२ करिंथ 9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 प्रभूंच्या लोकांना मदत करण्याच्या या सेवेबाबत मी तुम्हाला लिहावे याची गरज नाही. 2 कारण अशी मदत करण्याविषयीची तुमची उत्सुकता मला चांगली माहीत आहे; आणि तुमची अखया येथून गेल्या वर्षापूर्वीच अशी देणगी पाठविण्याची तयारी होती, असे मी मासेदोनियांना मोठ्या अभिमानाने सांगितले आहे. खरे म्हणजे तुमचा हा उत्साह पाहूनच येथील अनेकांना मदत करावी अशी प्रेरणा झाली. 3 या गोष्टीबाबतीत तुमच्याबद्दलचा माझा अभिमान व्यर्थ ठरू नये म्हणून मी या भावांना पाठवित आहे, यासाठी की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही तयार असावे. 4 मासेदोनियातील काही लोक माझ्याबरोबर आले आणि मी त्यांना सांगितल्याप्रमाणे तुमची काहीच तयारी नाही असे आढळले, तर आम्हास तुमच्याबद्दल जो भरवसा होता त्याबद्दल काही म्हणता येणार नाही व ते लाजिरवाणे ठरेल. 5 म्हणून मला असे वाटले, हे आवश्यक आहे की, बंधूंना अशी विनंती करावी की त्यांनी प्रथम तुमची भेट घ्यावी आणि तुम्ही दिलेल्या आश्वासनानुसार उदारतेने देत असलेल्या देणगीची व्यवस्था पूर्ण करावी. तेव्हा ती एक मुक्तहस्ताने दिलेली भेट अशी असेल, असंतुष्टतेने देणार्यासारखी ती नसेल. उदारहस्ते पेरणे 6 परंतु हे लक्षात ठेवा जो कोणी राखून पेरतो, तर तो राखूनच कापणी करेल. जो उदारपणे बी पेरतो, तो उदारपणे कापणी करेल. 7 आपण किती द्यावे हे ज्याने त्याने स्वतः मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, हे भाग पाडते म्हणून किंवा बळजबरीने नव्हे, कारण संतोषाने देणारा परमेश्वराला आवडतो. 8 परमेश्वर तुम्हाला विपुल आशीर्वाद देण्यास समर्थ आहे. ते तुम्हाला सर्ववेळी व सर्व गोष्टीत एवढे देतील की जे काही तुम्हाला गरजेचे आहे ते मिळेल व चांगल्या कामासाठी भरपूर शिल्लक राहील. 9 हे शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे आहे: “गरजवंतांना ते उदारहस्ते दानधर्म करतात; त्यांची नीतिमत्ता चिरकाळ टिकते.” 10 कारण तो पेरणार्यांसाठी बी पुरवितो आणि खाण्यासाठी भाकर पुरवितो तोच तुम्हालाही पेरण्यासाठी बियांचा भांडार वाढवेल व पुरवठा करेल आणि तुमच्या नीतिमत्वाच्या हंगामाची वाढ करेल. 11 होय, तुम्ही सर्व दृष्टीने संपन्न व्हावे यासाठी की प्रत्येक प्रसंगी तुम्ही उदारपणे द्यावे व आमच्याद्वारे तुमच्या उदारतेबद्दल परमेश्वराचे आभारप्रदर्शन व्हावे. 12 म्हणजे तुमच्या या सेवेमुळे केवळ प्रभूंच्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यास साहाय्य होते असे नाही तर परमेश्वराप्रती उपकारस्तुती ओसंडून वाहू लागते. 13 तुम्ही करीत असलेले सेवाकार्य यामुळे तुम्ही सिद्ध करून दाखविले आहे की, तुम्ही ख्रिस्ताच्या शुभवार्तेला कबूल करून आज्ञाधारक राहिला, तसेच तुम्ही त्यांच्या व सर्वांच्याप्रती उदारता दाखविली म्हणून इतरजण परमेश्वराची स्तुती करतील, 14 आणि परमेश्वराची अद्भुत कृपा तुमच्यावर प्रकट झाली म्हणून त्यांची मने तुम्हाकडे लागली आहेत व ते तुमच्यासाठी उत्कंठेने प्रार्थना करतात. 15 परमेश्वराच्या अवर्णनीय देणगीबद्दल त्यांची स्तुती असो. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.