२ इतिहास 12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीशिशाकची यरुशलेमवर स्वारी 1 राजा म्हणून रेहोबोअमचे स्थान स्थापित झाल्यानंतर आणि तो बलवान झाला, तेव्हा त्याने आणि त्याच्याबरोबर असलेल्या सर्व इस्राएली लोकांनी याहवेह यांचे नियम सोडून दिले. 2 याहवेहबरोबर ते अविश्वासू झाले, म्हणून इजिप्तचा राजा शिशाकने रेहोबोअम राजाच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी यरुशलेमवर हल्ला केला. 3 बाराशे रथ आणि साठ हजार घोडेस्वार आणि लिबिया, सुक्की आणि कूशी चे असंख्य सैन्य इजिप्तमधून त्याच्याबरोबर आले. 4 त्याने यहूदीयाची तटबंदी असलेली शहरे काबीज केली आणि ते यरुशलेमपर्यंत आले. 5 नंतर शमायाह संदेष्टा रेहोबोअम आणि शिशाकच्या भयाने यरुशलेममध्ये जमलेल्या यहूदीयाच्या पुढाऱ्यांकडे आला आणि त्यांना म्हणाला, “याहवेह असे म्हणतात, तुम्ही मला सोडून दिले आहे; त्यामुळेच मी आता तुम्हाला शिशाककडे सोडून देतो.” 6 तेव्हा इस्राएलचे पुढारी आणि राजाने स्वतःला नम्र केले आणि ते म्हणाले, “याहवेह न्यायी आहेत!” 7 जेव्हा याहवेहनी पाहिले की, त्यांनी स्वतःला नम्र केले आहे, तेव्हा याहवेहचे हे शब्द शमायाहकडे आले: “त्यांनी स्वतःला नम्र केले आहे, त्यामुळे मी त्यांचा नाश करणार नाही, परंतु लवकरच त्यांची सुटका करेन. माझा क्रोध शिशाकद्वारे यरुशलेमवर ओतला जाणार नाही. 8 तथापि, ते त्याच्या अधीन होतील, म्हणजे माझी सेवा करणे आणि दुसऱ्या देशातील राजांची सेवा करणे यातील फरक त्यांना समजून येईल.” 9 इजिप्तचा राजा शिशाक याने जेव्हा यरुशलेमवर हल्ला केला, त्याने याहवेहच्या मंदिरातील भांडारे व राजवाड्यातील भांडारे लुटून नेली. शलोमोनने बनविलेल्या सोन्याच्या ढालींसहीत त्याने सर्वकाही घेतले. 10 म्हणून रेहोबोअम राजाने त्या सोन्याच्या ढालींच्या ऐवजी कास्याच्या ढाली तयार केल्या व राजवाड्यातील पहारेकर्यांच्या कामगिरीवर असलेल्यांच्या हाती स्वाधीन केल्या. 11 जेव्हा राजा याहवेहच्या मंदिरात जात असे, तेव्हा पहारेकरी त्या ढाली घेऊन त्याच्याबरोबर जात असत आणि नंतर त्या त्यांच्या चौकीत ठेवत असत. 12 रेहोबोअमने स्वतःला नम्र केले त्यामुळे, याहवेहचा राग त्याच्यापासून दूर वळला आणि तो पूर्णपणे नष्ट झाला नाही. खरोखरच, यहूदीयामध्ये काही चांगलेही होते. 13 रेहोबोअम राजाने स्वतःला यरुशलेममध्ये स्थिर केले आणि राजा म्हणून राहिला. त्यावेळी तो एकेचाळीस वर्षांचा होता आणि आपले नाव द्यावे म्हणून याहवेहने सर्व इस्राएलच्या गोत्रांतून ज्या शहराची निवड केली त्या यरुशलेमात त्याने राज्य केले. त्याच्या आईचे नाव नामाह होते; ती अम्मोनी होती. 14 त्याने दुष्ट कृत्य केले, कारण याहवेहचा शोध घ्यावा याकडे त्याने त्याचे अंतःकरण लावलेले नव्हते. 15 रेहोबोअमच्या कारकिर्दीतील घटनांबद्दल, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, शमायाह संदेष्टा आणि इद्दो द्रष्टा यांनी तयार केलेल्या वंशावळीत त्या लिहिलेल्या नाहीत काय? रेहोबोअम व यरोबोअम यांच्यामध्ये सतत युद्ध होत राहिले. 16 रेहोबोअम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या नगरात पुरण्यात आले. आणि त्याच्यानंतर त्याचा पुत्र अबीयाह त्याचा वारस म्हणून राजा झाला. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.