Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ राजे 12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


इस्राएली लोकांचे रेहोबोअमविरुद्ध बंड

1 रेहोबोअम शेखेम येथे गेला, कारण इस्राएलचे सर्व लोक त्याला राजा करावे म्हणून तिथे गेले.

2 जेव्हा नेबाटाचा पुत्र यरोबोअमने हे ऐकले (तो शलोमोन राजापासून पळून अजूनही इजिप्त देशातच होता). तो इजिप्तवरून परत आला.

3 तेव्हा त्यांनी यरोबोअमला बोलावून घेतले, मग तो आणि इस्राएलची सर्व मंडळी रेहोबोअमकडे गेले व त्याला म्हणाले:

4 “तुमच्या पित्याने आमच्यावर भारी जू ठेवले, तर आता मजुरीचा हा कठीण भार व हे भारी जू आपण हलके करावे, म्हणजे आम्ही आपली सेवा करू.”

5 रेहोबोअमने उत्तर दिले, “तीन दिवसांसाठी माघारी जा आणि परत माझ्याकडे या.” तेव्हा लोक माघारी गेले.

6 तेव्हा त्याचा पिता शलोमोनच्या जीवनकाळात त्यांची सेवा केलेल्या वडीलजनांना रेहोबोअम राजाने विचारले, तो म्हणाला, “या लोकांना मी काय उत्तर द्यावे असे तुम्हाला वाटते?”

7 त्यांनी उत्तर दिले, “आज जर तुम्ही त्यांचा सेवक होऊन त्यांची सेवा केली व त्यांना अनुकूल उत्तर दिले, तर ते नेहमीच तुमचे सेवक म्हणून राहतील.”

8 पण रेहोबोअमने वडीलजनांचा सल्ला नाकारला आणि त्याच्याबरोबर वाढलेल्या व त्याच्या सेवेत असलेल्या तरुण पुरुषांचा सल्ला घेतला.

9 त्याने त्यांना विचारले, “जे लोक मला म्हणतात, ‘तुझ्या पित्याने आमच्यावर घातलेले जू हलके करावे,’ त्यांना मी काय उत्तर द्यावे?”

10 त्याच्याबरोबर वाढलेल्या तरुणांनी उत्तर दिले, “हे लोक तुला म्हणाले आहेत की, ‘तुझ्या पित्याने आमच्यावर भारी जू ठेवले होते, तर आता हे भारी जू आपण हलके करावे.’ आता त्यांना सांग, ‘माझी करंगळी माझ्या पित्याच्या कमरेपेक्षाही जाड आहे.

11 माझ्या पित्याने तुमच्यावर भारी जू लादले; मी ते अजून भारी करेन. माझ्या पित्याने तुम्हाला चाबकाने मारले; तर मी तुम्हाला विंचवांनी मारीन.’ ”

12 तीन दिवसानंतर यरोबोअम व सर्व लोक रेहोबोअमकडे आले, कारण राजाने त्यांना सांगितले होते, “तीन दिवसांनी माझ्याकडे परत या.”

13 वडील लोकांनी दिलेल्या सल्ल्याला नाकारत राजाने लोकांना कठोरपणे उत्तर दिले,

14 तरुणांच्या सल्ल्याचे अनुसरण करीत तो म्हणाला, “माझ्या पित्याने तुमचे जू भारी केले; मी ते अजून भारी करेन. माझ्या पित्याने तुम्हाला चाबकाने मारले; तर मी तुम्हाला विंचवांनी मारीन.”

15 अशाप्रकारे राजाने लोकांचे म्हणणे मानले नाही, कारण शिलोनी संदेष्टा अहीयाहच्याद्वारे याहवेहने नेबाटाचा पुत्र यरोबोअमला सांगितलेल्या वचनांची पूर्तता व्हावी म्हणून या घटना याहवेहकडून घडून आल्या होत्या.

16 राजाने आपले म्हणणे ऐकले नाही असे जेव्हा इस्राएलच्या सर्व लोकांनी पाहिले, तेव्हा त्यांनी राजाला उत्तर दिले: “आम्हाला दावीदामध्ये, इशायच्या मुलाशी आमचा काय वाटा, इस्राएला, तुझ्या डेर्‍यांपाशी जाऊन! दावीदा, आपल्या स्वतःचे घर सांभाळ!” असे म्हणत इस्राएलचे लोक परत घरी गेले.

17 परंतु तरीही जे इस्राएली लोक यहूदीयाच्या नगरांमध्ये राहत होते त्यांच्यावर रेहोबोअमने राज्य केले.

18 अदोनिराम जो मजुरी कामकर्‍यांचा प्रमुख होता त्याला रेहोबोअम राजाने पाठवले, परंतु सर्व इस्राएलने त्याला धोंडमार करून मारून टाकले. तरीही, रेहोबोअम राजा आपल्या रथात बसून यरुशलेमास निसटून गेला.

19 याप्रकारे इस्राएली लोकांनी दावीदाच्या घराण्याविरुद्ध बंड केले ते आजवर चालू आहे.

20 यरोबोअम इजिप्त देशातून परत आला आहे हे सर्व इस्राएल लोकांनी ऐकले, तेव्हा त्यांनी त्याला आपल्या मंडळीत बोलावून घेतले व त्याला सर्व इस्राएलवर राजा केले. केवळ यहूदाहचे गोत्र दावीदाच्या घराण्याशी विश्वासू राहिले.

21 जेव्हा रेहोबोअम यरुशलेमास आला, तेव्हा त्याने यहूदाह व बिन्यामीनच्या गोत्रातील सर्व लोकांना जमा केले; इस्राएलशी युद्ध करून शलोमोनचा पुत्र रेहोबोअमसाठी राज्य पुन्हा मिळवून देतील असे एक लाख ऐंशी हजार सक्षम तरुण पुरुष होते.

22 परंतु परमेश्वराचा मनुष्य शमायाह याच्याकडे परमेश्वराचे वचन आले:

23 “शलोमोनचा पुत्र यहूदीयाचा राजा रेहोबोअम, यहूदाह आणि बिन्यामीन व बाकीच्या लोकांना सांग,

24 ‘याहवेह असे म्हणतात: इस्राएल जे तुमचे बांधव आहेत त्यांच्याविरुद्ध लढाईस जाऊ नका. तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या घरी जा, कारण हे माझ्यापासून आहे.’ ” म्हणून त्यांनी याहवेहचा शब्द मानला आणि याहवेहने दिलेल्या आदेशाप्रमाणे आपआपल्या घरी परत गेले.


बेथेल आणि दान येथील सोन्याची वासरे

25 तेव्हा यरोबोअमने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शेखेम शहर बांधले व तिथे राहिला. तिथून पुढे त्याने पेनुएल बांधले.

26 यरोबोअमने स्वतःशी विचार केला, “राज्य कदाचित दावीदाच्या घराण्याकडे परत जाईल.

27 जर या लोकांनी यरुशलेमात जाऊन याहवेहच्या मंदिरात यज्ञार्पणे केली व त्यांचा स्वामी यहूदीयाचा राजा रेहोबोअम याच्याप्रीत्यर्थ आपली निष्ठा पुन्हा दाखविली, तर ते मला जिवे मारतील व त्यांचा राजा रेहोबोअम याच्याकडे वळतील.”

28 आपल्याबरोबरच्या लोकांचा सल्ला घेतल्यानंतर, राजाने दोन सोन्याची वासरे बनविली. तो लोकांना म्हणाला, “तुम्ही वर यरुशलेमकडे जाणे तुम्हाला अतिशय कठीण आहे, हे इस्राएला, ही पाहा तुमची दैवते, ज्यांनी तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले.”

29 एक वासरू त्याने बेथेलमध्ये व दुसरे दानमध्ये प्रतिष्ठापीत केले.

30 आणि ही बाब पाप अशी झाली; एका वासराची उपासना करण्यासाठी काही लोक बेथेलात येत होते आणि दुसर्‍या वासराची उपासना करण्यासाठी काही दूर दानपर्यंत गेले.

31 यरोबोअमने उच्च स्थानावर मंदिरे बांधली आणि जरी ते लेवी घराण्यातील नव्हते, प्रत्येक प्रकारच्या लोकांमधून याजक नेमले.

32 आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी, जसा यहूदीयामध्ये पाळला जात असे तसेच त्याने एका सणाची स्थापना केली. आणि वेदीवर यज्ञार्पणे केली. बेथेलमध्ये बनविलेल्या वासरांसाठी अर्पणे त्याने केली. बेथेलमध्ये यरोबोअमने बनविलेल्या पूजास्थानांवर सुद्धा त्याने याजक नेमले.

33 आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी, त्याने स्वतःच निवडलेल्या महिन्यात, त्याने बेथेलमध्ये बांधलेल्या वेदीवर यज्ञार्पणे केली. त्याने इस्राएली लोकांसाठी सण स्थापित करून वरती वेदीवर जाऊन अर्पणे सादर केली.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan