Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ करिंथ 2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 बंधूंनो आणि भगिनींनो, माझ्याबाबतीत तसेच झाले, जेव्हा मी तुम्हाकडे आलो, तेव्हा परमेश्वराची साक्ष तुम्हाला सांगण्यासाठी मानवी ज्ञान आणि वक्तृत्व घेऊन आलो नाही.

2 कारण मी असा निश्चय केला होता की तुम्हामध्ये असताना फक्त क्रूसावर खिळलेला येशू ख्रिस्त याव्यतिरिक्त कोणत्याही गोष्टी जाणून घेऊ नये.

3 मी तुमच्याकडे अशक्त, अतिशय भीतभीत व कापत आलो.

4 माझे संदेश व उपदेश ज्ञान किंवा शहाणपणाच्या शब्दाचे नव्हते, तरी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचे प्रमाण देणारे होते.

5 यासाठी की तुमचा विश्वास मानवी ज्ञानांवर आधारलेला असू नये, तर परमेश्वराच्या सामर्थ्यावर असावा.


परमेश्वराचे ज्ञान आत्म्याकडून प्रकट होते

6 तरी देखील, आम्ही परिपक्व झालेल्यांना ज्ञानाचा संदेश सांगतो, परंतु हे ज्ञान या युगाचे नव्हे किंवा या युगाचे शासक, ज्यांचे अधःपतन होणार आहे त्यांचेही नव्हे.

7 आम्ही परमेश्वराचे ज्ञान आणि रहस्य जे गुप्त होते, ते जाहीर करतो आणि ते रहस्य परमेश्वराने युगानुयुगा पूर्वी आपल्या गौरवासाठी सिद्ध केले आहे.

8 तरी या युगाच्या अधिकार्‍यांना ही योजना समजलीच नाही, त्यांना ती समजली असती, तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला क्रूसावर कधीच खिळले नसते.

9 तरी शास्त्रलेखानुसार: “जे डोळ्यांनी पाहिले नाही, जे कोणत्याही कानावर पडले नाही, माणसाच्या मनात आले नाही,”— त्या सर्वगोष्टी परमेश्वरावर प्रीती करणाऱ्यांसाठी त्यांनी सिद्ध केल्या आहेत—

10 परमेश्वराने आपल्याला त्यांच्या आत्म्याद्वारे या गोष्टी प्रकट केल्या आहेत. कारण परमेश्वराचा आत्मा हा सर्व गोष्टींचा, परमेश्वराच्या अत्यंत गहन गोष्टींचा देखील शोध घेतो.

11 एखाद्या व्यक्तीचे विचार त्या व्यक्तीच्या आत्म्याशिवाय इतर कोणाला समजतात का? त्याचप्रमाणे परमेश्वराचे विचार परमेश्वराच्या आत्म्याशिवाय कोणालाही माहीत नाहीत.

12 आपल्याला जगाचा आत्मा मिळाला नाही, परंतु जो आत्मा परमेश्वरापासून आहे तो मिळाला आहे, यासाठी की परमेश्वराने आपल्याला जे विनामूल्य दिले आहे, ते आपण समजून घ्यावे.

13 आम्ही असे बोलतो हे मानवी ज्ञानाने शिकविलेले शब्द नव्हे, तर आत्म्याने शिकविलेले शब्द म्हणजे आत्मिक गोष्टींचे स्पष्टीकरण करण्याकरिता आम्ही आत्म्याने शिकविलेले शब्द वापरतो.

14 परंतु जो मनुष्य आत्मिक नाही, तो परमेश्वराच्या आत्म्यापासून आलेल्या गोष्टी स्वीकारीत नाही, कारण त्याला त्या मूर्खपणाच्या वाटतात, त्याला त्या समजणार नाहीत, कारण त्या गोष्टी परमेश्वराच्या आत्म्यानेच पारखल्या जाऊ शकतात.

15 आत्मिक असलेल्या मनुष्याला प्रत्येक गोष्ट पारखता येते, परंतु तो स्वतः मात्र कोणत्याही मानवी न्यायाखाली नसतो.

16 कारण, “प्रभूचे मन कोण जाणू शकेल? त्यांचा सल्लागार कोण आहे?” आपल्याकडे तर ख्रिस्ताचे मन आहे.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan