी मनुष्याचा पुत्र, एक अमालेकी आहे.” 14 दावीदाने त्याला विचारले, “याहवेहच्या अभिषिक्ताचा नाश करण्यासाठी तुझा हात उचलताना तुला भीती कशी वाटली नाही?” 15 तेव्हा दावीदाने त्याच्या माणसांतील एकाला बोलाविले आणि म्हटले, “जा, त्याला मारून टाक!” तेव्हा त्याने त्याच्यावर वार केला आणि तो मनुष्य मरण पावला. 16 कारण दावीद त्याला म्हणाला होता, “तुझ्या रक्ताचा दोष तुझ्याच डोक्यावर असो. जेव्हा तू असे म्हणालास की, ‘मी याहवेहच्या अभिषिक्ताला ठार मारले आहे,’ तुझ्या स्वतःच्या तोंडाने स्वतःविरुद्ध साक्ष दिली आहे.” शौल आणि योनाथान यांच्यासाठी दावीदाचा विलाप 17 शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्याविषयी दावीदाने हे विलापगीत रचले, 18 आणि यहूदीयाच्या लोकांना हे धनुष्याचे विलापगीत शिकविले जावे असा आदेश दिला (ते याशेरच्या पुस्तकात लिहिलेले आहे): 19 “हे इस्राएला, तुझ्या डोंगरांवर जसे एक चपळ हरिण मरून पडते, तसे शूरवीर पडले आहेत! 20 “गथमध्ये हे सांगू नका, अष्कलोनच्या रस्त्यांवर याची घोषणा करू नका, नाहीतर पलिष्ट्यांच्या कन्या हर्ष पावतील, बेसुंत्यांच्या कन्या आनंद करतील. 21 “गिलबोआच्या डोंगरांनो, तुम्हावर दव किंवा पाऊस न येवो; तुमच्या उतरणीच्या शेतांवर पावसाच्या सरी न पडोत. कारण तिथे शूरवीराची ढाल तिरस्कृत झाली, शौलाची ढाल—यापुढे तेलाने पुसली जाणार नाही. 22 “वध केलेल्यांच्या रक्तापासून शूरवीरांच्या मांसापासून योनाथानचा बाण मागे फिरला नाही, शौलाची तलवार असमाधानाने परत आली नाही. 23 शौल आणि योनाथान, जिवंत असता प्रिय व आवडते होते, मृत्यूमध्येही त्यांचा वियोग झाला नाही. ते गरुडांपेक्षा वेगवान होते, सिंहांपेक्षा बलवान असे होते. 24 “अहो, इस्राएलच्या कन्यांनो, शौलासाठी रुदन करा, ज्यांनी तुम्हाला किरमिजी रंगाची आणि भरजरीत कपडे घातली, ज्यांनी तुमची वस्त्रे सोन्याच्या अलंकारांनी सुशोभित केली. 25 “हे बलवान युद्धात कसे पडले! योनाथान तुमच्या डोंगरावर मारला गेला आहे. 26 योनाथान माझ्या भावा, मी तुझ्यासाठी शोक करतो; तू मला फार प्रिय होतास. माझ्यावरील तुझे प्रेम अद्भुत असे होते, स्त्रीच्या प्रेमापेक्षा ते अधिक अद्भुत होते! 27 “पाहा, बलवान कसे पडले आहेत! युद्धाची शस्त्रे नष्ट झाली आहेत!” |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.