Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ इतिहास 29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


मंदिर बांधण्यासाठी देणग्या

1 नंतर सर्व जमलेल्या सभेला दावीद राजा म्हणाला: “माझा पुत्र शलोमोन, ज्याची निवड परमेश्वराने केली आहे, तो अजून तरुण आणि अननुभवी आहे. आणि हे कार्य महान आहे, कारण हे भव्यदिव्य मंदिर मानवाकरिता नव्हे, तर खुद्द याहवेह परमेश्वरासाठी आहे.

2 माझ्या उपलब्धींचा उपयोग करून परमेश्वराच्या मंदिरासाठी जितक्या वस्तू गोळा करता येतील, तितक्या मी केल्या आहेत—सोन्याच्या कामासाठी सोने, चांदीच्या कामासाठी चांदी, कास्याच्या कामासाठी कास्य, लोखंडाच्या कामासाठी लोखंड, लाकडाच्या कामासाठी लाकूड, गोमेद आणि जडावाच्या कामासाठी रंगीबेरंगी पाचूरत्न, उत्तम रत्ने, संगमरवरी पाषाण—मी गोळा केले आहेत.

3 माझा भक्तिभाव माझ्या परमेश्वराच्या मंदिरावर आहे, म्हणून माझ्या व्यक्तिगत खजिन्यातून जो सोने आणि चांदीचा मी संग्रह केला आहे, तो मी परमेश्वराच्या मंदिरासाठी देतो. याव्यतिरिक्त या पवित्र मंदिरासाठी मी दिले आहे:

4 ओफीराचे तीन हजार तालांत सोने आणि मंदिराच्या भिंती मढविण्यासाठी सात हजार तालांत शुद्ध चांदी.

5 सर्व सोने आणि चांदीची कामे कारागिरांकडून करण्यात येतील. आता स्वेच्छेने याहवेहसाठी स्वतःचे पवित्रीकरण करण्यास कोण तयार आहे?”

6 मग कुटुंबप्रमुख, इस्राएल गोत्राचे अधिकारी, हजार सैनिकांचे अधिकारी, आणि शंभर सैनिकांचे अधिकारी, राजाचे शासकीय अधिकारी यांनी स्वेच्छेने दान दिले.

7 परमेश्वराच्या मंदिराच्या कामासाठी त्यांनी पाच हजार तालांत आणि दहा हजार दारिक सोने, दहा हजार तालांत चांदी, अठरा हजार तालांत कास्य आणि एक लाख तालांत लोखंड दिले.

8 ज्यांच्याकडे रत्ने होती ती त्यांनी खजिन्यामध्ये जमा करण्यासाठी याहवेहच्या मंदिरातील खजिनदार गेर्षोनी यहीएलकडे सोपविली.

9 पुढाऱ्यांच्या या स्वेच्छेने दिलेल्या प्रतिसादाने सर्व लोक आनंदित झाले, कारण त्यांनी स्वयंस्फुर्तीने व पूर्ण अंतःकरणाने, आनंदाने याहवेहच्या सेवेला दिले, दावीद राजालाही मोठा आनंद झाला.


दावीदाची प्रार्थना

10 दावीदाने सर्व सभेदेखत याहवेहची स्तुती केली, तो म्हणाला, “हे याहवेह परमेश्वरा, आमच्या इस्राएलच्या पित्याच्या परमेश्वरा, अनादि ते अनंतकालापर्यंत तुमची स्तुती असो.

11 याहवेह, तुमचे सामर्थ्य व महिमा महान आहे; गौरव, वैभव व ऐश्वर्य ही सदासर्वकाळ तुमचीच असो, पृथ्वीवरील व स्वर्गातील सर्वकाही तुमचेच आहे! याहवेह, हे सर्व तुमचेच राज्य आहे; तुमचे प्रभुत्व सर्वांवर आहे.

12 श्रीमंती व सन्मान तुमच्याकडूनच येतात; तुम्ही सर्व गोष्टीचे शासक आहात. सर्वांना मोठेपणा व सामर्थ्य देण्याकरिता केवळ तुमच्याच बाहूत सामर्थ्य आणि अधिकार आहे.

13 आता, हे आमच्या परमेश्वरा, आम्ही तुमचे उपकार मानतो, आणि तुमच्या वैभवी नावाची स्तुती करतो.

14 “परंतु मी कोण, माझी शक्ती आणि माझे लोक कोण, जे तुम्हाला इतक्या उदारतेने दान देऊ शकतील? आमच्याजवळचे सर्वकाही तुमच्याकडूनच मिळालेले आहे आणि तेच आम्ही तुम्हाला देत आहोत.

15 आम्ही तुमच्या दृष्टीने आमच्या पूर्वजांप्रमाणे परकीय व अगांतुक आहोत. आमचे पृथ्वीवरील दिवस एखाद्या सावलीप्रमाणे आहेत, काही आशा न ठेवता ते नाहीसे होतील.

16 हे आमच्या याहवेह परमेश्वरा, तुमच्या पवित्र नावासाठी, तुमचे मंदिर बांधण्यास जे प्रचंड साहित्य आम्ही गोळा केले आहे, ते सर्व तुमच्याकडून मिळाले आहे, हे सर्वकाही तुमचेच आहे.

17 माझ्या परमेश्वरा, मी जाणतो, तुम्ही हृदयाची परीक्षा घेता आणि खरेपणाने प्रसन्न होता. मी या सर्व वस्तू स्वखुशीने व प्रामाणिक हेतूने दिल्या आहेत. आणि आता हे बघून मला आनंद झाला की तुमच्या लोकांनीही किती आनंदाने स्वखुशीने या देणग्या दिल्या आहेत.

18 हे याहवेह, आमच्या पित्या अब्राहाम, इसहाक आणि इस्राएल यांच्या परमेश्वरा, तुमच्या लोकांच्या मनात या इच्छा कायम राखा आणि त्यांचे अंतःकरण तुमच्याशी एकनिष्ठ राहू द्या.

19 माझा पुत्र शलोमोनाने एकचित्त हृदयाने तुमच्या सर्व आज्ञा, आदेश व नियम पाळावे, व हे भव्यदिव्य बांधकाम पूर्ण करण्यास सर्वतोपरी प्रयत्न करावा, ज्याच्यासाठी मी संपूर्ण तयारी करून ठेवली आहे.”

20 नंतर दावीद सर्व मंडळीला म्हणाला, “तुमच्या याहवेह परमेश्वराची स्तुती करा.” म्हणून त्या सर्वांनी आपल्या पूर्वजांचे याहवेह परमेश्वराची मस्तके लववून, दंडवते घालून, त्यांचा राजा याहवेहची स्तुती केली.


राजा म्हणून शलोमोनचा स्वीकार

21 दुसर्‍या दिवशी त्यांनी याहवेहसाठी यज्ञ व होमबली अर्पण केले: एक हजार गोर्‍हे, एक हजार मेंढे आणि एक हजार कोकरे, सोबत पेयार्पणे, तसेच इस्राएलींच्या वतीने इतर विपुल अर्पणे वाहिली.

22 त्यांनी त्या दिवशी याहवेहसमोर मोठ्या आनंदाने खाणेपिणे केले. नंतर त्यांनी दावीद राजाचा पुत्र शलोमोनचा याहवेहसमोर आणि सर्व पुढार्‍यांसमोर पुन्हा राज्यकर्ता म्हणून राज्याभिषेक केला. आपला याजक म्हणून त्यांनी सादोकाचाही याजक म्हणून अभिषेक केला.

23 अशा रीतीने शलोमोन त्याचा पिता दावीदानंतर राजा झाला आणि याहवेहच्या सिंहासनावर बसला. त्याची भरभराट झाली व सर्व इस्राएली लोक त्याच्या आज्ञेत राहिले.

24 सर्व अधिकारी आणि शूरवीर सैनिक, दावीद राजांच्या पुत्रांनी राजा शलोमोनशी एकनिष्ठ राहण्याचे वचन दिले.

25 याहवेहने शलोमोनाला इस्राएलीदेखत सर्वाधिक सन्मान दिला आणि इस्राएलमध्ये कोणत्याही राजाला त्याच्यासारखे शाही ऐश्वर्य दिले नव्हते.


दावीदाचा मृत्यू

26 अशाप्रकारे इशायाचा पुत्र दावीदाने सर्व इस्राएलावर राज्य केले.

27 दावीदाने इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले; सात वर्षे हेब्रोनमध्ये आणि तेहतीस वर्षे यरुशलेममध्ये राज्य केले.

28 तो वयोवृद्ध होऊन मरण पावला, त्याने दीर्घायुष्य घालविले, संपत्ती आणि मान मिळविला. त्याच्या जागी त्याचा पुत्र शलोमोन राज्य करू लागला.

29 दावीद राजाच्या कारकिर्दीतील घटना, सुरुवातीपासून शेवटपर्यंत द्रष्टा शमुवेल, संदेष्टा नाथान आणि द्रष्टा गाद यांच्या ग्रंथात लिहिल्या आहेत.

30 त्याच्या राज्याचा सर्व वृत्तांत, त्याचे सामर्थ्य, त्याच्यावर आणि इस्राएलावर आणि इतर शेजारील राष्ट्रांच्या राजांवर जे बरे वाईट प्रसंग आले, ते सर्व या ग्रंथात नमूद केले आहेत.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan