१ करिंथ 6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीविश्वासणार्यांमध्ये फिर्याद 1 जर तुमचा कोणाविरुद्ध वाद असल्यास, तो प्रभूच्या लोकांकडे न नेता, एखाद्या अनीतिमान न्यायाधीशाकडे नेण्याचे धैर्य कसे करता? 2 आपण प्रभूचे लोक जगाचा न्याय करणार आहोत, हे तुम्हाला माहीत नाही काय? असे असताना, तुम्ही या क्षुल्लक गोष्टींचा आपसात न्याय करण्यास समर्थ नाही का? 3 आपण स्वतः देवदूतांचा न्यायनिवाडा करणार आहोत हे तुम्हाला माहीत नाही का? तर त्याच्या तुलनेत या जगाच्या गोष्टी काहीच नाहीत. 4 जर अशा गोष्टीसंबंधी तुमच्यात वाद आहेत, तर तुमच्या मंडळीशी ज्यांचा काहीही संबंध नाही, अशांना तुम्ही न्याय करावयास कसे लावता? 5 तुम्हाला लाज वाटावी म्हणून मी हे सांगत आहे. विश्वासणार्यांमधील वादांचा न्याय करू शकेल असा तुमच्यामध्ये कोणीच शहाणा मनुष्य नाही का? 6 उलट एक विश्वासी मनुष्य त्याच्या बंधुवर फिर्याद करतो आणि ती ही विश्वास न ठेवणार्यांपुढे! 7 तुम्हामध्ये खटले आहेत याचा अर्थ हाच की तुमचा पूर्णपणे पराजय झालेला आहे. त्याऐवजी तुम्ही अन्याय का सहन करत नाही? स्वतःची फसवणूक का करून घेत नाही? 8 उलट, तुम्ही स्वतःच बंधू व भगिनींची फसवणूक करून त्यांच्यावर अन्याय करता! 9 अशा वाईट गोष्टी करणार्यांना परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळणार नाही, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. व्यभिचारी, मूर्तिपूजक, जारकर्मी आणि पुमैथुनी, 10 चोर, लोभी, मद्यपी, चहाडखोर आणि दरोडेखोर यांनाही परमेश्वराच्या राज्यात वाटा मिळणार नाही. 11 तुमच्यापैकी काहीजण अशा प्रकारचे होते, पण आता तुम्हाला धुऊन स्वच्छ करून पवित्र केलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आणि परमेश्वराच्या पवित्र आत्म्याने तुम्हाला नीतिमान केले आहे. लैंगिक अनीती 12 तुम्ही म्हणाल, “मला काहीही करण्याची मुभा आहे,” पण सर्वच गोष्टी हिताच्या नसतात. “मला काहीही करण्याची मुभा असली” तरी कोणत्याही गोष्टींची सत्ता मजवर चालणार नाही. 13 तुम्ही म्हणता, “अन्न पोटासाठी आणि पोट अन्नासाठी आहे, पण परमेश्वर या दोघांचाही नाश करतील.” शरीर लैंगिक अशुद्धतेसाठी नाही तर प्रभूसाठी आहे आणि प्रभू शरीरासाठी आहे. 14 ज्याप्रमाणे प्रभूला परमेश्वराने आपल्या शक्तीने मरणातून उठविले, त्याप्रमाणेच तो आपल्यालाही उठवेल. 15 तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तेव्हा मी ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव घेऊन तो वेश्येशी एक करावा काय? कधीच नाही! 16 जर कोणी वेश्येबरोबर जोडला जातो, तेव्हा ती त्याच्या शरीराचा भाग होते, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? कारण शास्त्रलेख सांगतो, “ती दोघे एकदेह होतील.” 17 परंतु जो कोणी प्रभूशी जडला आहे तो आत्म्याने त्यांच्याशी एक झाला आहे. 18 व्यभिचाराच्या पापापासून दूर पळा, कारण दुसरे कोणतेही पाप मनुष्य करतो ते शरीराबाहेर करतो, परंतु जो कोणी व्यभिचार करतो, तेव्हा तो स्वतःच्याच शरीराविरुद्ध पाप करतो. 19 तुमचे शरीर परमेश्वराने तुम्हाला दिलेल्या पवित्र आत्म्याचे मंदिर आहे आणि ते तुमच्यामध्ये राहतात, हे तुम्हाला माहीत नाही काय? तुम्ही स्वतःचे नाही; 20 कारण तुम्हाला किंमत देऊन विकत घेतले आहे, म्हणून तुमच्या शरीराने परमेश्वराचे गौरव करा. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.