Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ शमुवेल 24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


दावीद शौलाला वाचवितो

1 पलिष्ट्यांचा पाठलाग करून परत आल्यानंतर शौलाला सांगण्यात आले, “दावीद एन-गेदीच्या वाळवंटात आहे.”

2 तेव्हा शौलाने सर्व इस्राएलमधून सक्षम असलेले तीन हजार तरुण पुरुष घेतले आणि ते दावीदाचा व त्याच्या माणसांचा शोध करण्यासाठी रानबकर्‍यांच्या खडकाळ भागात गेले.

3 रस्त्याने फिरत तो मेंढवाड्याच्या जवळ आला. तिथे एक गुहा होती. शौल तिथे बहिर्दिशेस गेला, दावीद आणि त्याची माणसेही त्या गुहेत अगदी लांब आतील बाजूस होती.

4 दावीदाची माणसे म्हणाली, “हाच तो दिवस आहे, ज्याविषयी याहवेहने तुम्हाला सांगितले होते, ‘मी तुझ्या शत्रूला तुझ्या हाती देईन तेव्हा तुला वाटेल तसे तू त्याचे कर.’ ” तेव्हा दावीदाने हळूवारपणे सरकत जाऊन शौलाच्या झग्याचा काठ कापून घेतला.

5 त्यानंतर शौलाच्या झग्याचा काठ आपण कापला म्हणून दावीदाचे मन त्याला टोचू लागले.

6 तो त्याच्या माणसांना म्हणाला, “मी माझ्या धन्यावर, याहवेहच्या अभिषिक्तावर हात टाकावा अशी गोष्ट याहवेह माझ्या हातून न घडवो; कारण ते याहवेहचे अभिषिक्त आहे.”

7 या शब्दांनी दावीदाने त्याच्या माणसांचा कडकपणे निषेध केला आणि शौलावर हल्ला करण्यास आवरले. तेव्हा शौल गुहेतून बाहेर निघून आपल्या मार्गाने गेला.

8 नंतर दावीद गुहेच्या बाहेर आला आणि शौलाला हाक मारली, “महाराज, माझ्या धन्या!” जेव्हा शौलाने मागे पाहिले, तेव्हा दावीदाने भूमीकडे आपले तोंड करून दंडवत घातले.

9 तो शौलाला म्हणाला, “तुम्ही लोकांचे का ऐकता, जेव्हा ते म्हणतात, ‘दावीद तुला इजा करण्यास पाहत आहे’?

10 आज तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी पाहिले आहे की, कशाप्रकारे याहवेहने गुहेमध्ये तुम्हाला माझ्या हाती दिले होते. तुम्हाला मारून टाकावे असे काहीजण म्हणाले, परंतु मी तुम्हाला सोडले; मी म्हणालो, ‘मी माझ्या धन्यावर हात टाकणार नाही, कारण ते याहवेहचे अभिषिक्त आहेत.’

11 पाहा, माझ्या पित्या, तुमच्या झग्याचा तुकडा माझ्या हातात आहे तो पाहा! मी तुमच्या झग्याचा काठ कापून घेतला परंतु तुम्हाला मारून टाकले नाही. यावरून माझ्याकडे दुष्ट किंवा फितुरी असल्याचा दोष नाही. मी तुमच्याशी चुकीचे वागलो नाही, तरीही तुम्ही माझ्या जिवाची शिकार करण्यास टपला आहात.

12 याहवेह तुमच्या आणि माझ्यामध्ये न्याय करो. तुम्ही माझ्याबरोबर जे चुकीचे केले आहे त्याचा बदला याहवेहच घेवो, परंतु मी तुम्हाला हात लावणार नाही.

13 जशी प्राचीन काळाची म्हण ‘दुष्टापासून दुष्टाई येते,’ म्हणून माझा हात तुम्हाला स्पर्श करणार नाही.

14 “इस्राएलचा राजा कोणाविरुद्ध बाहेर आला आहे? तुम्ही कोणाचा पाठलाग करीत आहात? एका मेलेल्या कुत्र्याचा? एखाद्या पिसवाचा?

15 याहवेहनेच आपला न्यायाधीश होऊन आपल्यामध्ये निवाडा करावा. त्यांनी माझा वाद लक्षात घेऊन माझा कैवार घ्यावा; व मला तुमच्या हातून सोडवून माझी सुटका करावी.”

16 जेव्हा दावीदाने त्याचे हे बोलणे संपविले तेव्हा शौलाने विचारले, “दावीदा, माझ्या पुत्रा, हा तुझाच आवाज आहे काय?” आणि शौल मोठ्याने रडला,

17 तो दावीदाला म्हणाला, “तू माझ्यापेक्षा अधिक नीतिमान आहेस, तू माझ्याशी सदाचाराने वागलास, परंतु मी तुझ्याशी वाईट वागलो.

18 तू माझ्याशी चांगले वागतोस ते तू आताच मला दाखवून दिले आहेस; याहवेहने मला तुझ्या हाती दिले होते, परंतु तू मला मारून टाकले नाहीस.

19 कोणा मनुष्याला त्याचा शत्रू सापडला तेव्हा त्याला इजा केल्याशिवाय जाऊ देईल काय? ज्याप्रकारे तू आज माझ्याशी वागलास त्याचे चांगले प्रतिफळ याहवेह तुला देवो.

20 मला माहीत आहे की, तू खरोखर राजा होशील आणि इस्राएलचे राज्य तुझ्या हातात स्थापित होईल.

21 तेव्हा आता मला याहवेहची शपथ घेऊन सांग की, माझ्या वंशजांचा तू नाश करणार नाहीस किंवा माझ्या पित्याच्या घराण्यातून माझे नाव पुसून टाकणार नाहीस.”

22 तेव्हा दावीदाने शौलास शपथेने वचन दिले; नंतर शौल घरी गेला, परंतु दावीद आणि त्याची माणसे गडाकडे गेली.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan