१ करिंथ 1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 परमेश्वराच्या इच्छेने ख्रिस्त येशूंचा प्रेषित होण्यासाठी बोलविलेला पौल आणि बंधू सोस्थनेस यांच्याकडून, 2 करिंथ येथील परमेश्वराच्या मंडळीस, जे ख्रिस्त येशूंमध्ये पवित्र केलेले व पवित्र होण्यासाठी बोलाविलेले, तसेच ख्रिस्त येशू आपले व त्यांचे प्रभू यांचे नाव घेऊन प्रत्येक ठिकाणी धावा करतात त्या सर्वांस: 3 परमेश्वर आपले पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो. उपकारस्मरण 4 ख्रिस्त येशूंमध्ये जी कृपा तुम्हाला दिली, त्याबद्दल मी सतत तुमच्यासाठी माझ्या परमेश्वराचे आभार मानतो. 5 त्यांच्यामध्ये तुम्ही सर्वप्रकारे संपन्न झाला आहात—सर्वप्रकारच्या भाषणात व सर्व ज्ञानात समृद्ध झाला आहात. 6 ख्रिस्ताविषयीची जी आमची साक्ष आहे त्याची परमेश्वर तुमच्यामध्ये पुष्टी करीत आहे. 7 यास्तव तुम्ही आपले प्रभू येशू ख्रिस्त यांच्या प्रकट होण्याची आतुरतेने वाट पाहत असताना आध्यात्मिक दानाची तुम्हाला काहीच उणीव पडलेली नाही. 8 प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष असे असावे म्हणून तेच तुम्हाला शेवटपर्यंत स्थिर करतील. 9 परमेश्वर ज्यांनी त्यांचा पुत्र आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त यांच्या सहभागितेत तुम्हाला बोलाविले ते विश्वसनीय आहेत. पुढाऱ्यांवरून मंडळीत फूट 10 माझ्या प्रिय बंधूंनो व भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावास्तव मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही जे काही बोलता त्यामध्ये एकमत असावे, म्हणजे तुमच्यामध्ये फूट पडू नये, मनाने आणि विचाराने तुम्ही सर्व एकतेमध्ये परिपूर्ण असावे. 11 कारण बंधूंनो व भगिनींनो, तुम्हामध्ये भांडणे आहेत, असे मला ख्लोवेच्या घरातील काही लोकांनी सांगितले आहे. 12 माझ्या म्हणण्याचा अर्थ हा: तुमच्यातील एकजण म्हणतो, “मी पौलाचा अनुयायी आहे,” तर कोणी “मी अपुल्लोसाचा” आणखी कोणी “मी केफाचा अनुयायी आहे,” आणखी कोणी “मी ख्रिस्ताचा अनुयायी आहे.” 13 ख्रिस्त विभागले गेले आहेत का? तुमच्यासाठी पौलाला क्रूसावर दिले होते का? तुमचा बाप्तिस्मा पौलाच्या नावात झाला होता का? 14 तुमच्यातील क्रिस्प आणि गायस यांच्याशिवाय मी इतर कोणाचाही बाप्तिस्मा केला नाही, म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो. 15 त्यामुळे तुम्हापैकी कोणालाही, तुमचा बाप्तिस्मा माझ्या नावात झाला असे म्हणता येणार नाही. 16 होय! मी स्तेफनाच्या कुटुंबीयांचाही बाप्तिस्मा केला, पण त्यांच्याशिवाय दुसर्या कोणाचाही बाप्तिस्मा केल्याचे मला आठवत नाही. 17 कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्याकरिता नव्हे, तर शुभवार्तेचा प्रचार करण्याकरिता पाठविले आहे—वाक्पटुतेने व ज्ञानाने नव्हे, यामुळे असे न होवो की ख्रिस्ताच्या क्रूसाचे सामर्थ्य रिक्त व्हावे. ख्रिस्ताचा क्रूस परमेश्वराची सुज्ञता आणि सामर्थ्य 18 क्रूसाचा संदेश नाश पावत असलेल्यांना मूर्खपणाचा वाटतो, तरी तारणाची प्राप्ती होत आहे अशा आपल्यासाठी तो परमेश्वराचे सामर्थ्य असा आहे. 19 कारण असे लिहिले आहे: “ज्ञानी लोकांचे ज्ञान मी नष्ट करेन. बुद्धिमानाची बुद्धी मी निष्फळ करेन.” 20 मग ज्ञानी लोक कुठे आहेत? नियमशास्त्र शिक्षक कुठे आहेत? या युगाचे तत्वज्ञानी कुठे आहेत? जे मूर्ख आहेत त्यांना परमेश्वराने जगाचे ज्ञान असे केले नाही का? 21 कारण परमेश्वराच्या ज्ञानामध्ये असतानाही जगाला त्याच्या ज्ञानाद्वारे परमेश्वराला ओळखता आले नाही, जो प्रचार मुर्खपणाद्वारे केला होता त्यावर विश्वास ठेवणार्या सर्वांचे परमेश्वराने आनंदाने तारण केले. 22 यहूदी लोक चिन्हाची मागणी करतात; आणि ग्रीक लोक ज्ञान शोधतात. 23 पण आम्ही क्रूसावर खिळलेल्या ख्रिस्ताला गाजवितो: जो यहूदीयांना अडखळण आणि गैरयहूदीयांना मूर्खपणा असा आहे, 24 परंतु परमेश्वराने ज्यांना बोलाविले आहे, त्या यहूदी आणि ग्रीक, या दोघांनाही ख्रिस्त हे परमेश्वराचे सामर्थ्य आणि ज्ञान आहे. 25 परमेश्वराची मूर्खता मानवी शहाणपणापेक्षा अधिक सुज्ञपणाची आहे, आणि परमेश्वराचा अशक्तपणा मनुष्याच्या सामर्थ्यापेक्षा बलवान आहे. 26 प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ज्यावेळी तुम्हाला पाचारण करण्यात आले त्यावेळी तुम्ही कोण होता याचा विचार करा. तुम्ही अनेकजण तर मनुष्यांच्या दृष्टीने शहाणे; किंवा प्रभावी किंवा कुलीन कुळात जन्मलेले नव्हता. 27 तरी जगाच्या दृष्टीने जे सुज्ञ आहेत अशांना लाजविण्याकरिता परमेश्वराने मूर्खपणाच्या गोष्टी निवडल्या; आणि सशक्तांना लाजविण्याकरिता त्यांनी जगातील दुर्बल गोष्टी निवडल्या. 28 परमेश्वराने जगातील धिक्कारलेले, अकुलीन यांना निवडले, जेणे करून त्यांना शून्यवत करावे. 29 आणि म्हणूनच परमेश्वरासमोर कोणत्याही मनुष्याने बढाई मारू नये. 30 कारण त्यामुळेच तुम्ही ख्रिस्त येशूंमध्ये आहात, ते परमेश्वरापासून आपले ज्ञान व नीतिमत्व, पवित्रता आणि खंडणी असे झाले आहेत. 31 यास्तव शास्त्रलेखात लिहिले आहे: “जो प्रौढी मिरवतो त्याने प्रभूमध्ये प्रौढी मिरवावी.” |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.