Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ करिंथ 6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 परमेश्वराचे सहकारी या नात्याने आम्ही तुम्हाला विनवितो की परमेश्वराची कृपा व्यर्थ होऊ देऊ नका.

2 कारण ते म्हणतात, “माझ्या कृपेच्या समयी तुमची विनवणी माझ्या कानी आली. तारणाच्या दिवशी, मी तुम्हाला साहाय्य केले.” मी तुम्हाला सांगतो, आताच परमेश्वराच्या कृपेचा समय आहे आणि आजच तारणाचा दिवस आहे.


पौलाचे कष्ट

3 आम्ही कोणाच्याही मार्गात अडखळण होत नाही, जेणेकरून आम्ही करीत असलेली सेवा दोषी ठरविली जाऊ नये.

4 आम्ही परमेश्वराचे सेवक या नात्याने सर्वप्रकारे आमची योग्यता पटवून देण्याचा प्रयत्न करतो: मोठ्या धैर्याने, दुःख, ओझे व संकटे आम्ही सहन करतो.

5 आम्हाला मारहाण, तुरुंग, दंगल, कष्ट, जागरणे आणि उपवास;

6 शुद्धतेने, बुद्धीने, धीराने आणि दयेने; पवित्र आत्म्याने आणि खर्‍या प्रीतीने भरलेले;

7 सत्याचे भाषण, आणि परमेश्वराचे सामर्थ्य; उजव्या आणि डाव्या हातात नीतिमत्वाची शस्त्रे धारण करून करीत असतो.

8 गौरव आणि अपमान, वाईट अहवाल आणि चांगला अहवाल; प्रामाणिक परंतु लबाड समजण्यात आलेले;

9 प्रसिद्ध तरी अप्रसिद्ध, मृत्यूच्या समीप परंतु जिवंत; घायाळ केलेले परंतु मृत्यूपासून राखलेले

10 व्यथित परंतु सतत आनंदित; गरीब परंतु इतरांना धनवान बनविणारे; मालकीचे काहीही नाही आणि तरी सर्वकाही असल्यासारखे असे आहोत.

11 करिंथकरांनो आम्ही तुमच्यापासून काहीच न लपविता आमचे हृदय तुमच्यासमोर मोकळे केले आहे.

12 आमची प्रीती तोकडी नाही पण तुमची प्रीतीच संकुचित आहे.

13 तुम्ही माझी स्वतःची मुले आहात असे समजून मी बोलत आहे. तुमची अंतःकरणेसुद्धा संपूर्णपणे उघडी करा.


मूर्तिपूजेविरुद्ध इशारा

14 विश्वासहीन लोकांबरोबर संबंध जोडून सहभागी होऊ नका; कारण नीतिमत्व व दुष्टता यामध्ये साम्य आहे काय? किंवा प्रकाश व अंधकार यामध्ये काही भागीदारी आहे काय?

15 तसेच ख्रिस्त व सैतान यांच्यामध्ये मेळ कसा असेल? विश्वासी मनुष्य विश्वासहीन मनुष्य यामध्ये साम्य आहे का?

16 आणि परमेश्वराचे मंदिर व मूर्ती, यांच्यामध्ये कसा मेळ बसणार? कारण आम्ही परमेश्वराचे मंदिर, जिवंत परमेश्वराचे घर आहोत आणि परमेश्वराने म्हटले आहे: “मी त्यांच्यामध्ये राहीन आणि त्यांच्यामध्ये चालेन; मी त्यांचा परमेश्वर होईन आणि ते माझे लोक होतील.”

17 यास्तव, “त्यांच्यामधून निघा आणि त्यांच्यापासून स्वतःला वेगळे करा; प्रभूने म्हटले आहे त्यांच्या अशुद्ध वस्तूला स्पर्श करू नका, म्हणजे मी तुमचे स्वागत करेन.”

18 आणि “मी तुमचा पिता होईन आणि तुम्ही माझे पुत्र व माझ्या कन्या व्हाल असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतात.”

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan