Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ शमुवेल 29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


आखीश दावीदाला सिकलाग येथे परत पाठवितो

1 पलिष्ट्यांनी त्यांचे सर्व सैन्य अफेक येथे जमविले आणि इस्राएली सैन्याने त्यांची छावणी येज्रीलच्या झर्‍याजवळ दिली.

2 पलिष्टी सरदार आपआपल्या शंभराच्या आणि हजारांच्या तुकड्यांबरोबर निघाले आणि त्यांच्यामागे दावीद आणि त्याची माणसे आखीश बरोबर चालू लागले.

3 तेव्हा पलिष्ट्यांच्या सेनाधिकार्‍यांनी विचारले, “या इब्री लोकांचे येथे काय काम?” आखीशने उत्तर दिले, “हा दावीद नाही काय, जो इस्राएलचा राजा शौल याच्याकडे अधिकारी होता? तो आता एक वर्षाहून अधिक काळ माझ्याबरोबर आहे, आणि त्याने शौलाला सोडले तेव्हापासून आजपर्यंत, मला त्याच्यामध्ये काही दोष सापडला नाही.”

4 परंतु पलिष्ट्यांचे सेनापती आखीशवर रागावले होते आणि ते म्हणाले, “त्या मनुष्याला परत पाठवून दे, म्हणजे जे ठिकाण तू त्याला दिले आहेस तिथे त्याने परत जावे. त्याने आपल्याबरोबर लढाईमध्ये जाऊ नये, नाहीतर लढाई होत असताना तो आपल्याविरुद्ध लढेल. आपल्याच लोकांचे डोके कापण्यापेक्षा, त्याच्या धन्याची कृपा मिळविणे हे किती चांगले असेल?

5 हाच तो दावीद नाही काय, ज्याच्याविषयी नृत्य करताना त्यांनी गाईले: “ ‘शौलाने त्याच्या हजारांना मारले, आणि दावीदाने त्याच्या दहा हजारांना मारले?’ ”

6 तेव्हा आखीशने दावीदाला बोलावून म्हटले, “जिवंत याहवेहची शपथ, तू विश्वसनीय आहेस आणि सैन्यामध्ये तू माझ्याबरोबर सेवा करावी यात मला आनंद आहे. ज्या दिवशी तू माझ्याकडे आलास तेव्हापासून आजपर्यंत मला तुझ्यामध्ये काही दोष सापडला नाही, परंतु सरदार तुला अनुमती देत नाहीत.

7 आता तू मागे वळ आणि शांतीने जा; पलिष्टी सरदारांना असंतुष्ट वाटेल असे काहीही करू नकोस.”

8 दावीदाने आखीशला विचारले, “परंतु मी काय केले आहे? मी आपल्याकडे आलो तेव्हापासून आतापर्यंत आपल्या दासामध्ये काही दोष आढळला आहे काय? माझ्या राजाच्या, मी जाऊन स्वामीच्या शत्रूशी का लढू नये?”

9 आखीशने दावीदाला उत्तर दिले, “मला माहीत आहे तू माझ्या दृष्टीने परमेश्वराच्या दूतासारखा आहेस; परंतु पलिष्टी सेनापती म्हणतात, ‘त्याने आमच्याबरोबर युद्धास जाऊ नये.’

10 तर सकाळी लवकर ऊठ आणि तुझ्या धन्याचे जे चाकर तुझ्याबरोबर आले आहेत, त्यांच्याबरोबर पहाट होताच निघून जा.”

11 तेव्हा दावीद आणि त्याची माणसे पहाटेच उठून पलिष्ट्यांच्या प्रदेशाकडे जाण्यासाठी निघाली आणि पलिष्टी सैन्य येज्रीलपर्यंत गेले.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan