Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ राजे 7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


शलोमोन आपला राजवाडा बांधतो

1 शलोमोनच्या राजवाड्याचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी तेरा वर्षे लागली.

2 त्याने लबानोनच्या वनात जो राजवाडा बांधला त्याची लांबी शंभर हात, रुंदी पन्नास हात व उंची तीस हात होती, त्याला गंधसरूच्या खांबांच्या चार रांगा होत्या व त्याला आधार देण्यासाठी गंधसरूच्या छाटलेल्या तुळया होत्या.

3 त्या खांबांवर एका ओळीत पंधरा तुळया; अशा पंचेचाळीस तुळया होत्या व त्यावर देवदारूच्या फळ्यांचे छत होते.

4 त्याच्या खिडक्या उंचावर समोरासमोर तीन अशा जोडीने बसविल्या होत्या.

5 सर्व दरवाजांना चौकट बाह्या होत्या; त्या समोरच्या बाजूने समोरासमोर तीन अशा जोडीने होत्या.

6 त्याने पन्नास हात लांब व तीस हात रुंद अशी खांबांची एक पंक्ती बनविली. त्याच्यासमोर एक द्वारमंडप होता व त्यासमोर खांब व त्यावर छत होते.

7 त्याने राजासनासाठी खोली बांधली, जी न्यायाची खोली, जिथे बसून तो लोकांचा न्याय करणार, त्या खोलीला जमिनीपासून छतापर्यंत गंधसरूच्या फळ्यांनी झाकले.

8 आणि ज्या राजवाड्यात तो राहणार त्याची रचना याच खोलीप्रमाणे होती. फारोहच्या ज्या कन्येशी त्याने विवाह केला होता तिच्यासाठी सुद्धा शलोमोनने याच खोलीसारखा राजवाडा बनविला.

9 या सर्व इमारती, बाहेरच्या बाजूपासून ते दरबारापर्यंत आणि त्यांच्या पायापासून छपराच्या वळचणीपर्यंत, उच्च प्रतीचे दगड घेऊन त्यांना आकारात कापून आतील व बाहेरील बाजूने त्यांना गुळगुळीत बनवून वापरले होते.

10 उत्तम दर्जाच्या मोठमोठ्या दगडांनी त्यांचा पाया घातला गेला. काही दगड दहा हात तर काही आठ हात लांबीचे होते.

11 त्याच्या वरच्या बाजूने योग्य आकारात कापलेले उच्च दर्जाचे दगड आणि गंधसरूच्या तुळया होत्या.

12 मोठ्या अंगणाच्या सभोवती घडलेल्या दगडांच्या तीन रांगा व छाटलेल्या गंधसरूच्या तुळयांची एक रांग होती, याहवेहच्या मंदिराच्या आतील अंगणाला व द्वारमंडपालाही तसेच होते.


मंदिराची सजावट

13 शलोमोन राजाने सोर येथून हीराम याला बोलावून घेतले.

14 त्याची आई नफताली गोत्रातील एक विधवा होती आणि त्याचा पिता सोरचा होता, तो कास्याचे काम करण्यात निपुण कारागीर होता. हुराम सर्वप्रकारचे कास्याचे काम करण्यास ज्ञानाने, शहाणपणाने व विद्येने भरलेला होता. तो शलोमोन राजाकडे आला व त्याला नेमून दिलेली सर्व कामे केली.

15 त्याने कास्याचे दोन खांब तयार केले, प्रत्येक खांबाची उंची अठरा हात आणि घेर बारा हात होती.

16 खांबांच्या शिखरांवर बसविण्यासाठी त्याने कास्याचे दोन ओतीव कळस केले; प्रत्येकाची उंची पाच हात होती.

17 खांबांवर असलेल्या प्रत्येक कळसांना सात साखळीच्या विणलेल्या जाळ्या बसविल्या होत्या.

18 खांबांच्या वरच्या कळसांना सजविण्यासाठी त्याने प्रत्येक जाळ्याला गोलाकारात दोन रांगेत डाळिंबे बनविली. प्रत्येक कळस त्याने असेच घडविले.

19 द्वारमंडपात असलेल्या खांबांवरील कळस कमळांच्या फुलांच्या आकाराचे, चार हात उंच होते.

20 दोन्ही खांबांच्या कळसांना लागून वाटीच्या आकाराच्या जाळीभोवती, दोनशे डाळिंबाच्या रांगा केलेल्या होत्या.

21 त्याने हे खांब मंदिराच्या द्वारमंडपाकडे ठेवले. दक्षिणेकडे ठेवलेल्या खांबाला त्याने याखीन आणि उत्तरेकडील खांबाला बवाज असे नाव दिले.

22 खांबांवर असलेले कळस कमळांच्या आकाराचे होते. याप्रकारे खांबांचे काम पूर्ण झाले.

23 त्याने ओतीव धातूचा हौद तयार केला, तो गोलाकार असून त्याचा व्यास एका काठापासून दुसर्‍या काठापर्यंत दहा हात होता व पाच हात उंच होता. त्याचे सभोवार माप घेण्यास तीस हात दोरी लागत असे.

24 त्याच्या काठाखाली सभोवार एकेका हाताच्या अंतरावर दहा काकड्या होत्या. या काकड्या हौदाबरोबरच एकांगी अशा दोन रांगेत ओतीव केल्या होत्या.

25 हा हौद बारा बैलांवर उभा होता, तीन बैल उत्तरेकडे, तीन पश्चिमेकडे, तीन दक्षिणेकडे आणि तीन पूर्वेकडे तोंड करून होते आणि त्यांच्यावर हौद विसावला होता आणि त्यांचे मागचे अंग आतील बाजूस होते.

26 त्याची जाडी चार बोटे होते, आणि पेल्याचा घेर, कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे बाहेरच्या बाजूला वळलेला होता. त्यामध्ये तीन हजार बथ पाणी मावत असे.

27 त्याने कास्याचे दहा चौरंग बनविले; प्रत्येकाची लांबी चार हात, रुंदी चार हात आणि उंची तीन हात होती.

28 चौरंग याप्रकारे बनविले होते: त्याला बाजूने लाकडाच्या फळ्या जोडल्या होत्या.

29 फळ्यांच्या मध्यभागी व तिवडीवरही सिंह, बैल आणि करूब यांच्या आकृती कोरल्या होत्या आणि सिंहाच्या व बैलांच्या ठोकलेल्या लोंबत्या झालरी होत्या.

30 प्रत्येक चौरंगाला चार कास्याची चाके व कास्याच्या धुर्‍या होत्या आणि प्रत्येकाला गंगाळे होती, ज्याला आधार देण्यासाठी ओतीव स्तंभ असून त्यांच्या बाजूंनी लोंबत्या माळा होत्या.

31 तिवडीच्या आतील बाजूस त्याचे तोंड उघडे होते व त्याला एका हाताएवढी खोल गोलाकार पट्टी होती. हा उघडा भाग गोल होता, आणि त्याच्या व्यासाचे माप दीड हात होते. त्याच्या तोंडाभोवती कोरीव काम होते. तिवडीचे खांब गोल नसून चौकोनी होते.

32 चार चाके खांबांच्या खाली होती आणि चाकांच्या धुर्‍या तिवडीला जोडलेल्या होत्या. प्रत्येक चाकाचा व्यास दीड हात होती.

33 ही चाके रथाच्या चाकांप्रमाणे बनविली होती; धुर्‍या, कडा, आरे आणि तुंबे हे सर्व ओतीव काम होते.

34 प्रत्येक तिवडीला, चारही कोपर्‍यांना चार दांडे होते, जे तिवडीला अखंड असे होते.

35 तिवडीच्या वरच्या बाजूला अर्धा हात गोलाकाराची खोल पट्टी होती. त्याचे आधारस्तंभ आणि खांब तिवडीच्या वरच्या बाजूने जोडलेले होते.

36 आधारस्तंभाच्या आणि खांबांच्या पृष्ठभागावर करूब, सिंह आणि खजुरीची झाडे कोरली होती आणि सभोवार लोंबत्या माळा होत्या.

37 अशाप्रकारे त्याने या दहा तिवड्या तयार केल्या. त्या सर्व एकाच साच्यात तयार केलेल्या असून ते सारख्याच मापाच्या आणि आकाराच्या होत्या.

38 त्यानंतर त्याने कास्याची दहा गंगाळे बनविली, प्रत्येकात चाळीस बथ पाणी मावत असे आणि त्याचा व्यास चार हात होता, त्या दहा तिवडीतील प्रत्येकावर एकेक गंगाळ होते.

39 त्याने पाच तिवड्या मंदिराच्या दक्षिणेकडे ठेवल्या आणि पाच उत्तरेकडे. त्याने हौद मंदिराच्या दक्षिणेस; दक्षिणपूर्वेच्या कोपर्‍यात ठेवला.

40 त्याने मडके आणि फावडे आणि शिंपडण्याचे भांडेही बनविले. हीरामाने याहवेहच्या मंदिरात शलोमोन राजासाठी हाती घेतलेले हे सर्व काम पूर्ण केले:

41 दोन खांब; खांबांच्या वर दोन वाटीच्या आकाराचे कळस; खांबांवर वाटीच्या आकाराच्या दोन कळसांना सजविणार्‍या जाळ्यांचे दोन संच;

42 त्या जाळ्यांच्या दोन संचासाठी चारशे डाळिंबे (खांबावरील वाट्यांच्या आकाराचे कळस सजविणार्‍या एका जाळीसाठी डाळिंबांच्या दोन रांगा);

43 दहा तिवड्या व त्यांची दहा गंगाळे;

44 हौद आणि त्याखालील बारा बैल;

45 भांडी, फावडे आणि शिंपडण्याच्या वाट्या. शलोमोन राजासाठी हीरामाने याहवेहच्या मंदिरातील बनविलेल्या या सर्व वस्तू उजळ कास्याच्या होत्या.

46 राजाने त्या वस्तू सुक्कोथ आणि सारेथान प्रदेशामध्ये यार्देनेच्या पठारावर मातीच्या साच्यात घडवून घेतल्या होत्या.

47 शलोमोनने या सर्व वस्तूंचे वजन केले नाही, कारण ते पुष्कळ होते; कास्याचे वजन करणे शक्य नव्हते.

48 याहवेहच्या मंदिरामध्ये असलेली उपकरणेसुद्धा शलोमोनाने तयार करून घेतली होती: सोन्याची वेदी; मेजावर समक्षतेची भाकर ठेवली होती;

49 शुद्ध सोन्याचे दीपस्तंभ (आतील पवित्रस्थानासमोर पाच उजवीकडे व पाच डावीकडे); सोन्याच्या फुलांची सजावट, दिवे आणि चिमटे;

50 शुद्ध सोन्याची गंगाळे, वाती कापण्याची कात्री, शिंपडण्याचे कटोरे, पात्रे व धूपदाण्या; आतील खोलीच्या, म्हणजेच परमपवित्रस्थानाच्या आणि मंदिराच्या मुख्य खोलीच्या दरवाजासाठी सोन्याच्या कड्या.

51 याहवेहच्या मंदिराचे सर्व काम शलोमोन राजाने पूर्ण केल्यानंतर, त्याने आपला पिता दावीदाने समर्पित केलेल्या वस्तू मंदिरात आणल्या; चांदी, सोने आणि पडदे; शलोमोनने त्या वस्तू याहवेहच्या मंदिराच्या भांडारात ठेवल्या.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan