Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ इतिहास 4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


मंदिराची सजावट

1 त्याने वीस हात लांब आणि वीस हात रुंद आणि दहा हात उंच अशी कास्याची एक वेदी तयार केली.

2 त्याने ओतीव धातूचा हौद तयार केला, तो गोलाकार असून त्याचा व्यास एका काठापासून दुसर्‍या काठापर्यंत दहा हात होता व पाच हात उंच होता. त्याचे सभोवार माप घेण्यास तीस हात दोरी लागत असे.

3 त्याच्या काठाखाली सभोवार एकेका हाताच्या अंतरावर बैलाच्या आकृती होत्या. हे बैल हौदाबरोबरच एकांगी अशा दोन रांगेत ओतीव केल्या होत्या.

4 हा हौद बारा बैलांवर उभा होता, तीन बैल उत्तरेकडे, तीन पश्चिमेकडे, तीन दक्षिणेकडे आणि तीन पूर्वेकडे तोंड करून होते आणि त्यांच्यावर हौद विसावला होता आणि त्यांचे मागचे अंग आतील बाजूस होते.

5 त्याची जाडी चार बोटे होती आणि पेल्याचा घेर कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे बाहेरच्या बाजूला वळलेला होता. त्यामध्ये तीन हजार बथ पाणी मावत असे.

6 होमबलींची अर्पणे धुण्यासाठी त्याने दहा गंगाळे तयार करून टाकीच्या उजवीकडे पाच व डावीकडे पाच अशी ठेवली. फक्त याजकवर्गाला धुण्यासाठी हौदाचे पाणी वापरता येत असे.

7 दिलेल्या वर्णनाप्रमाणे त्याने सोन्याच्या दहा समया तयार केल्या आणि त्या मंदिरामध्ये पाच दक्षिण बाजूच्या भागावर आणि पाच उत्तर बाजूच्या भागावर ठेवल्या.

8 त्याने दहा मेज तयार केले आणि ते मंदिरात ठेवले, पाच दक्षिणेकडे आणि पाच उत्तरेकडे. पाणी शिंपडणारे सोन्याचे शंभर कटोरे सुद्धा तयार केले.

9 नंतर त्याने याजकांसाठी एक अंगण व जनतेसाठी एक मोठे अंगण तयार केले व त्यांचे दरवाजे कास्य धातूने मढविले.

10 त्याने पाण्याचा हौद दक्षिण बाजूला, दक्षिणपूर्व दिशेच्या कोपऱ्यावर ठेवला.

11 आणि हुरामने मडके आणि फावडे आणि शिंपडण्याचे भांडेही बनविले. हुरामने परमेश्वराच्या मंदिरात शलोमोन राजासाठी हाती घेतलेले सर्व काम पूर्ण केले:

12 दोन खांब; खांबांच्या वर दोन वाटीच्या आकाराचे कळस; खांबांवर वाटीच्या आकाराच्या दोन कळसांना सजविणार्‍या जाळ्यांचे दोन संच;

13 त्या जाळ्यांच्या दोन संचासाठी चारशे डाळिंबे (खांबावरील वाट्यांच्या आकाराचे कळस सजविणार्‍या एका जाळीसाठी डाळिंबांच्या दोन रांगा);

14 तिवड्या व त्यांची गंगाळे;

15 हौद आणि त्याखालील बारा बैल;

16 भांडी, फावडे, मांस पकडण्याचे काटे, इत्यादी सर्व वस्तू. शलोमोन राजासाठी हुराम-अबीने याहवेहच्या मंदिरातील बनविलेल्या या सर्व वस्तू उजळ कास्याच्या होत्या.

17 राजाने त्या वस्तू सुक्कोथ आणि सारेथान प्रदेशामध्ये यार्देनेच्या पठारावर मातीच्या साच्यात घडवून घेतल्या होत्या.

18 या सर्व वस्तू शलोमोनाने इतक्या बनविल्या होत्या की, कास्याचे वजन करणे शक्य नव्हते.

19 परमेश्वराच्या मंदिरामध्ये असलेली उपकरणेसुद्धा शलोमोनाने तयार करून घेतली होती: सोन्याची वेदी; मेज, ज्यांच्यावर समक्षतेची भाकर ठेवली होती;

20 नेमून दिल्याप्रमाणे आतील पवित्रस्थानासमोर जाळण्यासाठी शुद्ध सोन्याचे दीपस्तंभ व त्यांचे दिवे;

21 सोन्याच्या फुलांची सजावट आणि दिवे आणि चिमटे (ते शुद्ध सोन्याचे होते);

22 दिव्याच्या वाती कापण्याची शुद्ध सोन्याची कात्री, शिंपडण्याचे कटोरे, पात्रे व धूपदाण्या; मंदिराचा सोन्याचा प्रवेशभाग: मुख्य द्वार, परमपवित्रस्थानाची आतील दारेसुध्दा सोन्याची होती.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan