२ करिंथ 10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीपौल आपल्या सेवेचे समर्थन करतो 1 ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रपणाने मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्यापैकी काहीजण म्हणतात की मी पौल, तुमच्यासमोर असताना “भित्रा” व तुमच्यापासून दूर असलो म्हणजे “धीटपणे” वागतो. 2 मी तुम्हाला विनंती करतो की मी तिथे आलो की ज्याकाही लोकांना वाटते की आमची जीवनशैली ऐहिक आहे, त्यांच्याविरुद्ध कठोर होण्याची गरज भासणार नाही, अशी माझी आशा आहे. 3 आम्ही या जगामध्ये राहतो तरीपण ऐहिक लोक जसे युद्ध करतात तसे आम्ही करीत नाही. 4 जी शस्त्रे युद्धासाठी आम्ही वापरतो ती दैहिक नाहीत याउलट त्यात किल्ले उद्ध्वस्त करण्याचे दैवी सामर्थ्य आहे. 5 आम्ही वाद व परमेश्वराच्या ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले सर्वकाही पाडून टाकतो आणि प्रत्येक विचाराला बंदिस्त करून ख्रिस्ताच्या आज्ञेखाली स्वाधीन करतो. 6 तुमचे आज्ञापालन पूर्ण झाल्यावर, जे आज्ञा न पाळणारे आहेत आम्ही त्यांना दंड करण्यास तयार आहोत. 7 तुम्ही बाहेरील रूप पाहून न्याय करता. जर कोणाला असा भरवसा असेल की ते ख्रिस्ताचे आहेत, तर त्यांनी याबद्दल पुन्हा विचार करावा की जसे आम्ही ख्रिस्ताचे आहोत तसे तेही आहेत. 8 हा अधिकार प्रभूने तुम्हाला खाली पाडून टाकण्यासाठी नव्हे, तर तुम्हाला विकसित करण्यासाठी आम्हाला दिला आहे, आणि जरी मी त्याविषयी थोडाफार अभिमान दाखविला, तरी मला त्याची लाज वाटणार नाही. 9 तुम्हाला असा भास होऊ नये की घाबरून सोडण्याच्या उद्देशाने मी पत्रे लिहित आहे. 10 काहीजण म्हणतात, “त्याची पत्रे वजनदार व प्रभावी आहेत परंतु व्यक्ती म्हणून त्याचा प्रभाव पडत नाही आणि त्याच्या भाषणात काही तथ्य नाही.” 11 अशा लोकांना हे समजावे की आम्ही अनुपस्थितीत असताना आमच्या पत्राद्वारे जे काही आम्ही आहोत, तेच उपस्थित असताना आमच्या कृतीद्वारे आहोत. 12 जे स्वतःची प्रशंसा करतात, त्यांच्याशी तुलना करण्याचे धैर्य आम्ही करीत नाही. ते स्वतःचे आपसात मोजमाप करतात व आपसातच तुलना करतात, ते शहाणे नाहीत. 13 आम्ही मर्यादेच्या बाहेर प्रौढी मिरविणार नाही, तर जी सेवा परमेश्वराने आम्हास नेमून दिली आहे व जी मर्यादा परमेश्वराने आम्हास लावून दिली आहे, त्या मर्यादेतच आम्ही प्रौढी मिरवू आणि त्यात तुमचाही समावेश आहे. 14 ख्रिस्ताविषयीची शुभवार्ता तुमच्याकडे पोहोचविणारे आम्हीच पहिले होतो. म्हणून अधिक प्रौढी मिरवून मर्यादेचे उल्लंघन करीत नाही, जर आम्ही तुमच्यापर्यंत येऊ शकलो नसतो तर आम्ही मर्यादेचे उल्लंघन करीत आहोत हे बोलणे ठीक असते. 15 जे कार्य दुसर्यांनी केले आहे त्याबद्दल आम्ही मर्यादा सोडून अभिमान बाळगत नाही. तुमचा विश्वास जसजसा वाढत जाईल तसेच आमच्या कार्याचे क्षेत्र तुम्हामध्ये खूप वाढावे, अशी आमची आशा आहे. 16 त्यानंतर तुमच्यापलीकडे, दूरवर असलेल्या प्रांतात आम्हाला शुभवार्ता गाजविता येईल आणि इतर लोकांच्या क्षेत्रात जे काम आधी केले आहे त्याबद्दल अभिमान बाळगण्याचे आम्हास कारण उरणार नाही. 17 “जो प्रौढी मिरवतो त्याने प्रभूमध्ये प्रौढी मिरवावी.” 18 कोणी स्वतःची प्रशंसा करतो तर त्यास मान्यता मिळेल असे नाही, परंतु ज्याची प्रशंसा प्रभू करतात त्यास मान्यता मिळेल. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.