Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ राजे 2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


शलोमोनला दावीदाच्या आज्ञा

1 जेव्हा दावीदाचा शेवट जवळ आला, तेव्हा त्याने आपला पुत्र शलोमोनाला आज्ञा दिल्या.

2 दावीदाने म्हटले, “जगाच्या प्रथेनुसार आता माझी जाण्याची वेळ आली आहे, तर खंबीर हो आणि शुराप्रमाणे वाग.

3 आणि याहवेह तुझे परमेश्वर काय म्हणतात त्याकडे लक्ष दे: मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे याहवेहच्या आज्ञांचे पालन कर आणि त्यांचे नियम आणि आज्ञा, त्यांचे निर्णय आणि निर्बंध पाळ. असे केल्याने जे काही तू करशील आणि जिथे कुठे तू जाशील तिथे तू यशस्वी होशील.

4 आणि मला दिलेले हे अभिवचन याहवेह पूर्ण करतील: ‘जर तुझे वंशज आपले जीवन यथायोग्य ठेवतील, आणि त्यांच्या सर्व हृदयाने आणि जिवाने माझ्यासमोर विश्वासूपणे चालतील, इस्राएलच्या राजासनावर बसण्यासाठी तुझा वंश खुंटणार नाही.’

5 “तर तू स्वतः समजून घे की जेरुइयाहचा पुत्र योआब माझ्याशी कसा वागला; इस्राएलच्या सैन्याचे दोन सेनापती, नेरचा पुत्र अबनेर आणि येथेरचा पुत्र अमासा यांना त्याने काय केले. त्याने त्यांना जसे युद्धकाळात मारावे तसे शांतीच्या काळात जिवे मारले आणि त्या रक्ताने त्याचा कंबरपट्टा आणि पायतणे डागाळली आहेत.

6 तुझ्या सुज्ञतेनुसार त्यांचे कर, परंतु त्याचे पिकलेले डोके शांतीने कबरेत जाऊ देऊ नकोस.

7 “परंतु गिलआदी बारजिल्लईच्या मुलांवर दया दाखव आणि त्यांना तुमच्या मेजावर भोजन करणाऱ्यांपैकी असू दे. तुझा भाऊ अबशालोम याच्यापासून मी पळून गेलो तेव्हा ते माझ्या पाठीशी उभे राहिले.

8 “आणि बहूरीम येथील बिन्यामीन गेराचा पुत्र शिमी तुमच्यात आहे हे विसरू नकोस, मी महनाईमकडे जाताना त्या दिवशी ज्याने मला भयंकर शाप दिला होता. पण जेव्हा तो मला यार्देनकडे भेटण्यास आला, तेव्हा ‘मी तुला तलवारीने ठार मारणार नाही’ अशी याहवेहच्या नावाने मी त्याला शपथ दिली होती.

9 परंतु त्याला निर्दोष समजू नको. तू सुज्ञ व्यक्ती आहेस; त्याचे काय करावे हे तुला कळेल. त्याचे पिकलेले डोके रक्ताळलेले असे कबरेत पाठव.”

10 यानंतर दावीद त्याच्या पूर्वजांसोबत विसावला आणि दावीदाच्या नगरात त्याला पुरले गेले.

11 दावीदाने इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले; सात वर्षे हेब्रोनमध्ये आणि तेहतीस वर्षे यरुशलेमेत राज्य केले.

12 मग शलोमोन आपला पिता दावीद याच्या राजासनावर बसला आणि त्याचे राज्य बळकट असे स्थापित झाले.


शलोमोनचे सिंहासन स्थापित झाले

13 हग्गीथेचा पुत्र अदोनियाह हा शलोमोनची आई बथशेबाकडे आला. बथशेबाने त्याला विचारले, “तू शांतीने आला आहेस काय?” त्याने उत्तर दिले “होय, मी शांतीने आलो आहे.”

14 नंतर तो पुढे म्हणाला, “मला तुमच्याशी काही बोलायचे आहे.” ती म्हणाली, “तू बोलू शकतो.”

15 तेव्हा तो म्हणाला, “तुम्हाला तर ठाऊकच आहे की वास्तविकता राज्य माझे होते. त्यांचा राजा म्हणून सर्व इस्राएलची नजर माझ्याकडे होती. परंतु ते पालटले, आणि राज्य माझ्या भावाकडे गेले आहे; कारण त्याला ते याहवेहकडून आले आहे.

16 तर आता मला तुमच्याकडे एक विनंती करावयाची आहे. मना करू नका.” ती म्हणाली, “बोल.”

17 तो पुढे म्हणाला, “शलोमोन राजा तुम्हाला मना करणार नाही; कृपया त्यांना विचार की त्यांनी शूनेमकरीण अबीशग ही मला पत्नी म्हणून द्यावी.”

18 बथशेबा म्हणाली, “ठीक आहे, मी तुझ्या वतीने राजाशी बोलेन.”

19 जेव्हा बथशेबा शलोमोन राजाकडे त्याच्याशी अदोनियाहसाठी बोलण्यास गेली, तिला पाहताच राजा तिला भेटण्यास उभा राहिला, त्याने तिच्यापुढे डोके लवविले. राजाच्या आईसाठी आसन मागविले आणि ती त्याच्या उजवीकडे बसली.

20 ती म्हणाली, “मला तुझ्याकडे एक लहानशी विनंती करावयाची आहे, मला मना करू नकोस.” राजाने म्हटले, “माझ्या माते, माग, मी तुला मना करणार नाही.”

21 तेव्हा ती म्हणाली, “शूनेमकरीण अबीशग हिला तुझा भाऊ अदोनियाह याला पत्नी म्हणून दे.”

22 शलोमोन राजाने त्याच्या आईला उत्तर दिले, “तू अदोनियाहसाठी शूनेमकरीण अबीशग हिची विनंती का करतेस? तू त्याच्यासाठी राज्य मागू शकतेस; शेवटी तो माझा थोरला भाऊ आहे; होय, त्याच्यासाठी आणि अबीयाथार याजक व जेरुइयाहचा पुत्र योआब यांच्यासाठी देखील मागू शकतेस!”

23 तेव्हा शलोमोन राजाने याहवेहची शपथ घेतली: “अदोनियाहने ही जी विनंती केली आहे त्यासाठी त्याचा जीव देऊन त्याने किंमत मोजली नाही तर, परमेश्वर माझे पाहो आणि माझ्याशी अधिक कठोरपणे वागो!

24 तर आता, ज्यांनी मला माझे पिता दावीदाच्या राजासनावर स्थापित केले आहे आणि त्यांनी वचन दिल्याप्रमाणे माझे घराणे स्थापित केले आहे, ते याहवेह जिवंत आहेत; आज अदोनियाहला जिवे मारले जाईल!”

25 म्हणून शलोमोन राजाने यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याला आज्ञा केली, आणि त्याने अदोनियाहवर वार केला आणि तो मेला.

26 राजा अबीयाथार याजकाला म्हणाला, “तू अनाथोथ येथे आपल्या शेताकडे परत जा. वास्तविक तू सुद्धा मरण्यास पात्र आहे, परंतु मी तुला आता मारणार नाही, कारण माझे पिता दावीद याच्यासमोर तू सार्वभौम याहवेहचा कोश वाहिला आणि माझे पिता दावीदाच्या सर्व कष्टांमध्ये तू सहभागी होतास.”

27 म्हणून शलोमोनने अबीयाथारला याहवेहच्या याजकपदावरून काढून टाकले, याप्रकारे एलीच्या घराण्याबद्दल याहवेहने शिलोह येथे बोललेले शब्द पूर्णतेस आले.

28 जेव्हा योआबाला ही बातमी कळली, तो याहवेहच्या मंडपाकडे पळून गेला आणि वेदीवरील शिंगे धरून राहिला. अबशालोमसोबत तो जरी मिळाला नव्हता तरीही अदोनियाहसोबत त्याने कट रचला होता.

29 शलोमोन राजाला सांगण्यात आले की योआब याहवेहच्या मंडपात पळून जाऊन वेदीच्या बाजूला आहे. तेव्हा शलोमोनने यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याला हुकूम दिला, “जा, त्याच्यावर वार कर.”

30 तेव्हा बेनाइयाह याहवेहच्या मंडपामध्ये गेला आणि योआबाला म्हणाला, “राजा म्हणतो ‘बाहेर ये!’ ” परंतु त्याने उत्तर दिले, “नाही, मी येथेच मरेन.” तेव्हा बेनाइयाहने राजाला कळवले, “योआबाने मला असे उत्तर दिले.”

31 तेव्हा राजाने बेनाइयाहला आज्ञा केली, “तो म्हणतो तसे कर. त्याला मारून त्याला गाडून टाक आणि योआबाने विनाकारण रक्त सांडल्याच्या दोषातून मला व माझ्या सर्व कुटुंबाला मुक्त कर.

32 त्याने केलेल्या रक्तपाताबद्दल याहवेह त्याची परतफेड करतील, कारण माझे पिता दावीदच्या नकळत त्याने दोन माणसांवर हल्ला केला आणि त्यांना तलवारीने ठार केले. ते दोघेजण; इस्राएलच्या सैन्याचा सेनापती नेरचा पुत्र अबनेर आणि यहूदीयाच्या सैन्याचा सेनापती येथेरचा पुत्र अमासा; हे योआबापेक्षा अधिक चांगले आणि सरळ होते.

33 त्यांच्या रक्ताचा दोष योआबाच्या व त्याच्या वंशजांच्या माथ्यावर सर्वकाळ असो. परंतु दावीद व त्याचे वंशज, त्याचे घराणे आणि त्याचे राजासन यावर याहवेहची शांती सदा असो.”

34 तेव्हा यहोयादाचा पुत्र बेनाइयाहने जाऊन योआबावर वार केला आणि त्याला मारून टाकले आणि त्याला रानात त्याच्या घरी पुरले.

35 मग राजाने यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याला योआबाच्या जागी सैन्याचा अधिकारी म्हणून आणि अबीयाथाराच्या जागी सादोकला याजक म्हणून नेमले.

36 नंतर राजाने शिमीला बोलावून सांगितले, “तुझ्यासाठी यरुशलेमात घर बांध आणि तिथे राहा, इतर कुठेही जाऊ नकोस.

37 ज्या दिवशी तू निघून किद्रोनचे खोरे पार करशील, तेव्हा हे समज की तू खचितच मरशील; आणि तुझे रक्त तुझ्याच माथ्यावर असणार.”

38 शिमीने राजाला उत्तर दिले, “तुम्ही जे म्हणता ते योग्य आहे. माझे स्वामी जे म्हणतात त्याप्रमाणे आपला सेवक करेल.” आणि शिमी बराच काळ यरुशलेमात राहिला.

39 परंतु तीन वर्षानंतर, शिमीचे दोन गुलाम, माकाहचा पुत्र आखीश, गथचा राजा याच्याकडे पळून गेले आणि शिमीला सांगण्यात आले, “तुझे गुलाम गथमध्ये आहेत.”

40 हे ऐकताच, त्याने आपल्या गाढवावर खोगीर घातले आणि त्याच्या गुलामांचा शोध करीत आखीशकडे गथ येथे गेला. शिमीने जाऊन गथवरून आपल्या गुलामांना परत आणले.

41 जेव्हा शलोमोनला सांगण्यात आले की शिमी यरुशलेमहून गथला गेला होता आणि परत आला आहे.

42 तेव्हा राजाने शिमीला बोलावून घेतले आणि त्याला म्हटले, “याहवेहसमोर तुझ्याकडून शपथ घेऊन तुला मी चेतावणी दिली नव्हती काय की, ‘तू यरुशलेम सोडून कुठेही जाशील त्या दिवशी खचितच तू मरशील’? त्यावेळी तू मला म्हणालास, ‘तुम्ही जे काही म्हणता ते बरे आहे, मी त्याप्रमाणे करेन.’

43 तर मग तू याहवेहला दिलेली शपथ आणि मी दिलेली आज्ञा का पाळली नाही?”

44 पुढे राजा शिमीला म्हणाला, “माझे पिता दावीदाशी तू किती चुकीचा वागला हे तुला तुझ्या मनात ठाऊक आहे. याहवेहच तुला तुझ्या चुकीचा मोबदला देतील.

45 परंतु शलोमोन राजा आशीर्वादित राहील आणि दावीदाचे राजासन याहवेहसमोर सदा सुरक्षित राहील.”

46 तेव्हा यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याला राजाने आज्ञा दिली आणि त्याने बाहेर जाऊन शिमीवर वार केला आणि तो मेला. आता शलोमोनच्या हातात राज्य प्रस्थापित झाले.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan