१ करिंथ 4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीखर्या प्रेषितपणाचा स्वभाव 1 ख्रिस्ताचे सेवक आणि परमेश्वराने जे गुप्त रहस्य प्रकट केले आहे त्याचे कारभारी असे आम्हाला समजावे. 2 आता ज्यांना कारभार सोपवून दिला आहे, त्यांनी स्वतःला विश्वासू असे प्रमाणित करावे. 3 तुम्ही माझा न्याय केला किंवा कोणत्याही मानवी न्यायालयाने केला; तर मी त्याची जास्त काळजी करत नाही, निश्चित, मी स्वतःचाही न्याय करीत नाही. 4 कारण माझा विवेक शुद्ध असला, तरी मी निर्दोष ठरत नाही. प्रभू माझा न्याय करेल. 5 यास्तव निवडलेल्या समयापूर्वी व प्रभूच्या आगमनापूर्वी कशाचाही न्याय करू नका. त्यावेळी ते अंधकारात लपलेले सत्य प्रकाशात आणतील व आपल्या अंतःकरणातील उद्देश उघड करेल आणि मग त्यावेळी प्रत्येकाला परमेश्वराकडून प्रशंसा मिळेल. 6 आता, बंधूंनो व भगिनींनो, या गोष्टी मी तुमच्या हिताकरिता स्वतःला व अपुल्लोसला लागू केल्या आहेत यासाठी की, “जे लिहिलेले वचन आहे त्यापलीकडे जाऊ नका.” या म्हणीचा अर्थ तुम्ही आम्हाकडून शिकावा. आमच्यापैकी एकाचा अनुयायी म्हणून फुगून जाऊन दुसर्याला कमी लेखू नये. 7 तुम्हाला इतरांपासून वेगळे कोणी केले? तुमच्याजवळ असे काय आहे की जे तुम्हाला मिळालेले नाही? ज्याअर्थी तुम्हाला सर्व मिळाले आहे, तर तुम्हाला मिळाले नाही अशी बढाई का मारता? 8 इतक्यातच तुम्हाला जे हवे ते मिळाले आहे, इतक्यात धनवान झाला आहात, आम्हाला सोडून राज्य करीत आहात; तुम्ही राजे बनला असताच तर ठीक झाले असते, कारण आम्हीही तुम्हाबरोबर राजे झालो असतो. 9 मला असे वाटते की परमेश्वराने आम्हा प्रेषितांना विजय यात्रेमध्ये, सर्वात शेवटच्या ठिकाणी मृत्युदंड नेमलेल्यांसारखे ठेवले आहे. आम्ही सर्व सृष्टी, मानव आणि देवदूतांपुढे एक मौज म्हणून झालो आहे. 10 आम्ही ख्रिस्तासाठी मूर्ख आहोत, ख्रिस्तामध्ये तुम्ही सर्व सुज्ञ आहात! आम्ही अशक्त आहोत, पण तुम्ही सशक्त आहात! आम्ही अप्रतिष्ठित आहोत, तुम्ही तर प्रतिष्ठित आहात! 11 या घटकेपर्यंत आम्ही भुकेले व तहानलेले, घाणेरडी वस्त्रे घातलेले व अतिशय कठोर वागणूक मिळालेले व बेघर असे आहोत. 12 आम्ही आमच्या हाताने काबाडकष्ट करतो, जेव्हा आम्हाला शाप देतात, तेव्हा आम्ही आशीर्वाद देतो; आमचा छळ केला जातो, तेव्हा आम्ही सहन करतो; 13 आमची निंदा होत असता, आम्ही ममतेने उत्तर देतो. तरीही या क्षणापर्यंत आम्ही जगाचा गाळ व केरकचरा असे झालो आहोत. पौलाची विनंती व सूचना 14 तुम्हाला लाजवावे म्हणून नव्हे तर तुम्हाला सावध करावे या उद्देशाने मी तुम्हाला या गोष्टी, माझी प्रिय मुले या नात्याने लिहित आहे. 15 ख्रिस्तामध्ये तुम्हाला हजारो शिक्षक असले, पण पुष्कळ वडील नाहीत. कारण ख्रिस्त येशूंमध्ये शुभवार्तेद्वारे मी तुमचा पिता झालो आहे. 16 म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. 17 या कारणाकरिता मी तीमथ्याला तुम्हाकडे पाठवित आहे. तो प्रभूमध्ये माझा प्रिय व विश्वासू पुत्र आहे. तो प्रत्येक ठिकाणी मंडळ्यांमध्ये जाऊन मी जे शिक्षण देत असे, त्याप्रमाणे ख्रिस्त येशूंमध्ये माझ्या शिकवणीची तुम्हाला आठवण करून देईल. 18 मी तुमच्याकडे येणार नाही असे समजून तुमच्यातील काहीजण अहंकारी झाले आहेत. 19 परंतु प्रभूची इच्छा असली तर मी तुम्हाकडे लवकरच येईन आणि त्यावेळी गर्विष्ठांच्या बोलण्याकडेच नाही, तर त्यांच्या सामर्थ्याकडे देखील पाहीन. 20 परमेश्वराचे राज्य बोलण्यात नव्हे परंतु सामर्थ्यात आहे. 21 तुम्हाला काय आवडेल, मी तुम्हाकडे शिस्तीची काठी घेऊन, की प्रेम भावाने आणि सौम्य आत्म्याने यावे? |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.