२ इतिहास 18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीमिखायाहचा अहाबाविरुध्द भविष्यवाणी 1 आता यहोशाफाटजवळ मोठी संपत्ती आणि सन्मान होता आणि त्याने स्वतःला अहाबाशी विवाहाद्वारे जोडून घेतले. 2 काही वर्षानंतर तो शोमरोनला अहाबाला भेटण्यास गेला. अहाबाने त्याच्यासाठी व त्याजबरोबर आलेल्या लोकांसाठी अनेक मेंढरे व गुरे कापली व त्याने रामोथ-गिलआदवर हल्ला करावा अशी त्याला विनंती केली. 3 इस्राएलचा राजा अहाबाने यहूदीयाचा राजा यहोशाफाटला विचारले, “तुम्ही माझ्याबरोबर रामोथ गिलआदविरुद्ध जाल का?” यहोशाफाटने उत्तर दिले, “तुम्ही जसे आहात तसाच मी आहे आणि माझे लोक तुमचे लोक आहेत; आम्ही तुमच्या युद्धात सहभागी होऊ.” 4 परंतु यहोशाफाट इस्राएलच्या राजाला असे सुद्धा म्हणाला, “प्रथम याहवेहचा सल्ला घ्या.” 5 तेव्हा इस्राएलच्या राजाने सुमारे चारशे संदेष्ट्यांना एकत्र बोलाविले आणि त्यांना विचारले, “आम्ही रामोथ-गिलआदच्या विरुद्ध युद्धास जावे की नाही?” त्यांनी उत्तर दिले, “जा, कारण परमेश्वर ते राजाच्या हाती देईल.” 6 परंतु यहोशाफाटने विचारले, “आपण विचारावे असा याहवेहचा एकही संदेष्टा येथे नाही काय?” 7 इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला, “ज्याच्याद्वारे आपण याहवेहचा सल्ला घेऊ शकतो असा एक संदेष्टा अजूनही आहे, परंतु तो माझ्याविषयी कधीही चांगला संदेश देत नाही, नेहमीच वाईट संदेश देतो, म्हणून मला त्याचा तिरस्कार वाटतो. तो इम्लाहचा पुत्र मिखायाह आहे.” यहोशाफाटने उत्तर दिले, “राजाने असे बोलू नये.” 8 तेव्हा इस्राएलच्या राजाने आपल्या एका अधिकार्याला बोलाविले व म्हटले, “लवकर जाऊन इम्लाहचा पुत्र मिखायाह याला घेऊन ये.” 9 इस्राएलचा राजा आणि यहूदीयाचा राजा यहोशाफाट आपली राजवस्त्रे परिधान करून शोमरोनाच्या प्रवेशद्वाराजवळील खळ्याजवळ त्यांच्या सिंहासनांवर बसले होते, आणि संदेष्टे त्यांच्यासमोर संदेश देत होते. 10 तेव्हा केनानाहचा पुत्र सिद्कीयाह याने लोखंडाची शिंगे तयार केली होती, आणि त्याने जाहीर केले, “याहवेह असे म्हणतात: ‘या शिंगांनी तू अरामी लोकांवर असा वार करशील की त्यांचा नाश होईल.’ ” 11 इतर सर्व संदेष्टे सुद्धा तीच भविष्यवाणी करीत होते, ते म्हणाले, “रामोथ-गिलआदवर हल्ला करून विजयी हो कारण याहवेह ते राजाच्या हाती देणार आहे.” 12 जो दूत मिखायाहला बोलविण्यास गेला होता तो त्याला म्हणाला, “पाहा, सर्व संदेष्टे राजाच्या यशासंबंधी भविष्य सांगत आहेत, तुझे शब्द सुद्धा त्यांच्याशी सहमत होऊ दे, आणि राजाच्या बाजूने चांगले बोल.” 13 पण मिखायाह म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, माझे परमेश्वर मला जे काही सांगतील तेच मी त्याला सांगेन.” 14 तो जेव्हा आला, तेव्हा राजाने त्याला विचारले, “मिखायाह, आम्ही रामोथ गिलआदविरुद्ध युद्धास जावे किंवा नाही?” त्याने उत्तर दिले, “हल्ला करून विजयी व्हा, कारण त्यांना तुमच्या हाती दिले जाईल.” 15 राजाने त्याला म्हटले, “मी तुला किती वेळा शपथ देऊन सांगावे की याहवेहच्या नावाने तू मला केवळ जे सत्य तेच सांगावे?” 16 तेव्हा मिखायाहने उत्तर दिले, “सर्व इस्राएल लोक मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे पर्वतांवर पांगलेले आहेत असे मला दिसले आणि याहवेह म्हणाले, ‘या लोकांना धनी नाही. प्रत्येकाला शांतीने आपआपल्या घरी जाऊ दे.’ ” 17 इस्राएलच्या राजाने यहोशाफाटला म्हटले, “हा माझ्याविषयी कधीही चांगला संदेश देत नाही तर वाईटच संदेश देतो असे मी तुला सांगितले नव्हते काय?” 18 मिखायाह पुढे म्हणाला, “तर आता याहवेहचे वचन ऐका: याहवेह आपल्या सिंहासनावर बसलेले आणि स्वर्गातील सर्व समुदाय त्यांच्या डावीकडे व उजवीकडे उभा असलेला मला दिसला. 19 आणि याहवेहने म्हटले, ‘इस्राएलचा राजा अहाब याने जाऊन रामोथ-गिलआदावर हल्ला करून तिथे मरून पडावे म्हणून त्याला कोण मोह घालेल?’ “तेव्हा एकाने एक तर दुसर्याने दुसरी मसलत दिली. 20 तेव्हा एक आत्मा पुढे आला, आणि याहवेहपुढे उभा राहिला आणि म्हणाला, ‘मी त्याला मोह घालेन.’ “याहवेहने विचारले, ‘तू हे कसे करशील?’ 21 “तो म्हणाला, ‘मी जाऊन त्याच्या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात फसविणारा आत्मा होईन.’ “याहवेहने म्हटले, ‘तू त्याला मोहात पाडण्यास यशस्वी होशील, जा आणि तसे कर.’ 22 “तर आता पाहा, याहवेहने तुझ्या या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात फसविणारा आत्मा घातला आहे. आणि तुझ्यावर अरिष्ट यावे असे याहवेह बोलले आहेत.” 23 तेव्हा केनानाहचा पुत्र सिद्कीयाह उठला व मिखायाहच्या गालावर चापट मारत विचारले, “याहवेहचा आत्मा माझ्यामधून निघून तुझ्याशी बोलायला कोणत्या मार्गाने गेला?” 24 मिखायाहने उत्तर दिले, “ज्या दिवशी तू घराच्या आतील खोलीत जाऊन लपशील तेव्हा तुला ते समजेल.” 25 तेव्हा इस्राएलच्या राजाने आज्ञा दिली, “मिखायाहला घ्या आणि शहराचा अधिकारी आमोन व राजपुत्र योआश यांच्याकडे त्याला परत पाठवा, 26 आणि त्यांना सांगा, ‘राजा असे म्हणतात: या मनुष्याला तुरुंगात टाका आणि मी सुखरुप परत येईपर्यंत त्याला केवळ भाकर आणि पाणी द्या.’ ” 27 तेव्हा मिखायाह म्हणाला, “तू जर सुखरुप परत आलास तर याहवेह माझ्याद्वारे बोललेच नाही असे समजावे.” तो पुढे म्हणाला, “लोकांनो, तुम्ही सर्वजण हे लक्षात ठेवा!” आहाबचा रामोथ गिलआद येथे मृत्यू 28 यानंतर इस्राएलचा राजा व यहूदीयाचा राजा यहोशाफाट हे रामोथ गिलआद येथे गेले. 29 इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला, “मी वेश बदलून युद्धात प्रवेश करेन, परंतु तुम्ही तुमची राजवस्त्रे घाला.” म्हणून इस्राएलच्या राजा वेश बदलून युद्धात गेला. 30 आता अरामाच्या राजाने आपल्या रथांच्या सरदारांना आज्ञा दिली होती, “इस्राएलच्या राजाशिवाय कोणत्याही लहान थोरांशी लढू नका.” 31 रथांच्या सरदारांनी जेव्हा यहोशाफाटला पाहिले, तेव्हा त्यांना वाटले, “हा इस्राएलचा राजा आहे.” म्हणून ते त्याच्यावर हल्ला करण्यास वळले, पण यहोशाफाटने मोठ्याने धावा केला, आणि याहवेहने त्याला मदत केली. परमेश्वराने त्यांना त्याच्यापासून दूर नेले, 32 आणि रथांच्या सरदारांनी पाहिले की तो इस्राएलचा राजा नाही तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग करण्याचे थांबविले. 33 पण कोणीतरी सहजच आपला बाण सोडला आणि तो जाऊन इस्राएलच्या राजाच्या चिलखत आणि कमरेचा पट्टा यामधून गेला. राजाने आपल्या रथस्वाराला सांगितले, “रथ मागे फिरव आणि मला युद्धातून बाहेर काढ कारण मी घायाळ झालो आहे.” 34 तो संपूर्ण दिवस युद्ध वाढत गेले आणि इस्राएलचा राजा संध्याकाळपर्यंत अराम्यांचा सामना करीत रथातच राहिला, आणि सूर्यास्ताच्या वेळी तो मरण पावला. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.