२ इतिहास 1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीज्ञानासाठी शलमोनाची प्रार्थना 1 दावीद राजाचा पुत्र शलोमोनाने स्वतःस इस्राएलच्या राज्यावर भक्कमपणे स्थापित केले, कारण याहवेह त्याच्या परमेश्वराने त्याला अत्यंत महान बनविले होते. 2 मग शलोमोन संपूर्ण इस्राएलास म्हणाला—फौजेचे सहस्त्राधिपती व शताधिपती, न्यायाधीश, इस्राएलातील सर्व पुढारी, कुटुंबप्रमुख— 3 शलोमोन व संपूर्ण सभा गिबोनच्या उच्चस्थानी गेले, कारण याहवेहचा सेवक मोशेने अरण्यवासात परमेश्वराचा सभामंडप उभारला होता. 4 दावीदाने किर्याथ-यआरीमहून परमेश्वराचा कोश आणला, कारण त्याने त्याकरिता यरुशलेम येथे एक मंडप उभारला होता. 5 परंतु हूरचा पुत्र, उरीचा पुत्र बसालेलाने गिबोनात कास्याच्या धातूची वेदी याहवेहच्या कोशासमोर बनविली होती; आता शलोमोन व सर्व लोक त्यांची इच्छा जाणून घेण्यास आले. 6 शलोमोन याहवेहच्या समक्षतेत सभामंडपात गेला व त्याने कास्याच्या वेदीवर एक हजार होमबली अर्पिले. 7 त्या रात्री परमेश्वर शलोमोनला दर्शन देऊन म्हणाले, “मी तुला जे काही द्यावे असे तुला वाटते ते माग.” 8 शलोमोनाने परमेश्वराला उत्तर दिले, “आपला सेवक माझे पिता दावीद याला आपण अपार दया दाखविली आणि त्यांच्या जागी तुम्ही मला राजा म्हणून नेमले. 9 आता याहवेह परमेश्वरा, माझे पिता दावीदाला दिलेली वचने पूर्ण होऊ द्यावी, जमिनीवरील धूलिकणांप्रमाणे असंख्य लोक असलेल्या राष्ट्राचा तुम्ही मला राजा बनविले. 10 या लोकांना मार्गदर्शन करण्यास मला सुज्ञता व ज्ञान द्या, कारण आपल्या या मोठ्या प्रजेवर कोण राज्य करू शकणार?” 11 तेव्हा परमेश्वर शलोमोनाला म्हणाले, “जर हीच तुझ्या मनातील इच्छा आहे व तू धनदौलत, संपत्ती किंवा मान सन्मान मागितला नाहीस. मी तुझ्या शत्रूंना मृत्यू द्यावा अथवा स्वतःसाठी मोठे आयुष्यमान ही मागणी देखील केली नाहीस, तर ज्या माझ्या लोकांवर मी तुला राजा बनविले त्यांच्यावर नीट शासन करता यावे म्हणून तू सुज्ञता व ज्ञान मागितलेस, 12 तुला सुज्ञता व ज्ञान देण्यात येईल. याशिवाय मी तुला इतकी धन, संपत्ती आणि सन्मान देईन की, आतापर्यंत कोणत्याही राजाला कधीही प्राप्त झाले नव्हते व कोणालाही होणार नाही.” 13 नंतर शलोमोन गिबोनाच्या उच्च स्थानावरील सभामंडपावरून निघून यरुशलेमास गेला आणि इस्राएलावर राज्य करू लागला. 14 शलोमोनजवळ रथ व घोडे यांचा साठा झाला; त्याच्याकडे चौदाशे रथ आणि बारा हजार घोडे, जे त्याने रथांच्या शहरात व काही यरुशलेमात राजाकडे ठेवली होती. 15 राजाने यरुशलेमात चांदी व सोने धोंड्याप्रमाणे व गंधसरू डोंगर तळवटीतील उंबराच्या झाडांप्रमाणे सर्वसाधारण असे केले. 16 शलोमोनच्या घोड्यांची आयात इजिप्त आणि कवे वरून होत असे; त्यावेळेच्या दरानुसार किंमत लावून राजाचे व्यापारी ते कवेवरून विकत घेत असे. 17 त्यांनी सहाशे शेकेल चांदी देऊन इजिप्तवरून रथ आयात करून आणले व एकेका घोड्याची किंमत एकशे पन्नास शेकेल चांदी इतकी होती. हिथी व अरामी राजांना सुद्धा ते निर्यात करीत असे. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.