Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ शमुवेल 13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


शमुवेल शौलाचा निषेध करतात

1 शौल राजा झाला तेव्हा तो तीस वर्षांचा होता आणि त्याने बेचाळीस वर्षे इस्राएलवर राज्य केले.

2 शौलाने इस्राएलमधून तीन हजार पुरुष निवडले. दोन हजार त्याच्याजवळ मिकमाश येथे आणि बेथेलच्या डोंगराळ प्रदेशामध्ये होते आणि एक हजार बिन्यामीन प्रांतात गिबियाह येथे योनाथान बरोबर होते. बाकीच्या पुरुषांना त्याने आपआपल्या घरी पाठवून दिले.

3 गेबा येथील पलिष्ट्यांच्या ठाण्यावर योनाथानने हल्ला केला आणि पलिष्ट्यांनी याविषयी ऐकले. तेव्हा शौलाने संपूर्ण प्रदेशामधून रणशिंग वाजवित म्हटले, “इब्री लोकांनो, ऐका!”

4 तेव्हा इस्राएली लोकांनी ही बातमी ऐकली: “शौलाने पलिष्ट्यांच्या ठाण्यावर हल्ला केला आहे आणि पलिष्ट्यांसमोर इस्राएली लोक घृणित ठरले.” म्हणून लोकांना गिलगाल येथे शौलाबरोबर येण्यासाठी बोलाविण्यात आले.

5 तीन हजार रथ, सहा हजार रथस्वार आणि समुद्र किनार्‍यावरील वाळूइतके असंख्य सैनिक बरोबर घेऊन पलिष्टी लोक इस्राएलशी युद्ध करण्यास एकत्र आले. त्यांनी मिकमाश येथे बेथ-आवेनच्या पूर्वेकडे आपला तळ दिला.

6 आपण पेचात पडलो आहोत आणि आपले सैन्य दबावात आहे असे जेव्हा इस्राएली लोकांनी पाहिले, तेव्हा ते गुहा आणि झुडूपे, खडक आणि कडे व विवरे यामध्ये लपले.

7 काही इब्री लोक तर यार्देनपासून गाद आणि गिलआदापलिकडे गेले. परंतु शौल गिलगालातच राहिला आणि जे लोक त्याच्याबरोबर होते ते भीतीने कंपित झाले होते.

8 शमुवेलने वेळ ठरविल्याप्रमाणे शौलाने सात दिवस वाट पाहिली; परंतु शमुवेल गिलगालास आला नाही आणि शौलाची माणसे विखरू लागली.

9 तेव्हा तो म्हणाला, “होमार्पण आणि शांत्यर्पणे माझ्याकडे आणा.” आणि शौलाने होमार्पण केले.

10 त्याने होमार्पणाची समाप्ती करताच शमुवेल आला आणि शौल त्याला अभिवादन करण्यास बाहेर गेला.

11 तेव्हा शमुवेलने विचारले, “तू हे काय केले आहेस?” शौलाने उत्तर दिले, “जेव्हा मी पाहिले की, लोक निघून जात आहेत आणि ठरविलेल्या वेळात तुम्ही आला नाहीत आणि पलिष्टी लोक मिकमाश येथे जमत होते,

12 मला वाटले, ‘आता पलिष्टी लोक गिलगाल येथे माझ्याविरुद्ध चाल करून येतील आणि मी अजूनही याहवेहकडून साहाय्यासाठी विनंती केली नाही.’ म्हणून होमार्पण करणे मला भाग पडले.”

13 शमुवेल शौलास म्हणाला, “तू मूर्खपणा केला आहे, याहवेह तुझा परमेश्वर यांनी दिलेल्या आज्ञेचे पालन तू केले नाही; जर पालन केले असते तर इस्राएलवरील तुझे राज्य याहवेहने सर्वकाळासाठी स्थापले असते.

14 परंतु आता तुझे राज्य टिकणार नाही; याहवेहने आपल्या मनासारखा मनुष्य शोधला आहे आणि आपल्या लोकांचा अधिकारी म्हणून त्याला नेमले आहे. कारण तू याहवेहची आज्ञा पाळली नाही.”

15 नंतर शमुवेलने गिलगाल सोडले व बिन्यामीन प्रांतात गिबियाह येथे गेला, आणि शौलाने त्याच्याबरोबर असलेल्या पुरुषांची मोजणी केली. त्यांची संख्या सुमारे सहाशे होती.


निःशस्त्र इस्राएली लोक

16 शौल आणि त्याचा पुत्र योनाथान आणि त्यांच्याबरोबर असलेले पुरुष बिन्यामीन प्रांतामध्ये गेबा येथे राहिले. आणि पलिष्टी लोकांनी मिकमाश येथे तळ दिला.

17 छापा टाकलेल्या टोळ्या पलिष्ट्यांच्या छावणीतून तीन तुकड्यांमध्ये बाहेर पडल्या. एक शूआल भागात ओफराहकडे गेली,

18 दुसरी बेथ-होरोनकडे आणि तिसरी रानासमोर असलेले सेबोईम खोर्‍याच्या सीमेकडे गेली.

19 त्या दिवसांत संपूर्ण इस्राएली देशात लोहार सापडत नव्हते, कारण पलिष्टी लोक म्हणाले होते, “कदाचित इब्री लोक तलवारी किंवा भाले तयार करतील!”

20 म्हणून सर्व इस्राएली लोक त्यांचे फाळ, कुदळी, कुर्‍हाडी किंवा विळे यांना धार लावण्यासाठी खाली पलिष्ट्यांकडे जात असत.

21 नांगराचा फाळ व कुदळी यांना धार लावण्यासाठी दोन तृतीयांश शेकेल, व कुर्‍हाड, विळा आणि पराणीसाठी एकतृतीयांश शेकेल असा दर होता.

22 म्हणून लढाईच्या दिवशी शौल आणि योनाथान यांच्याबरोबर असलेल्या कोणाही सैनिकांच्या हाती तलवार किंवा भाला नव्हता; केवळ शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्याकडेच हत्यारे होती.


योनाथान पलिष्ट्यांवर हल्ला करतो

23 तेव्हा पलिष्टी सैन्यांची एक तुकडी मिकमाशाच्या घाटाकडे गेली होती.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan