Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ राजे 24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 यहोयाकीमच्या कारकिर्दीत, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने देशावर स्वारी केली, आणि यहोयाकीम तीन वर्षे त्याचा ताबेदार राहिला. पण नंतर तो नबुखद्नेस्सरच्या विरोधात गेला आणि त्याने बंड पुकारले.

2 याहवेहने यहूदाहचा नाश करण्यासाठी यहूदीयावर खास्द्यांच्या, अरामी, मोआबी व अम्मोनी यांच्या टोळ्या पाठविल्या, असे घडणार हे भविष्य याहवेहने आपल्या संदेष्ट्याद्वारे आधी केलेले होते.

3 निश्चितच याहवेहच्या आज्ञेनुसार त्यांनी त्यांना आपल्या उपस्थितीतून घालून द्यावे म्हणून हे संकट यहूदीयावर आले, कारण मनश्शेहचे पाप आणि त्याने जे सर्व केले,

4 त्यासोबत निर्दोषाचे रक्त सांडणे हे सम्मिलीत होते. त्याने यरुशलेम निर्दोषांच्या रक्ताने भरून टाकले, त्यामुळे याहवेहने त्यांना क्षमा करण्याचे नाकारले.

5 यहोयाकीमच्या कारकिर्दीतील इतर घटना, आणि त्याने सर्व जे केले ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहिलेले नाही काय?

6 यहोयाकीम आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला. आणि त्याचा वारस त्याचा पुत्र यहोयाखीन राजा झाला.

7 इजिप्तचा राजा पुन्हा कधीही आपल्या देशातून बाहेर आला नाही, कारण बाबेलच्या राजाने इजिप्तच्या ओहोळापासून फरात नदीपर्यंतचा त्याचा सर्व प्रदेश आपल्या सत्तेखाली आणला होता.


यहूदीयाचा राजा यहोयाखीन

8 वयाच्या अठराव्या वर्षी यहोयाखीन राजा झाला, आणि त्याने यरुशलेमात तीन महिने राज्य केले. त्याच्या आईचे नाव नेहूष्टा होते. ती एलनाथानची कन्या असून यरुशलेमची होती.

9 त्याने त्याच्या पित्याप्रमाणेच याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले.

10 त्याच्याच कारकिर्दीत बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या सैन्याने यरुशलेमावर स्वारी करून शहरास वेढा दिला,

11 आणि त्याचे अधिकारी हा वेढा घालत असताना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर स्वतः शहरात आला.

12 यहूदीयाचा राजा यहोयाखीन, त्याची आई, त्याचे सेवक, त्याच्या राजघराण्यातील सेवक आणि त्याचे अधिकारी हे सर्व त्याला शरण गेले. बाबेलचा राजाच्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी, त्याने यहोयाखीनला कैदी बनविले.

13 याहवेहने घोषणा केल्याप्रमाणे, नबुखद्नेस्सरने याहवेहच्या मंदिरातील व राजवाड्यातील सर्व संपत्ती लुटून नेली आणि इस्राएलाच्या शलोमोन राजाने याहवेहच्या मंदिरासाठी ठेवलेले सोन्याचे कटोरे तोडून त्यांचे तुकडे केले.

14 यरुशलेम येथील लोक त्याने बंदिवासात नेले: सर्व अधिकारी आणि लढाऊ पुरुष आणि सर्व कुशल कामगार आणि कारागीर—एकूण दहा हजार. देशात फक्त सर्वात गरीब लोक उरले.

15 नबुखद्नेस्सर यहोयाखीनला बंदी करून बाबेलला घेऊन गेला. त्याने राजाची आई, त्याच्या पत्नी, त्याचे अधिकारी आणि देशातील प्रतिष्ठित लोकांना देखील यरुशलेमहून बाबेलला नेले.

16 बाबेलच्या राजाने युद्धासाठी सक्षम आणि बलवान योद्धांचे संपूर्ण सात हजार सैन्य आणि एक हजार कुशल कारागीर आणि लोहार बाबेलला नेले.

17 बाबेलच्या राजाने यहोयाखीनचा काका मत्तन्याहला त्याच्या ठिकाणी राजा केले आणि त्याने त्याचे नाव बदलून ते सिद्कीयाह असे ठेवले.


यहूदीयाचा राजा सिद्कीयाह

18 सिद्कीयाह एकवीस वर्षाचा असताना राजा झाला आणि त्याने यरुशलेमात अकरा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल असून ती लिब्नाह येथील यिर्मयाहची कन्या होती.

19 यहोयाकीमप्रमाणेच त्याने याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले.

20 यरुशलेम व यहूदीयामध्ये हे सर्व याहवेहच्या क्रोधामुळे घडले आणि शेवटी त्यांनी या लोकांना स्वतःच्या समक्षतेतून काढून टाकले. आता सिद्कीयाहने बाबेलच्या राजाविरुद्ध बंड केले.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan