१ राजे 4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीशलोमोनचे मंत्री व राज्याधिकारी 1 शलोमोन राजाने सर्व इस्राएलवर राज्य केले. 2 हे सर्व मुख्य अधिकारी होते: सादोकाचा पुत्र अजर्याह याजक; 3 शिशाचे पुत्र एलिहोरेफ आणि अहीयाह सचिव; अहीलुदचा पुत्र यहोशाफाट, नोंदणी करणारा; 4 यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, मुख्य सेनापती होता; सादोक व अबीयाथार, हे याजक होते. 5 नाथानचा पुत्र अजर्याह, हा राज्याधिकार्यांचा मुख्य होता. नाथानचा पुत्र जाबूद, राजाचा याजक व सल्लागार होता; 6 अहीशार, राजवाड्या संबंधीच्या कामकाजाचा व्यवस्थापक होता. अब्दाचा पुत्र अदोनिराम हा मजुरांवर अधिकारी होता. 7 शलोमोनने सर्व इस्राएलात बारा जिल्हाधिकारीही नेमले होते. ते राजाला आणि राजघराण्याला अन्नसामुग्री पुरवित असत. प्रत्येकाला वर्षातून एकदा, महिनाभर सामुग्री पुरवावी लागत असे. 8 त्यांची नावे ही होती: बेन-हूर हा एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशावर होता; 9 बेन-देकेर हा माकाज, शालब्बीम, बेथ-शेमेश आणि एलोन-बेथ-हानान या प्रदेशांवर होता. 10 बेन-हेसेद हा अरुब्बोथवर होता (सोकोह आणि हेफेरचा सर्व प्रदेश त्याच्याकडे होता); 11 बेन-अबीनादाब हा नाफोथ दोर यावर (शलोमोनची कन्या ताफाथ हिच्याशी त्याचा विवाह झाला होता); 12 अहीलुदचा पुत्र बाअना याच्याकडे तानख व मगिद्दो आणि येज्रीलखाली असलेल्या सारेथान जवळील बेथ-शानपर्यंत सर्व प्रदेश, तसेच बेथ-शानपासून योकमेअम पर्यंतचा आबेल-महोलाहचा प्रदेश; 13 बेन-गेबेर हा रामोथ-गिलआदवर (मनश्शेहहचा पुत्र याईरची गावे, त्याचप्रमाणे बाशानातील अर्गोब व त्यातील तटबंदीची व कास्याच्या अडसरांची फाटके असलेली साठ मोठी नगरे याच्याकडे होती); 14 इद्दोचा पुत्र अहीनादाबकडे महनाईम. 15 अहीमाजकडे नफताली होते (त्याने शलोमोनची कन्या बासमाथ हिच्याशी विवाह केला होता); 16 हूशाईचा पुत्र बआना आशेर आणि बालोथवर; 17 पारुआहचा पुत्र यहोशाफाट हा इस्साखारमध्ये होता; 18 एलाचा पुत्र शिमी हा बिन्यामीन प्रांतावर. 19 उरीचा पुत्र गेबेर हा गिलआद प्रांतावर (अमोर्यांचा राजा सीहोन आणि बाशानचा राजा ओग यांचा प्रदेश). त्या जिल्ह्यावर तो एकटाच अधिकारी होता. शलोमोनचा रोजचा पुरवठा 20 इस्राएल आणि यहूदीयाच्या लोकांची संख्या समुद्र किनार्यावरील वाळू इतकी अगणित होती. ते खाऊन पिऊन मजेत होते. 21 आणि फरात नदीपासून पलिष्ट्यांच्या देशापर्यंत आणि पुढे खाली इजिप्तच्या हद्दीपर्यंत या सर्व राज्यांवर शलोमोनचे राज्य होते. या सर्व राष्ट्रांनी शलोमोनला कर दिला व शलोमोनच्या सर्व आयुष्यभर ते त्याच्या अधीन राहिले. 22 शलोमोनचा रोजचा पुरवठा तीस कोर सपीठ व साठ कोर पीठ, 23 गोठ्यात चारलेले दहा बैल, कुरणात चरणारे वीस बैल आणि शंभर मेंढरे व बोकडे, याशिवाय हरिण, सांबरे, भेकरे आणि पुष्ट पक्षी. 24 कारण फरात नदीच्या पश्चिमेकडील तिफसाहपासून गाझापर्यंतच्या सर्व राज्यांवर शलोमोनचे राज्य होते आणि सर्व बाजूने शांती होती. 25 शलोमोनच्या जीवनभरात यहूदीया आणि इस्राएलचे लोक, दानपासून बेअर-शेबापर्यंत सुरक्षित होते, प्रत्येकजण आपआपल्या द्राक्षवेली व अंजिराच्या झाडाखाली होते. 26 शलोमोनकडे रथाच्या घोड्यांसाठी चार हजार तबेले आणि बारा हजार घोडे होते. 27 जिल्हाधिकारी आपआपल्या महिन्यात शलोमोन राजाला व त्यांच्या मेजावर भोजन करणार्यांसाठी अन्नसामुग्रींचा पुरवठा करीत असत. कशाचीही वाण पडणार नाही याची ते दक्षता घेत असत. 28 त्याचप्रमाणे रथाच्या घोड्यांसाठी व इतर घोड्यांसाठी देखील जव व वैरण त्यांच्या नेमलेल्या ठिकाणी आणत असत. शलोमोनचे ज्ञान 29 परमेश्वराने शलोमोनला ज्ञान व समुद्रकाठच्या वाळूप्रमाणे मोजमाप काढता येत नाही इतके फार मोठे शहाणपण व अगाध समज दिली होती. 30 पूर्वेकडील देशातील सर्व लोकांपेक्षा किंवा इजिप्तमधील सर्व ज्ञानापेक्षा शलोमोनचे ज्ञान फार मोठे होते. 31 इतर मनुष्यांपेक्षा, म्हणजेच एज्रावासी एथान, माहोलचे पुत्र हेमान, कल्कोल व दारदा यांच्यापेक्षा शलोमोन ज्ञानी होता. आणि त्याची किर्ती आसपासच्या सर्व राष्ट्रांपर्यंत पसरली. 32 शलोमोनने तीन हजार नीतिसूत्रे आणि एक हजार पाच गीते रचली. 33 लबानोनातील गंधसरूपासून भिंतीतून उगविणार्या एजोबापर्यंत वनस्पती जीवनाविषयी तो बोलला. पशू व पक्षी, सरपटणारे जंतू व मासे याबद्दलही त्याने वर्णन केले. 34 शलोमोनच्या ज्ञानाचे बोल ऐकायला सर्व राष्ट्रांतून लोक येत असत, ते जगातील सर्व राजे ज्यांनी शलोमोनच्या ज्ञानाविषयी ऐकले होते, त्यांच्याद्वारे पाठवले जात असत. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.